वर्ल्डकप चोरण्याचं जे काम हिटलरला जमलं नाही ते एका भुरट्या चोरानं करुन दाखवलं.
गेल्या दहा – बारा दिवसापासून जगभरातले सर्वोत्कृष्ट ३२ देश फुटबॉल वर्ल्ड कप ची ‘ गोल्डन ट्रॉफी ‘ आपल्या देशात घेऊन जाण्यासाठी लढत आहेत. १९३० पासून दर चार वर्षांनी हा महासंग्राम सुरु होतो. कदाचित जगातील सर्वात प्रतिष्ठेची असलेली हि ट्रॉफी आपल्या मायभूमीत यावी यासाठी प्रत्येकजण जीवतोडून मेहनत करत असतो. इतकं करूनही बऱ्याच जणांना यात अपयश येत.
परंतू मैदानात फुटबॉल न खेळता देखील हि ट्रॉफी आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न आजपर्यंत काहीजणांनी केले आहेत आणि त्यासाठी चक्क चोरीचा मार्ग देखील अवलंबला आहे.
ब्राझिलियन फुटबॉल क्लब चे अध्यक्ष एकदा म्हणाले होते कि, ” Spiritual value of world cup is far more than it’s material worth.” यामुळेच बहुधा ही अनमोल वस्तू प्रतिष्ठेसाठी का होईना आपल्या ताब्यात असावी अशी इच्छा बऱ्याच लोकांची राहिली आहे.
ही ट्रॉफी चोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी सैन्याने तर चक्क ही ट्रॉफी आपल्या ताब्यात घेण्यासाठी एकदा एक तुकडी पाठवली होती.
1938 सालचा फुटबॉल वर्ल्ड कप इटली ने जिंकला होता. रोम बँकेच्या मुख्य कार्यालयात अतिशय अभिमानाने ही ट्रॉफी झळकत होती. पण इटालियन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष ओटोरिनो बरासी यांना नाझी सैन्य या ट्रॉफी च्या मागावर असल्याची कुणकुण लागली व त्यांनी ट्रॉफी आपल्या घरात नेऊन एका बुटाच्या बॉक्स मध्ये दडवून ठेवली. नाझी सैन्याने बरासी यांच्या घरावर देखील धाड टाकली होती, पण वर्ल्ड कप ची सोनेरी ट्रॉफी कोणी बुटाच्या बॉक्स मध्ये दडवेल याची त्यांना अपेक्षा नसल्याने ही ट्रॉफी नाझी सैन्याकडे जाता जाता वाचली होती.
प्रतिष्ठेचा मुद्दा सोडला तर वर्ल्ड कप ट्रॉफी सारख्या वस्तूंना काळ्या बाजारात असणारी किंमत बघता, विक्रीसाठी सुध्दा ही ट्रॉफी चोरण्याचे प्रयत्न झाले आहेत. 1970 साली तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर फिफा च्या नियमानुसार ही ट्रॉफी कायमस्वरूपी ब्राझील ला देण्यात आली. ब्राझीलियन स्पोर्ट्स कॉनफेडरेशनच्या मुख्यालयात ठेवण्यात आली होती. 19 डिसेंबर 1983 च्या रात्री ही ट्रॉफी चोरण्यात चोरट्यांना यश आले.
ब्राझील पोलीसांकडून बरीच मोठी शोधमोहीम राबवली गेली परंतू शेवटपर्यंत या ट्रॉफीचा शोध लागला नाही.
प्रतिष्ठेसाठी किंवा पैशासाठी झालेली या ट्रॉफीची चोरी एकवेळ समजू शकतो पण इंग्लंड मधून एकदा फक्त मजा म्हणून सुद्धा ही ट्रॉफी चोरली गेली होती. पुढे प्रकरण इतकं मोठं झालं की, ही ट्रॉफी शोधण्यासाठी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याकाळची सर्वात मोठी शोध मोहीम राबवली होती तर त्याच वर्षी इंग्लंड मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा देखील या चोरीची चर्चा जास्त झाली होती.
1966 चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. वर्ल्ड कप च्या स्पर्धेपूर्वी या ट्रॉफी चे प्रदर्शन भरवण्याची प्रथा चालत आली आहे. 1966 च्या मार्च महिन्यात लंडन मधील मेथडिस्ट सेंट्रल हॉल येथे ही ट्रॉफी लोकांना पाहण्यासाठी ठेवली गेली होती.
