नेहरूंनी केलेली छोटीशी कृती कॅस्ट्रो विसरू शकले नाहीत. आजही क्युबा भारताचे उपकार मानतो..

एक छोटासा देश जगातल्या सर्वोच्च महासत्तेच्या नाकावर टिच्चून उभा राहतो, भल्याभल्यांना गुडघ्यावर आणून एक क्रांतिकारक त्या देशावर जवळपास पन्नासवर्षे अनभिषिक्तपणे राज्य करतो, अखेरच्या श्वासापर्यंत युरोपपासून ते आफ्रिकेपर्यंत अनेक तरुणांना क्रांतिकारी विद्रोहाचा रोंमँटिक प्रतिक बनतो हे सगळ एखाद्या परीकथेप्रमाणे आहे.

पण असा हाडामांसाचा माणूस क्युबा मध्ये होऊन गेला. त्याच नाव फिडेल कॅस्ट्रो.

जगाशी पंगा घेणारा हा वाघ मात्र भारताचा मित्र होता. याला एक कारण म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. जेव्हा क्युबा हा देश स्वतंत्र झाला तेव्हा फिडेल कॅस्ट्रोला व त्याच्या क्रांतीला पाठींबा देणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये नेहरूंचा समावेश होता.

स्वातंत्र्यानंतर लगेचच फिडेलचा साथीदार व क्रांतीची धगधगती मशाल असलेला चे गव्हेरा क्युबाचा प्रतिनिधी म्हणून भारत दौऱ्यावर येऊन गेला होता. या दौऱ्याविषयी सांगताना चे म्हणाला होता की

“नेहरुंना आमच कौतुक होतं. त्यांच्या मनात आमच्याबद्दल वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे माया होती.”

खुद्द फिडेल कॅस्ट्रो १९६० साली संयुक्त राष्ट्र सभेच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त न्यूयॉर्कला आला होता. तेव्हा कॅस्ट्रोवरील द्वेषामुळे अमेरिकेने त्याला राहायला हॉटेलदेखील दिले नव्हते. अशावेळी त्याच्या पाठीशी राहणारे पंडीत नेहरूच होते.

जेव्हा इतर देशाचे नेते फिडेल पासून अंतर राखत होते तेव्हा नेहरूंनी या तरुण नेत्याची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याचा आत्मविश्वास वाढवला. ही गोष्ट फिडेलच्या मनात घर करून गेली. तेव्हा तो फक्त ३४ वर्षांचा होता. त्याने नेहरूंना वडिलांच्या जागी मानले आणि भारताला आपले घर.

पुढे जेव्हा इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनल्या तेव्हा आपली मोठी बहिण पंतप्रधान बनल्याप्रमाणे त्यांना आनंद झाला.

नाम परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या कॅस्ट्रो यांचं दिल्लीत अभूतपूर्व असं स्वागत झालं. भारताचे आदरातिथ्य पाहून ते भारावून गेले. इतकंच नाही तर नामच्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना मारलेली अनौपचारिक मिठी सातासमुद्रापार गाजली.

भारताचे आणि क्युबाचे हे मैत्रीचे संबंध दाखवणारी ती मिठी होती

इंदिराजींच्या नंतरही पुढच्या पंतप्रधानांनी क्युबा व भारताची मैत्री टिकवली व आजही क्युबा भारताचा सर्वात विश्वासू सहकारी आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.