या सिनेमासाठी शिवसैनिकांनी दिलीप कुमारच्या घरासमोर अंडरवेयर आंदोलन केलं होतं

आजकाल समलिंगी संबंधांवर उघडपणे बोललं जातं. काही जाहिराती, वेबसीरीज अशा गोष्टींवर भाष्य सुद्धा करतात. या कलाकृतींची प्रेक्षक आणि समीक्षक प्रशंसा करतात. आज जरी लोकांची स्वीकारण्याची क्षमता वाढली असली, समाजामध्ये थोडेफार बदल होत असले तरी २०-२२ वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती वेगळी होती.

समलिंगी संबंधांवर आधारीत पहिला भारतीय सिनेमा म्हणजे दीपा मेहता दिग्दर्शित ‘फायर’. समलिंगी संबंध दाखवणाऱ्या फायर सिनेमामुळे देशभरात जाळपोळ झाली होती.

निसर्गातील तीन महत्वाच्या गोष्टींचा आधार घेऊन दीपा मेहता यांनी तीन सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा हात घेतली. या तीन गोष्टी म्हणजे आग, पृथ्वी आणि पाणी. दीपा मेहता यांनी ‘फायर’, ‘अर्थ’ आणि ‘वॉटर’ हे तीन सिनेमे दिग्दर्शित केले. हे तिन्ही सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकले. या तीन सिनेमापैकी सर्वात विवादास्पद सिनेमा म्हणजे ‘फायर’. व्यावसायिक पातळीवर समलिंगी संबंधांवर आधारीत असलेला हा पहिला बॉलिवुड सिनेमा. थोर लेखिका इस्मत चुगताई यांच्या ‘लिहाफ’ या कथेवर आधारीत.

१९९८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला राजकीय, सामजिक रोषाला सामोरं जावं लागलं.

मोठं घर पोकळ वासे अशी म्हण आहे. अशाच एका कुटुंबात घडणारी गोष्ट. नीता आणि राधा या दोघी एकमेकांच्या जावा. घरातले सगळे आपापल्या दिशेला. दोघींचे नवरे सतत कामाच्या व्यापात. त्यामुळे दोघी काहीशा एकट्या. काहीशी अपूर्णता दोघी अनुभवत असतात. अशा वेळी दोघी एकमेकांप्रती आकर्षित होतात. मनाने आणि शरीराने सुद्धा. या दोघींच्या नात्याची ही कहाणी म्हणजे फायर.

एरवी काटछाट करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने आश्चर्य म्हणजे फायर सिनेमाला एकही कट सांगितलं नाही. A सर्टिफिकेट देऊन सिनेमा पास केला.

नोव्हेंबर १९९८ रोजी फायर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. नावाप्रमाणे या सिनेमाला जाळपोळीचा सामना करावा लागेल याची कल्पना कोणी केली नव्हती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात जवळपास २०० शिवसैनिकांनी गोरेगाव येथील सिनेमॅक्स थेटर वर फायर विरोधात जोरदार निदर्शनं केली. सिनेमाचं पोस्टर जाळण्यात आलं, थेटर मधल्या काचा फोडण्यात आल्या.

मुंबईसारखं वातावरण दिल्लीत सुद्धा होतं. दिल्ली येथील रिगल थेटरच्या बाहेर मीना कुलकर्णी यांनी सिनेमाविरोधात आंदोलनं केली.

“महिलांची शारीरिक भूक जर एकमेकांशी संभोग करून भागत असेल, तर लग्न संस्था कोलमडून पडेल. नवी पिढी जन्माला येणार नाही.”

अशी मीना कुलकर्णी यांची भूमिका होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुरत येथे प्रेक्षकांवर लाठीने हल्ला केला.

आंदोलनं आणि निदर्शनामुळे सुरत आणि पुण्यातील सिनेमाचे खेळ थांबवण्यात आले. मुंबई येथे २९ जणांना या प्रकरणामुळे अटक झाली. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी.

“आंदोलन कर्त्यांनी जे केलं त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. या सिनेमाची कथा आपल्या संस्कृतीला घातक आहे.”

असं मत देऊन मनोहर जोशींनी ज्यांना अटक झाली त्यांना पाठिंबा दर्शवला.

याचा परिणाम असा झाला की, ४ डिसेंबर रोजी हा सिनेमा पुन्हा सेन्सॉर कडे पाठवला गेला. बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार, महेश भट्ट आणि सिनेमाच्या दिग्दर्शक दीपा मेहता यांनी सुप्रीम कोर्टात १७ पानी याचिका दाखल केली.

या याचिकेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित होता. दिलीप कुमार यांनी फायर सिनेमाला सपोर्ट केला आहे हे कळताच, १२ डिसेंबर रोजी ६० शिवसैनिकांनी दिलीप कुमार यांच्या घरासमोर अंडरवेयर आंदोलन केले. यापैकी २२ जणांना अटक झाली. यानंतर दिलीप कुमार तसेच इतर जणांची सुरक्षा वाढवण्यात आली.

“हा सिनेमा हिंदुत्वावर परिणाम करत आहे.” अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी या सिनेमावर टीका केली.

एका समलिंगी संस्थेचे कार्यकर्ते अशोक राव कवी यांनी विरोध करणाऱ्या सर्वांना सांगितलं,

“दोन स्त्रियांनी एकमेकांशी शारिरीक संग केला तर त्यात चुकीचं काय? असं होऊच शकत नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी खजुराहो आणि कोणार्क मंदिरावर कोरलेली शिल्प बघावी. या प्राचीन शिल्पांमध्ये या सबंधांचा उल्लेख आढळतो.

फायर सिनेमाला विरोध करणारे आणि सपोर्ट करणारे असे दोन गट पडले. या सर्व प्रकारात सिनेमात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या शबाना आझमी आणि नंदिता दास या दिग्दर्शक दीपा मेहता यांच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहिल्या. या सर्व कचाट्यातून , विरोध सहन करत फायर सिनेमा १२ फेब्रुवारी १९९९ रोजी सेन्सॉर बोर्डाकडून सुटला. आणि २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा प्रदर्शित झाला. यावेळी मात्र कोणीही कसलाही विरोध केला नाही. काही जणांच्या मते ‘फायर’ सिनेमावर संपूर्ण भारतात बंदी आणली. पण याबाबतीत अनेक मतमतांतरे आहेत.

समलिंगी संबंध दर्शविणारे अनेक प्रसंग खूपदा अश्लील वाटू शकतात. पण फायर च्या दिग्दर्शक स्वतः एक स्त्री होत्या. दीपा मेहता यांनी अत्यंत हळुवारपणे शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्यातलं नातं उलगडलं आहे.

सिनेमाला विरोध होणं हे उघड होतं. समाजाची संकुचित विचारसरणी याला कारणीभूत आहे. एक सुंदर , काळाच्या पुढे जाणारी कलाकृती म्हणून फायर ला प्रेक्षक आणि समीक्षकांनी नावाजले. स्पष्ट शब्दात सांगायचं तर .. सेक्स सीन कसे चित्रित करावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा. आता जरी समाज अशा कलाकृतींना विरोध करत नसला तरी वास्तव जीवनात समलिंगी संबंध स्विकारण्याची समाजाची मानसिकता आहे का ? हा चर्चेचा विषय आहे.

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. Pravin says

    मदन भाऊ पाटील यांची माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.