सिडनी कुगलडेअर हा लंडन मधीलच एक भुरटा चोर होता, आपल्या भावाच्या मदतीने तो किरकोळ चोऱ्या करत असे. 20 मार्च 1966 च्या रात्री देखील त्याने भावाला सोबत घेऊन ज्या ठिकाणी वर्ल्ड कप ची ट्रॉफी ठेवण्यात आली होती त्या हॉल मध्ये चोरी करण्यासाठी गेला. चोरता येण्यासारख काही हाताला लागतंय का हे शोधत असताना सिडनी ला एका टेबल वर ठेवलेली ट्रॉफी दिसली. दुर्दैवाने गार्ड ड्यूटी बदलण्याची वेळ असल्यामुळे ट्रॉफी जवळ कोणीच नव्हते. सिडनी च्या अपेक्षेपेक्षा अतिशय नाजूक अशा काचेच्या पेटीत ही ट्रॉफी ठेवण्यात आली होती. अतिशय सहज रित्या ट्रॉफी हातात आलेली बघून सिडनी ने ती उचलली आणि हॉलच्या बाहेर पडला.
सिडनीच्या सोबत असलेल्या भावाला मात्र या ट्रॉफीची चोरी करणं बरोबर वाटलं नाही कारण फक्त सोन्याचा पत्रा असलेल्या या ट्रॉफीला कोण पैसे देणारा नाही हे त्याला माहित होतं. पण मी पैशासाठी नाही तर चोरी करण्यासाठी सोपी वाटली म्हणून ही ट्रॉफी चोरल्याचे सिडनीने भावाला सांगितले. परंतू सिडनीला ही चोरी जेवढी साधी वाटत होती तेवढी ती नव्हती.
दुसऱ्या दिवशी इंग्लंड मधल्या सर्व वर्तमानपत्रात वर्ल्ड कपच्या चोरीची बातमी झळकू लागली.
मोठ्या प्रमाणात पोलीस तपास सुरू झाला, आता मात्र सिडनी ला भिती वाटू लागली, पोलिसांपेक्षा देखील त्याला आपल्या बायकोची भिती वाटत होती. त्यामुळे सिडनी ने ही ट्रॉफी त्याच्या भावाच्या सासऱ्याच्या गोदामात दडवली.
वर्तमानपत्रात चोरीची बातमी छापून आल्यानंतर पोलिसांना बरेच बनावट फोन येऊ लागले. प्रत्येकजण ट्रॉफीची माहिती देण्याचा बदल्यात खंडणीची मागणी करत होते, पण कोणालाही ट्रॉफीच वर्णन करता येत नसल्याने पोलिसांचा विश्वास बसत नव्हता.
इकडे वर्ल्ड कप चोरीच्या बातमीला मिळणारी प्रसिद्धी बघून सिडनी आणि त्याच्या भावाने देखील पैसे कमवायचे ठरवले. त्यांनी थेट चेल्सी फुटबॉल क्लब आणि फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन जो मेअर यांना फोन केला. ट्रॉफी आपल्याकडे असून त्याबदल्यात पैशाची मागणी त्यांनी मेअर यांच्याकडे केली. तसेच आपल्यासाठी ही ट्रॉफी म्हणजे फक्त सोन्याचा पत्रा असून जर पैसे मिळाले नाहीत तर ट्रॉफी नष्ट करण्याची धमकी देखील त्यांनी मेअर यांना दिली. फोनवरून सिडनीने ट्रॉफी जे वर्णन सांगितले होते त्यावरून मेअर यांची खात्री झाली होती की, नेमकी याच चोरांकडे ही ट्रॉफी आहे.
मेअर यांनी पोलिसांच्या मदतीने एक योजना बनवली आणि वेश बदलून पोलिसांनाच खंडणीचे पैसे देण्यासाठी पाठवले. इकडे सिडनीने देखील टेड बेचली नावाच्या माणसाला मध्यस्थी म्हणून तयार केले होते ज्याच्याकडे खंडणीची रक्कम स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
पोलिसांनी टेडला पैसे घेण्यासाठी आला असताना अटक देखील केली परंतू आपण कोणत्या गोष्टीसाठी पैसे आणण्यासाठी निघालो आहे याची त्याला कल्पना नसल्याने सिडनी चे नाव पोलिसांसमोर आलेच नाही. पण टेड बेचली च्या अटकेमुळे घाबरलेल्या सिडनी ने आता या ट्रॉफी च्या भानगडीतून मोकळं होण्याचं ठरवलं आणि वर्ल्ड कपची ही ट्रॉफी चक्क रस्त्यावर फेकून दिली.
