एक रिक्षावाला नाचत होता आणि सलमान माधुरी अनिल कपूर त्याचे बॅकग्राउंड डान्सर बनले होते.

कुठल्याशा तरी चनलवरील डान्स शो. थीम होती तीन पिढ्यांचे डान्सर आपली नृत्यकला सादर करतील. माधुरी दीक्षित या शोची जज होती. पहिलाच एपिसोड होता आणि सलमान खान, अनिल कपूर जॅकलीन फर्नांडीस रेस-३ या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. वेगवेगळे स्पर्धक स्टेजवर येत होते, अशातच एक डोक्यावर टक्कल, सुटलेलं पोट आणि पांढरी दाढीवाला स्पर्धक डान्स करण्यासाठी आला.

सलमानने त्याला गंमतीमध्ये म्हटले,

“अरे ये तो ३ जनरेशन का शो है ना? तो ये छठे जनरेशन के दादाजी कहां से आ गये?”

सगळे हसू लागले. काकांनी गाण देखील निवडल होतं ते अनिल कपूरच राम लखन मधलं फेमस ,

“वन टू का फोर माय नेम इज लखन.”

अतिशय एनर्जीने भरलेल्या या गाण्यावर पोट सुटलेले काका सुद्धा त्याच त्वेषाने डान्स करत होते. त्यांचे ते थिरकणारे पाय, त्यांनी मारलेली उडी बघून सगळे प्रेक्षक थक्क झाले. त्यांची चेष्टा उडवणारा सलमान सुद्धा आ वासून पहात होता. डान्स संपल्यावर सलमान, माधुरी. अनिल कपूर सकट सगळ प्रेक्षागृह उभे राहून टाळ्यांचा वर्षाव करत होते.

त्याच वेळी सलमान अनिल आणि माधुरीच्या कानात म्हणत होता, इस आदमी को पेहले कही देखा है.

त्या स्पर्धक काकानी आपली स्टोरी सांगितली.

त्याच नाव होतं फिरोज खान. मुळचा मुंबईचा. घरची परिस्थिती गरीबीची. फिरोजला लहानपणापासून डान्सची आवड होती. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्या टीममध्ये जॉईन झाला. ऐंशीच्या दशकातल्या अनेक सिनेमामध्ये तो हिरो हिरोईनच्या मागे नाचायचा, स्टेजवर त्याने डान्स केला त्या राम लखनच्या माय नेम इज लखन गाण्यातही तो अनिल कपूरच्या मागे गर्दीत डान्स करत होता.

सरोज खान यांची फेव्हरेट असणाऱ्या माधुरी दीक्षित बरोबर त्याचे चांगले सूर जुळले. राम लखन नंतर तेजाबमध्ये एक दो तीन या सुपरहिट गाण्यातही तो माधुरी दीक्षित यांच्या सोबत होता. खलनायक, वजूद, याराना. पुढे जेव्हा माधुरी वर्ल्ड टूरवर गेली तेव्हा तिच्या सोबत गेलेल्या टीममध्ये देखील फिरोजचा समावेश होता.

अक्षय कुमार सोबत देखील त्याने खिलाडी, दिल तेरा आशिक,तराजू अशा अनेक सिनेमात काम केल. त्यांची दोस्ती झाली. अक्षय कुमार जेव्हा शो मध्ये आला होता तेव्हा त्यांनी त्या काळच्या आठवणी जागवल्या.

पण दुर्दैवाने काळ बदलला. फिरोजच्या सोबत नाचणारे रेमो वगैरे डान्सर कोरेयोग्राफर बनले. फिरोज स्पर्धेत मागे पडत गेला. वय देखील वाढल होतं. दिग्दर्शक डान्सर म्हणून तरुण मुलांना संधी देत होते. एकेकाळी माधुरी सोबत नाचणारा फिरोज खान रोज युनियनच्या ऑफिसमध्ये कामाची वाट पाहून पाहून वैतागला. हे भरवश्याच काम घरच्यांच पोट भरू शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं.

एकदिवस त्याला जुन्या सामानात एक बिल्ला सापडला. तो रिक्षाचा बिल्ला होता. त्याने त्याच वेळी भरल्या मनाने डान्सला टाटा बाय बाय केला आणि रिक्षा चालवू लागला.

जवळपास ५ वर्षे रिक्षा चालवली. पण पहिलं प्रेम विसरल जात नाही अस म्हणतात. फिरोजच्या बाबतीतही तसच झाल.  एक दिवस त्याच्या मुलीने डान्स शोची जाहिरात बघितली आणि फिरोजला भाग घ्यायला लावल.

आता म्हातारपणी आपल्याला कोण घेणार अस फिरोजला वाटत होतं पण त्या शोचा फॉरमॅट तीन पिढ्यांचा असल्यामुळे फिरोजची निवड झाली आणि जवळपास १४ वर्षांनी तो डान्स फ्लोरवर आला आणि तेही आपल्या आयडॉल असणाऱ्या माधुरीसमोर डान्स केला.

माधुरीने त्याला विचारले देखील एवढ्या वर्षात तू मला संपर्क करायचा प्रयत्न का केला नाहीस. तेव्हा फिरोज म्हणाला,

 मी रिक्षा चालवताना अनेकदा तुमच्या ऑफिस खालून जायचो, एकदा तर तुम्ही मला दिसला देखील. तुम्हाला हाक मारायची इच्छा झाली होती पण मला वाटलं की तुम्ही मला ओळखणार नाही म्हणून मी निघून गेलो.

त्याची स्टोरी ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सलमान देखील हेलावला. अनिल कपूरने फिरोजला विनंती केली की

तीस वर्षापूर्वी माय नेम इज लखन मध्ये तू माझ्या मागे नाचला होतास आज मला तुझ्यासोबत याच गाण्यावर नाचायच आहे तेही तुझ्या मागे. 

आणि खरोखर घडलही तसच. एक रिक्षावाला स्टेजवर नाचत होता आणि सलमान खान, अनिल कपूर माधुरी त्याच्या मागे बॅकग्राउंड डान्सर बनले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.