आणि डोक्याची मंडई करणारा अंदाधुंद वर्षातला एकमेव वाढीव पिक्चर ठरतो. 

जर प्रयोग म्हणून आपण पाहायचं ठरवलं, सॉरी म्हणजे न पाहायचं ठरवलं तर समोरचं आपल्याला आहे त्याहून काही वेगळं दिसेल का? त्याहून महत्वाचं समोरच्याला आपल्यात आहे त्याहून काही वेगळं दिसेल का? आणि दिसलंच तर त्याची प्रतिक्रिया व वागणं बदलेल काय? 

अंदाधुंदमध्ये आता हा प्रयोग घाण गंडतो. बरं गंडतोय म्हणजे कोणामुळे गंडतोय? त्यामुळे नेमकी कोणाची लागतेये याचा काही अंदाज साधारण आब्बास-मस्तान थ्रिलर पाहणारे प्रेक्षक लावेपर्यंत श्रीराम राघवन दर दहा मिनिटाला मी श्रीराम राघवन असल्याचं दाखवत आपल्या डोक्याची एक करतो. आता याचा दोष प्रेक्षकाने स्वत:ला द्यावा की आपले ठरलेले अंदाज बांधण्यामागील सुप्त शक्ती असलेल्या तद्दन बॉलीवूड थ्रिलरपटांना द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण श्रीराम राघवन हे त्यांचं एक उत्तर तुमच्या दलिंदर कल्पनाशक्तीची इज्जत काढत देतो. 

आणि डोक्याची मंडई करणारा अंदाधुंद हा गेल्या काही वर्षातला एकमेव वाढीव पिक्चर ठरतो.

पियानो वाजवणारा आर्टिस्ट आयुषमान खुराना (आकाश) परफेक्ट धून सापडत नसल्याने वैतागलेला असतो. या परफेक्ट धूनच्या प्रेरणेच्या शोधात त्याने रॉकस्टार पाहिलाय की नाही हे काय दाखवलेलं नाही. पण खटाना भाईचा तूटे दिलसेही संगीत निकलता है हा डायलॉग त्यानं लई मनावर घेतलाय असं वाटत राहतं. तर हा गडी संगीतकलेच्या प्रेरणेच्या शोधात आंधळा व्हायचं नाटक करतो. बरं तो आंधळा नाहीये हे सांगून मी स्पॉयलर टाकलाय का? तर नाही. ट्रेलर बघून तो आंधळा नाहीच, असला खतरनाक सस्पेंसचा अंदाज बांधणाऱ्यांचा दोष नाही. त्याचं श्रेय पुन्हा अब्बास मस्तानला द्यावा लागेल.

त्यो आंधळा नाही हा काय सस्पेंस नाही कारण राघवन ते आपल्याला पहिल्या दहा मिनिटातच सांगतो. बर खून होतो ह्यो बी काय सस्पेंस नाही. कारण खून तासभरातच आपल्या समोरचं होतो. खून कोण करतो हेही राघवनने गूढ ठेवलं नाहीयं. तब्बू (सिम्मी) आपल्या समोरच खून करतेय. पण खूनाचा एकमेव साक्षीदार (आकाश) हा आंधळा नाही हे फक्त खून करणाऱ्यालाच माहित असेल तर?

खूनाचा उलगडा होऊन आरोपी सगळ्यांसमोर येणं असा वगैरे चित्रपट काही नाहीयं. आकाश आंधळा बनून पियानो वाजवत बसलाय अन् सिमी त्याच्यासमोर खून करुन बॉडीची विल्हेवाट लावतेये हा सीन खरंच नादयं. या एका सीनसाठी विशेषत: तब्बूसाठी तुम्ही चित्रपट पाहू शकता. पण पियानोच्या संगितातील खून कथेला फक्त पुश म्हणून पिक्चरमध्ये येतो. ह्यो काय पिक्चरचा मुख्य भाग नाही. पिक्चरचा मेन भाग काये हे तुम्हाला राघवन स्व:त भेटला तरी सांगू शकणार नाही.