जितक्या मजेशीर प्रकारे या ट्रॉफीची चोरी झाली होती, तितकीच मजेशीर या ट्रॉफीचा शोध लागण्याचा किस्सा आहे.
चोरी नंतरच्या आठवड्याभरातील गोष्ट, २७ मार्च च्या सकाळी लंडन मधील डेव्हिड कॉर्बेट आपल्या पिकल्स नावाच्या कुत्र्याला घेवून फिरायला म्हनून बाहेर पडला होता. नेहमीच्या वाटेने चालतानाच पिकल्स आपल्या तोंडात कागदात गुंडाळलेली एक वस्तू घेऊन डेव्हिड यांच्याकडे धावत आला. आणि काय गंमत, जी ट्रॉफी शोधण्यासाठी संपूर्ण स्कॉटलंड यार्ड प्रयत्न करत होत, इंग्लंड मधील पेपर, रेडिओ, टिव्ही सर्व ठिकाणी ज्या ट्रॉफी बद्दल चर्चा सुरू होत्या ती ट्रॉफी त्यांच्या कुत्र्याने त्यांच्या हातात आणून दिली होती. डेव्हिड यांनी ताबडतोब पोलिसांना हि माहिती दिली आणि संपूर्ण इंग्लंडने सुटकेचा निश्वास टाकला.
पण या एका घटनेने डेव्हिड कॉर्बेट यांच्या कुत्र्याचं आयुष्य मात्र संपूर्ण बदलून गेल. ट्रॉफी शोधल्याच्या दुसऱ्याच दिवशी पिकल्स अक्षरशः नॅशनल हिरो बनला गेला. १९६६ च्या इंग्लंडच्या वर्ल्ड कप पार्टीमध्ये देखील पिकल्स विशेष आमंत्रित म्हणून सामील झाला होता. ‘डॉग ऑफ द इयर’ या विशेष सन्मानाने इंग्लंड सरकारने पिकल्सचा गौरव केला. बऱ्याच कंपन्यांनी पिकल्स ला वर्षभर डॉग फूड देण्याची घोषणा केली. ‘द स्पाय विथ द कोल्ड नोज’ या सिनेमात देखील पिकल्स ने भूमिका केली. 2006 साली पिकल्स च्या जीवनावर ‘द डॉग हू वोन द वर्ल्ड कप’ नावाची विशेष मालिका बनवण्यात आली होती.
सुदैवाने १९६६ चा वर्ल्ड कप इंग्लंडनेच जिंकला. विजयाच्या जल्लोषात ट्रॉफी चोरीच्या घटनेची जास्त चौकशी देखील पुढे झाली नाही. काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोक सोडले तर वर्ल्ड कपची चोरी सिडनीने केली होती हे कुणाला माहीत देखील नव्हते.
२००५ मध्ये सिडनीचे आणि २०१२ मध्ये त्याच्या भावाचे निधन झाले. परंतु ट्रॉफी चोरीच्या आरोपामध्ये कधीही ते सापडले गेले नाहीत. मागील वर्षी ‘डेली मिरर’ पुन्हा या प्रकरणाची चौकशी केली आणि सिडनीचा पुतण्या गॅरीने आपले वडील व काकांनी १९६६ साली वर्ल्ड कप ची चोरी केल्याचे मान्य केले. परंतू दोघेही हयात नसल्याने त्यांच्यावर कोणत्या कारवाईचा प्रश्नच येऊ शकत नाही.
ट्रॉफीची चोरी करणं चूक होत का बरोबर हे आज गॅरी ला माहीत नाही, पण त्याचा काका सिडनी नेहमी म्हणत असे कि,
“मी पहिला इंग्रज आहे ज्याने १९६६ चा वर्ल्ड कप हातामध्ये उचलला आहे” आणि या गोष्टीचा मात्र गॅरीला नक्कीच अभिमान आहे.
Nice article