“तुझे मेरी कसम” ना थेटरातून उतरला, ना मनातून..!

गावातल्या थेटरात नवीन सिनेमा आलेला. साधारण आम्ही नववीला असणार. नुकताच मिसरूड फुटू लागलेली. आमच्या दोस्त मंडळींत एक बॉलीभाई होता. त्याला पिक्चरच्या सगळ्या बातम्या सगळ्यात आधी माहिती असायच्या. बॉलीभाईने नवीन पिक्चर भारी आहे आणि गाणी तर सोल्लिड आहेत अशी खबर आणली.

सायकली घेऊन माळावरच्या लायकर टॉकीजला आम्ही सगळे मित्र जाऊन थडकलो. तिकीट काढली. आधीचा शो संपायला वेळ होता तोवर पोस्टर बघत उभारलो. नट-नटी दोघे पण ओळखीचे नव्हते. नटीला कुठतरी जाहिरातीत बघितल्यासारख वाटत होत.

बॉलीभाई म्हणाला,

“हिरो कोण आहे माहितीय काय? त्याचे पप्पा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.”

एका सदारडू दोस्ताने त्याला शिवी घातली.”अरे #$%$ वशिल्याने आलेल्या हिरोचा सिनेमा बघायला आम्हाला घेऊन आलास होय.” आता तिकीट काढलेली आणि पिक्चरला पण गर्दी झालेली. आम्ही त्या सदारडूला आवरला आणि थिएटर मध्ये घुसलो.

स्टोरी थोडक्यात रिषी आणि अंजू नावाच्या लहानपणापासूनच्या #BFF ची असते. म्हणजे काय तर एका दिवशी एका हॉस्पिटल मध्ये त्यांचा जन्म झाल्यापासून त्यांची फ्रेन्डशिप सुरु झालेली असते.

एका गल्लीत राहणारे, एका शाळेत आणि आता एका कॉलेजमध्ये एकाच बेंचवर बसणारे हे अंजू आणि रिषी एक क्षण सुद्धा एकमेकापासून वेगळे राहत नसतात. पण त्यांच्यामते त्यांच्यात फक्त मैत्री असते. पुढे सगळी वळण घेऊन उदित नारायणच्या आर्त सुरात,

“तुझे मेरी कसम” गाऊन अखेर हिरो हिरोईन शेवटी एकमेकावर शिक्कामोर्तब करतात.

विकासाच्या माध्यमातून राजकारणासारखा दोस्तीच्या माध्यमातून प्रेमाचा संदेश पोहचवणारा.

हा पिक्चर आपल्याला तर भरपूर आवडला. इतका की रामोजी फिल्म सिटी मध्ये सहल गेल्यावर तुझे मेरी कसम चं शुटींग झालेले सगळे स्पॉट शोधून शोधून काढले पण खऱ्या आयुष्यात हे राजकारण आपल्याला जमलं नाही.

आम्ही बालवयातच “एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते” हे सक्त लौन्डा जातीचे व्रत घेतले होते. मुलींशी बोलणे म्हणजे पाप असं आम्हाला वाटायचं. तसं कुठली मुलगी स्वतःहून आमच्याशी बोलायला यायची नाही तो भाग वेगळाच. तर मग या पिक्चरची ही स्टोरी एकदम मनात घर केली. अपनेको भी ऐसी मैत्रीण मंगता हय असं वाटू लागल. कॉलेजमध्ये गेल्यावर अशा मैत्रिणी बेष्ट फ्रेंड बनवायचं. पुढ ते पण काही जमली नाही. पण असो.

पिक्चर भारी वाटला. हिरो हिरोईन पण आपल्याला जाम आवडले. हिरोईन जेनेलिया डिसुझा गोड होतीच पण मुख्यमन्त्र्याचं पोरगं “रितेश देशमुख” पूर्ण कॉन्फिडन्स मध्ये काम केलेलं. वशिला, पहिला पिक्चर असल्या कुठल्याच गोष्टीचं प्रेशर त्यान घेतलेलं नव्हत. या सगळ्यापेक्षा जास्त भारी रितेश -जेनेलिया या फ्रेश जोडीची केमिस्ट्री होती. 

