कोण होता फिरोजशहा कोटला ज्याच नाव बदलून स्टेडियमला अरुण जेटलींच नाव देण्यात आलंय?

मध्यंतरी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक स्थळांचे नामकरण करण्याचा सपाटा लावला होता. रस्त्याचं नामकरण काय, रेल्वे स्टेशनचे नामकरण काय. रोज कुठल्या ना कुठल्या स्थळाच नामकरण केल्याच्या बातम्या यायला लागल्या होत्या. तर आता थोड्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा नामकरणाचा विषय बाहेर आलाय. मात्र यावेळी ही मागणी  योगींनी केलेली नसून दिल्ली डीस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनने घेतलेला निर्णय आहे. त्यांनी दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडीयमचे नाव बदलून अरुण जेटली कोटला स्टेडीयम करण्याचा निर्णय घेतलाय.

सध्या स्टेडीयमला फिरोज शाह याचे नाव आहे तो फिरोज शाह कोण होता ?

पूर्ण नाव फिरोज शाह तुघलक. हा दिल्लीचा सुप्रसिद्ध सुलतान मुहम्मद बिन तुघलक यांचा चुलत भाऊ आणि त्याच्यानंतर दिल्लीच्या गादीवर बसणारा सुलतान होता.

दिल्लीच्या तख्तावर अनेक राजघराण्यांचा उदय आणि अस्त झालाय. त्यातीलच एक तुघलक घराणे. मोहम्मद बिन तुघलकमुळे या घराण्याला आपण ओळखतो. त्याची ओळखचं ‘वेडा मोहम्मद’ अशी आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत  अनेक धडाकेबाज निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ सोन्याची नाणी चलनातून बंद करून तांब्याची नाणी सुरु करणे, राजधानी दिल्लीतून देशाच्या मध्यवर्ती म्हणजे दौलताबादला हलवणे पण दुर्दैवाने पूर्ण विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे तो तोंडावर पडला. हे सगळे निर्णय त्याला परत घ्यावे लागले.

मोहम्मद तुघलकने घातलेल्या गोंधळामुळे अशी परिस्थिती झाली की त्याच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर बसायला त्याचा कोणीच वारस तयार होईना. सगळीकडे अनागोंदीचं वातावरण झालं होतं. अखेर त्याच्या पुतण्याला म्हणजेच फिरोजशाहला दिल्लीचा सुलतान बनवण्यासाठी मनवण्यात आलं.

फिरोज शहाने इसविसन १३५१ पासून १३८८ पर्यंत तब्बल ३७ वर्षे दिल्लीच्या गादीवर बसून राज्य केलं. त्याने संपूर्ण देशाची विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न केला. राज्याभिषेकानंतर त्याने चांदीचे सिक्के चलनात आणले. याचसोबत त्याने अन्य २४ कष्टदायक कर रद्द केले होते. फक्त खराज, खुस्म, जकात आणि जजिया हे चार कर चालू ठेवले होते. फिरोजशाह एक कट्टर सुन्नी मुस्लीम होता. इस्लाम न स्वीकारणाऱ्या हिंदू धर्मियांना जिम्मी म्हणायचा आणि त्यांच्यावर जजियाकर लावायचा.

आंतरिक व्यापार वाढविण्यासाठी व्यापारावरील अनेक कर रद्द केले होते. आणखी त्याने सगळे कर्ज माफ करून दिले होते. ज्यात ‘सोंधर कर्ज’ समाविष्ट होतं जे मुहम्मद बिन तुघलाकच्या काळात शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं. सिंचनाच्या दृष्टीने यमुना नदीवर पाच मोठे कालवे बांधून घेतलेले. शिवाय फळांच्या जवळपास १२०० बागांची लागवड केली होती. आपल्या कल्याणकारी योजनांतर्गत त्याने एका रोजगार कार्यालयात मुस्लीम अनाथ स्त्रिया, विधवा यांच्या मदतीसाठी दीवान-ए-ख़ैरात नावाचा विभाग सुरु केलेला. शिक्षणाच्या प्रचारासाठी त्याने जवळपास १३ मदरशांची स्थापना केली होती. अनेक मुफ्त युनानी दवाखाने सुरु केले होते.

त्याने अनेक विकासाची कामे केली पण कट्टर धर्मांधतेमुळे तो कधी प्रजेचा लाडका बनला नाही. असं म्हणतात की त्याने पुरीचे जगन्नाथ मंदिर देखील लुटले होते. तेथील ग्रंथालयातून आणलेल्या अनेक ग्रंथांचा मात्र त्याने संस्कृतमधून पर्शियन भाषेत भाषांतर करवून घेतले होते. 

फिरोजशाहने सुमारे ३०० शहरांचे निर्माण केले. ज्यात हिसार, फिरोजाबाद, फतेहाबाद, जौनपुर, फिरोजपुर या प्रमुख शहरांचा समावेश होता. यातील दिल्लीमध्ये यमुना नदीच्या काठावर वसवलेलं फिरोजाबाद त्याचं आवडत शहर होतं. हीच त्याची राजधानी देखील होती. या ठिकाणी त्याने अनेक आकर्षक वास्तू बनवल्या. यात त्याने बनवलेला किल्ला देखील होता.

त्या किल्ल्याला फिरोजशहा कोटला म्हणजेच फिरोजशहाचा किल्ला असं म्हटल जात. या किल्ल्याच्या उभारणीसाठी देखील सुलतानाने प्रचंड कष्ट घेतले होते. त्याने मीरत वरून दोन अशोक स्तंभ मागवले होते आणि ते या किल्ल्यातील राजवाड्याच्या दाराशी उभे केले. तो किल्ला म्हणजे फिरोजशहा चे स्वप्न होते.

या फिरोजशहा कोटला परिसरातील मैदान म्हणून दिल्लीच्या स्टेडियमला फिरोजशाह कोटला स्टेडियम असं म्हटल जायचं. हे मैदान भारतातील इडन गार्डन नंतर दुसरे सर्वात जुने मैदान आहे. याची उभारणी १८८३ साली झाली. या मैदानात अनेक अविस्मरणीय सामने झाले आहेत ज्यात कुंबळेने पाकिस्तानच्या एका डावात घेतलेल्या १० विकेट्सचा देखील समावेश आहे.

भारतातील सुंदर मैदानात या या कोटला स्टेडियमचा समावेश होतो. या स्टेडियम ची मालकी डीडीसीए उर्फ दिल्ली डीस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनकडे आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री कै. अरुण जेटली अनेक वर्षे दिल्ली डीस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष तर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राहिलेले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच वीरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा, गौतम गंभीर, विराट कोहली, रिषभ पंत सारखे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाला मिळाले.

त्यामुळे त्यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ सध्याचे डीडीसीएचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी स्टेडियमला त्यांचे नाव देण्याचे ठरवल आहे. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मैदानाच नाव बदलणार नसून ते फिरोजशहा कोटला मैदान असंचं राहणार आहे.  येत्या १२ सेप्टेंबर रोजी होणाऱ्या एका समारोहात स्टेडियमचा नामकरणाचा सोहळा पार पडणार आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.