पण पण.. या खूनानंतर कथानक असला वेग पकडतं आणि डोक्याची मंडई करत सुटतं की असला मेलोड्रामाटिक खून झालतां हे आपण विसरुन जातो अन् पुढे काय माय वासवून ठेवलीयं म्हणत ऑ करुन बसून राहतो. आता ही माX कधी, कोणी अन् कशी वासवलीयं हे मी सांगितलं तर तो स्पॉयलर ठरेल. पण चित्रपटाच्या सुरुवातीला एक वाक्य आहे. what is life? It all depends on the liver. आता या वाक्यातच खरी डबल गेमयं आणि यावरचं पुढची सगळी माX वासवली गेलेलीयं.

चित्रपटात हिरो अन् व्हिलन असलं काही नाहीयं. पिक्चरमधली सगळी पात्रं एकाहून एक XदरचोX दाखवली आहेत. फक्त राधिका आपटे (सोफी) सोडून. आता ती पुण्याचीय म्हणून तसं दाखवलंय का माहित नाही. मग ते कथानकात येणारं दहा वर्षांचं पोरगंही तेवढंच हरामखोर आहे. तर ही भोळी पण कथनकात चपलख बसलेली राधिका आपटे आंधळ्या आयुषमानला सहानुभूती व प्रेमाने आपल्या वडिलांच्या हॉटेलात पियानो वाजवायचं काम देते व नंतर तर अजून बरंच काही देते. 

चित्रपटाचं कथानक सगळं पुण्यात घडत असलं तरी पुण्याचा कोणताच गुण त्यात नाही ही चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे. आपला हिरो आकाश प्रभात रोडला अपंगांच्या होस्टेलला राहतो. आपली हिरोईन तब्बू मगरपट्ट्यात नवरा अनिल धवन (पम्मी) सोबत राहते. नेहमीप्रमाणे राघवनने जुन्या बॉलिबूडचा वापर करत अनिल धवनला पिक्चरमध्ये अनिल धवन म्हणूच वापरत कमाल केलिये. आता ह्याच्यामुळे आपलंबी बॉलिवूडमध्ये काम होईल म्हणून म्हाताऱ्या पम्मीशी तब्बूनं म्हणजेच सिमीनं लग्न केलंय. पण वय झाल्यावर बॉलिवूडमध्ये त्यालाच कोणी विचारत नसल्यानं तब्बूही वैतागलीये. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवसाला बायकोचं कौतुक म्हणून सरप्राईस द्यायला आलेल्या आपल्या नवऱ्याला तब्बूच मोठा सरप्राईस देते.

चित्रपटातलं प्रत्येक पात्र सहानुभूती मिळवण्याचा जे खतरनाक प्रयत्न करतं तो ब्लॅक कॉमेडीचा निव्वळ थोर प्रकार आहेय. आता ब्लॅक कॉमेडी माहित नाही याचा दोष आपण पुन्हा बॉलिवूडला देऊया. पण अंदाधुंद बॉलिबूडमध्येच आलाय ही ब्लॅक कॉमेडी बॉलिवूडचं पर्यायाने आपलं नशीब आहे. 

लफडं गावलं म्हणून नवऱ्याचा खून करणारी तब्बू मी विधवा आहे म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते!