रितेश देशमुख आला तेव्हा बॉलीवूड सर्कलमध्ये सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणजे एखादा गुंठामंत्री सारखा दिसणारा आडदांड गावठी असेल असं वाटत होत. खुद्द जेनेलिया त्याच्याबरोबर याच गैरसमजामुळे शुटींगचे सुरवातीचे दोन दिवस बोलली नव्हती. पण रितेशने सगळ्यानाच चकित करून टाकलं.

आम्हाला शाळेत असताना मुख्यमंत्री कोण आहे हे माहित नव्हत. तुझे मेरी कसमच्या निम्मिताने कळाल की रितेश देशमुखचे पप्पा विलासराव देशमुख मुख्यमंत्री आहेत. आज लक्षात येत की विलासराव देशमुख “राजकारण सोडून नाचगाणी कशाला हवं रे मुख्यमंत्र्याच्या पोराला” असं टिपिकल बापासारख ते रितेशशी वागले नाहीत म्हणून त्याला फिल्म मध्ये करीयर करता आलं.

घरची देशमुखी लातुरात सोडून त्याने मुंबईमध्ये स्ट्रगल केला. तुझे मेरी कसम ने त्याला पहिला हिट मिळवून दिला.   पुढे पण रितेशचे अनेक पिक्चर आले. काही गाजले काही पडले. हाऊसफुल सिरीज नंतर फक्त कॉमेडी जॉनर हे आपले होम पीच आहे ते ओळखून तो तिथेच बॅटिंग करत राहिला. कॉमेडीचा त्याला बरोबर सेन्स आहे. परफेक्ट टायमिंग वर पंच हा बापाचा गुण त्याच्यात बरोबर उतरला आहे.

मराठी मध्ये लई भारी मधून रेकोर्ड ब्रेक एन्ट्री केली. आज त्याचा माउली थिएटरमध्ये गर्दी खेचत आहे. पण तुझे मेरी कसमचा नोस्टॅल्जीया अजूनही लोकांच्यामधून उतरत नाही. म्हणूनच की काय तुझे मेरी कसमचे निर्माते रामोजी राव यांनी पंधरा वर्षे झाली तरी हा सिनेमा थिएटर मधून उतरवलेला नाही .

अजूनही तुझे मेरी कसम dvd वर आणला नाही किंवा टीव्हीवर दाखवलेला नाही. आजही निजाम सर्किट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा, हैद्राबाद तेलंगणा भागातल्या कुठ्ल्या ना कुठ्ल्या कोपऱ्यातल्या थेटरात हा पिक्चर सुरु असतो आणि लोक आजही त्याला गर्दी करतात.

शोलेसुद्धा असाच अनेक वर्षे थिएटर फिरून मग शेवटी टीव्हीवर आला होता. 

काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये तुझे मेरी कसम सिनेमा आला होता. सगळे जुने दोस्त मिळून परत पिक्चर बघायला गेलो. सिंगलस्क्रीन थिएटरचा शेवटचा राजा अशी ओळख असलेला सिनेमा या वेळी मल्टीप्लेक्समध्ये बघितला. त्याच दिवशी सिनेमा सुरु व्हायच्या आधी बॉलीभायने रितेश आणि जेनेलिया लग्न करणार आहेत अशी सिक्रेट न्यूज आमच्या कानावर घातली.

पुढे जेनिलिया कधी वहिनी झाल्या ते कळलं सुद्धा नाही, आम्ही मात्र अजूनही एकाकी खिंडच लढवतोय एखादी तशीच जेनिलियासारखी खळीवाली पोरगी आम्हाला कधीना कधी फ्रेन्डलिस्टमध्ये घेईल या इच्छेखातर..

भिडू भूषण टारे. 

हे ही वाच भिडू.

 

 

3 Comments
  1. Apeksha says

    Lovely movie and cute and super
    Jodi

  2. Laxmikant says

    Bhidu maza saglyat favorite movie…DVD kadhi bhetel tyachi

Leave A Reply

Your email address will not be published.