कराचीहून पुण्याला आलेल्या सिंधी भावंडांमुळे महाराष्ट्रातली शेती सोन्यासारखी पिकली

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. आता पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची जवळ एक शिकारपूर नावाचे गाव आहे. तिथल्या संपन्न सिंधी सावकाराच्या घरी जन्मलेली मुले. प्रल्हाद आणि किशन छाब्रिया.

प्रचंड श्रीमंती. मोठ घर. दिमतीला नोकरचाकर. ही मुले लाडात वाढली. मात्र संकटांच वावटळ कधी येईल सांगता येत नाही. अचानक वडिलांच्या मृत्युमुळे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या छाब्रिया भावंडावर आभाळच कोसळलं. होती ती संपत्ती भाऊबंद लुटून गेले.

१२ वर्षांच्या प्रल्हाद छाब्रिया याच्यावर विधवा आई आणि ९ भावंडांच घर चालवण्याची वेळ येऊन ठेपली.

एकेकाळी त्यांच्या घरात नोकर असलेल्या व आता कपड्यांचं दुकान काढलेल्या व्यक्तीने त्याला साफसफाईच्या कामासाठी ठेवून घेतलं. महिना १० रुपये पगार देऊ केला. पुढे कपड्याच्या दुकानात सरबत विकू लागले आणि शेठजीच्या स्वयंपाकघरात उरलेल्या अन्नातून स्वतःचा गुजारा केला.

अशाच छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा प्रल्हाद छाब्रिया पुण्याच्या एका सावकाराच्या घरी घरकाम करत होते पगारातून वाचलेल्या आणि पैशातून कराचीला आपल्या आईला महिन्याला ३० रुपये पाठवत होते.

फाळणीनंतर संपूर्ण छाब्रिया कुटूंब कराचीहून पुण्याला शिफ्ट झालं.

या निर्वासित कुटूंबाला सुरवातीला घर देखील मिळत नव्हते. कसबस नारायणपेठेत दोन खोल्यांच्या घरात छाब्रियांचा संसार सुरू झाला.

आयुष्याच्या चढउतारामध्ये मिळालेले व्यवहारज्ञान सोडलं तर छाब्रिया यांचं शिक्षण फार काही झालं नव्हतं. पैसे कमवायचे झाले तर स्वतःचा व्यवसाय करण्यावाचून पर्याय नव्हता. त्यांनी आपला लहान भाऊ किशोर याच्या सोबत पुण्यात इलेक्ट्रिकल सप्लायचा बिझनेस सुरू केला.

तेव्हा प्रल्हाद छाब्रिया यांचं वय अवघं १७ वर्षांचं होतं.

अख्ख पुणे रोज सायकलवर पालथं घालून त्यांनी धंदा सुरू केला. पुढे जम बसल्यावर स्वतःच दुकान सुरू केलं. मुंबईवरून माल आणायचा आणि पुण्यात विकायचा.

बाकीच्या दुकानदारापेक्षा छब्रियांच वैशिष्ट्य म्हणजे ते वस्तू विकल्यावर त्याची सर्व्हिस सुद्धा द्यायचे.

दुकानात आलेली इलेक्ट्रिक उपकरणे खोलने, त्यातील वायरी दुरुस्त करणे या कामामधून किशन छाब्रिया केबल फॅब्रिकेशन शिकले. त्यांचं टेक्निकल नॉलेज आणि प्रल्हाद छाब्रिया यांचं धंद्यातल डोकं याच्या जीवावर त्यांनी मिलिटरीला केबल सप्लाय सुरू केला.

यातूनच एकदा त्यांना ३लाख रुपयांची मोठी ऑर्डर मिलिटरीकडून मिळाली.

या ऑर्डरसाठी त्यांनी स्वतःच केबल बनवण्याचा प्रचंड मोठा धाडसी निर्णय घेतला.

जपान वरून कॉपर ब्रेडेड मशिन मागवून घेतलं. पुण्यात एका गोठ्यात ते बसवलं. कोणतीही शाळाकॉलेजची डिग्री नसलेले किशन छाब्रिया यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या जोरावर ती केबल बनवली. या ऑर्डरमध्ये त्यांनी त्याकाळचे १ लाखाचे प्रॉफिट कमवून दाखवले.

१९५४ साली पुण्यात छाब्रिया बंधूनी स्वतःची कंपनी स्थापन केली. त्याला नाव दिले,
फिनोलेक्स

छाब्रिया यांच्या केबलला फाईन अँड फ्लेक्सिबल असं ओळखलं जातं होतं. या दोन शब्दांना एकत्र करून फिनोलेक्स हे नाव जन्माला आले.

फिनोलेक्स फक्त केबल पुरते मर्यादित राहीले नाही.

कराची मध्ये जन्मलेल्या छाब्रिया यांच्यासाठी महाराष्ट्र हीच कर्मभूमी होती. महाराष्ट्र कृषिसंस्कृतीचं राज्य आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही करता आलं तर आपला बिजनेसदेखील वाढेल आणि लोकसेवा केल्याच देखील पुण्य लागेल या विचारातून छाब्रिया यांनी पीव्हीसी पाईपेच्या बिझनेस मध्ये उडी घेतली.

दुष्काळाने गांजलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहचवण्यासाठी फिनोलेक्सच्या पीव्हीसी पाईपेने सिंहाचा वाटा उचलला. या शिवाय ठिबक सिंचन असेल किंवा पंपसाठी लागणाऱ्या केबल असतील फिनोलेक्सने शेतकऱ्यांची प्रत्येक टप्प्यावर साथ दिली.

फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावानी

आजही आपल्या पैकी अनेकांना रेडिओ वरची ही जाहिरात आठवत असेल. लाखो शेतकऱ्यांनी या फिनोलेक्सच्या मंत्रावर भरवसा ठेवला आणि थेंब थेंब वाचवून शेतं सोन्यासारखी पिकवली.

१० रुपये पगारावर घरकाम करणाऱ्या गड्याने १५ हजार कोटींच साम्राज्य उभं केलं.

फक्त भारतातच नाही तर जगभरात फिनोलेक्सने नाव कमवल. साध्या सायकलवर सुरू झालेला प्रवास स्वतःच्या विमानापर्यंत जाऊन पोहचला.

फक्त पैसे कमावले नाहीत तर मुकुल-माधव फाउंडेशन आणि होप फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले.

वैद्यकीय, सामाजिक आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक उपक्रम व योजना राबविल्या. रत्नागिरी येथे मुकुल-माधव विद्यालय, तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची स्थापनाही केली. पुण्याजवळील हिंंजवडी येथे त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीही सुरू केली.

आज ऑप्टिकल केबल पासून ते स्विच गियर, पंखे, इलेक्ट्रिकल स्वीचेस हिटर बनवणारी फिनोलेक्स केबल्स आणि कृषीविषयक उत्पादन करणारी फिनोलेक्स पाईप्स या दोन कंपन्यांच्या रुपात छाब्रिया कुटुंब भारतीय उद्योगात आपली छाप पाडून आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.