आंधळ्या लोकांवर उपचार करतो म्हणून त्यांची किडनी विकणारा XदरचोX डॉक्टर (झाकिर हुसेन) पोराची परीक्षा जवळ आल्याय म्हणून केवल कनेक्शन बंद करतो! शेवटी गरीबानेच माणूसकी दाखवली बघा म्हणत प्रेक्षक सुस्कारा सोडतोयं तर ती लॉटरीवाली बाई (छाया कदम) अन् तिचा रिक्षावाला नवरा आकाशला नेमकं त्या XदरचोX डॉक्टरकडे उपचारासाठी म्हणून घेऊन जातात! बायकोची रोजची सोळा अंडी खाऊन प्रोटीन मात्र तब्बूला देणारा बॉडीबिल्डर पोलीस अधिकारी (मानव विज) बायकोला भिणारा फट्टू दाखवलायं. सुरवातीला इंटरेस्ट दाखवून नंतर कलटी द्यायला निघालेल्या आकाशला सोफी म्हणजे राधिका आपटे तु काय ते नीट सांग नाहीतर मला ताण येऊन पिंपल्स येतात म्हणते! तब्बूच्या कातील अदांनी घायाळ तिचा नवरा तिला लाडाने लेडी मॅकबेथ म्हणतो तर ती खरंच त्याचा खून करते!

असे एकामागोमाग एक आपले सगळे पूर्वग्रह तोडत राघवन अडीत तास डोक्याची मंडई करत बुडाला खिळवून ठेवतो. मात्र या मंडईत चित्रपटातला एकही सीन अथवा पात्र अनावश्यक कोंबलेलं  नाही. ट्रेलरमध्ये शेतातली गोबी खाऊन पळणारा आंधळा सश्याचापण पिक्चरमध्ये महत्वाचा रोलयं!

बाकी काय बोलावं अंदाधुंद खरंच अंदाधुंद मास्टरपीस आहे. थ्रिलर म्हटल्यावर प्रेक्षकांनाच Xत्या मारत ट्विस्टमागून ट्विस्ट काढणाऱ्या रेस – ३ च्या काळात अंदाधुंद आलाय यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण जावा. बघा. विश्वास बसेल. 

श्रीराम राघवननं जिंकलंय. काय त्याच्यासोबत रायटर्सची टीम हाय त्यांनी कमाल केलीयं. अमित त्रिवेदीचं संगीत नाद. आयुषमानचा आत्तापर्यंतचा सर्वात भारी परफ़ॉर्मन्स. आपल्या समोर दोन खून होतायेत. गांड फाटलीये. पण गडी दिसत असूनही आपला पियानोच वाजवतोये काय पर्याय नाही! निव्वळ नाद अॅक्टिंग. राधिका आपटेसह बाकी सगळ्यांची अॅक्टिंगही एकदम भारी.

अन् तब्बू .. आगायायायाया.. 

आता अलरेडी रिव्हू पहिल्यांदा लिहिलाय मी. एवढं लांबलचक लिहित नसतेत वाटतं. त्यामुळे यातल्या तब्बूवर मी वेगळे सात – आठ लेख लिहावे म्हणतो. दोन – दोन मिनिटाला ती इमोशन्स एवढ्या सहजतेने बदलते की विषय कट. प्रेमात तर काय हिच्या हातचा पिक्चरमधला खेकडा होऊन उकळाय तयार आहे मी ! शेक्सपियअरनं हा पिक्चर बघितला तर लेडी मॅकबेथ हिच्यासाठीच लिहलाय म्हणाला असता. मकबूलमधल्या निम्मीपेक्षा ही सिमी त्याला जास्त आवडली असती. आपलं नशिबंय तब्बू आपलीयं. बॉलिवूडनं तिला जपून वापरावी. सलमाननं जय हो मध्ये तिला बहिण बनवून खर्च केलेला. भाई तुम्ही पुन्हा एकदा फूटपाथवरुन गाडी घाला यावेळेस मी झोपतो खाली, पण हिला सोडा. तब्बूला कोणीही असंच खर्च करु शकत नाही. ते विशाल भारद्वाज नंतर राघवनलांच कळालयं.

प्रदिप बिरादार.

2 Comments
  1. Sandeep says

    Aaj movie बघून परत review वाचला. छान लिहिलं आहे movie प्रमाणे

  2. रोहित says

    भन्नाट … जितका भारी चित्रपट आहे – तितकाच भारी लेख !

    लै भारी ओ प्रदिप भाऊ

Leave A Reply

Your email address will not be published.