पहिल्याच बजेट वेळी एक घटना घडली आणि आपले अर्थसंकल्प सिक्रेट ठेवले जाऊ लागले.

आपल्याला कळो अथवा न कळो, अर्थसंकल्पाचा दिवस म्हणजे संपूर्ण देशासाठी महत्वाचा असतो. शेअर मार्केट वर खाली होत असतात, सोन्याचे दर पासून सिगरेटच्या दरापर्यंत आपल्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टी या बजेट भोवती फिरत असतात. अर्थमंत्र्याच्या पोतडीत काय दडलंय याची उत्सुकता दारुड्यापासून ते नेते मंडळींपर्यंत प्रत्येकाला असते.

१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री भाषण करे पर्यंत बजेट काय असणार याचा कोणालाच अंदाज नसतो. एवढंच काय जेव्हा या अर्थसंकल्पाची प्रिंटिंग होत असते तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केलं जातं. त्यांना त्यांच्या घरच्यांना सुद्धा भेटू दिल जात नाही.

अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो कि हे अर्थसंकल्प सिक्रेट कधी पासून ठेवले जाऊ लागले?

वर्ष १९४७. १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या ठोक्याला भारताने ब्रिटिश पारतंत्र्याची जोखड आपल्या मानेवरून दूर झाले. आता आपला देश आपण चालवणार हि भावनाच सगळ्यांना प्रेरणा देणारी होती. पहिल्या पंतप्रधानपदाची जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कडे तर उपपंतप्रधानपद आणि गृहमंत्री पद सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कडे आलं होतं.

भारताचे पहिले अर्थमंत्रिपद षण्मुखमम चेट्टी यांच्याकडे दिलं गेलं होतं. विशेष म्हणजे हे चेट्टी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते.

अगदी सुरवातीपासून जस्टीस पक्षाशी त्यांची बांधिलकी होती. कोच्चीच्या राजाचे दिवाण म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. अर्थशास्त्रातील त्यांचे ज्ञान जगात वाखाणले गेले होते. प्रसंगी ब्रिटिश धार्जिणे नेते म्हणून टीका देखील झाली पण तरीही नेहरूंनी पक्षाबाहेरच्या या नेत्याला अर्थमंत्रालय सोपवलं.

२६ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताचे पहिले अर्थसंकल्प मांडले जाणार होते.

षण्मुखम चेट्टी जोरदार तयारी करून हे बजेट बनवत होते. भारताची आर्थिक दिशा या अर्थसंकल्पावरून ठरली जाणार होती. कोणतीही चूक राहिली जाऊ नये यासाठी चेट्टी प्रयत्नशील होते. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे लागून राहील होतं.

इंग्लंडच बजेट देखील याच दरम्यान मांडलं जात होतं. तेव्हाचे त्यांचे अर्थमंत्री होते ह्यू डाल्टन. हे दिग्गज अर्थशास्री होते. ते लेबर पक्षाचे मोठे नेते होते. नेव्हिल चेंबर्लेन यांच्या खास विश्वासातील नेते म्हणून त्यांना ओळखलं जायचं.

बजेट सादर करायच्या दिवशी डाल्टन साहेब संसदेत लवकर हजर झाले. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सगळे खासदार त्यांची वाट बघत होते. झालं असं होतं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनच्या संसदेवर जर्मन विमानांनी हल्ला करून नुकसान केलं होतं. यामुळे डाल्टन यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पोहचण्यासाठी थोडस चालत जाव लागणार होतं. त्यांचा जो असिस्टंट होता त्याला त्यांनी भाषण करण्याच्या जागी पाण्याचा ग्लास वगैरे आहे का हे चेक करायला पाठवून दिलं होतं.

थोडेसे वयस्कर असलेले ह्यू डाल्टन आपल्या हातात ब्रिफकेस घेऊन हळूहळू निघाले तेव्हा रस्त्यात त्यांचा जॉन कार्व्हल नावाचा मित्र भेटला. त्याने सहज काय काय महाग झालं हे उत्सुकतेने विचारलं. ह्यू डाल्टन यांचा स्वभाव बडबड्या होता. ते सहज बोलून गेले,

“No more on tobacco; a penny on beer; something on dogs and pools but not on horses; increase in purchase tax, but only on articles now taxable; profits tax doubled.”

हे एकच वाक्य सहज बोलून गेले. काही क्षणांचा फरक. तिथून ते लोकसभेत पोहचले.

जवळपास अर्ध्या तासाने त्यांनी अर्थसंकल्पावर भाषण सुरु केलं. पण गंमत म्हणजे डाल्टन यांचं भाषण सुरू होण्याच्या आधी दहा मिनिटे शेअर मार्केट कोसळला. कारण काय तर डाल्टन यांनी ज्या जॉन कार्व्हल नावाच्या मित्राला मगाशी एक वाक्य बोललं होत ते त्यांनी आपल्या मुलाला जाऊन सांगितलं. हा मुलगा म्हणजे स्टार वर्तमानपत्राचा रिपोर्टर होता.

त्याने काय महाग होणार काय स्वस्त होणार याची बातमी अर्थसंकल्प होण्याच्या आधी काही मिनिटे फोडली आणि त्याच्या ब्रेकिंग न्यूजमुळे लंडनच्या शेअर मार्केट मध्ये राडा झाला.

लोकसभेत अर्थसंकप सादर करत असताना बाहेर काय गोंधळ सुरु आहे याची पंतप्रधान, खासदार आणि स्वतः ह्यू डाल्टन यांना कल्पनाच नव्हती. जेव्हा ही मंडळी बाहेर आली तेव्हा या महाभारताचा अंदाज आला. पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांची त्यांच्या बडबडेपणावरून जाहीर खरडपट्टी काढली.

ह्यू डाल्टन यांना आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

हे सगळं घडत असताना आपले अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी भारताचा अर्थसंकल्प बनवत होते. इंग्लंडमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद भारतात देखील उमटले. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चेट्टी यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना दिली. भारताचे अर्थमंत्री या घटनेमुळे  प्रचंड हादरले.

बजेट जर सिक्रेट ठेवलं नाही तर काय होतं याचा अंदाज डाल्टन यांच्या मुळे संपूर्ण जगाला आला होता. दुधाने तोंड भाजलं कि ताक ही फुंकून प्यावे असं म्हणतात त्याप्रमाणे चेट्टी यांनी स्वतःला गाडून घेतलं. पत्रकारच सोडा ते इतर कोणालाही भेटले नाहीत.

आपलं बजेट राष्ट्रपती भवनाच्या प्रेस मध्ये छापण्यात आलं. प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली. 

२६ नोव्हेम्बर १९४७ रोजी भारताचं पहील बजेट सादर झालं. १७१.१५ कोटी रुपये महसुलातून गोळा होणार आणि खर्च १९७.२९ कोटींचा होणार होता. सर्वाधिक म्हणजे ९२.७४ कोटी रुपये संरक्षण दलासाठी ठेवण्यात आले होते. चेट्टी यांनी कोणतेही नवीन टॅक्स जनतेवर लादले नव्हते. साधा सरळ सोपा बजेट म्हणून स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटकडे पाहिलं गेलं.

षण्मुखम चेट्टी दोन वर्षे भारताचे अर्थमंत्री होते. या काळात बजेट गोपनीय कसा राहील या कडे त्यांनी सर्वाधिक लक्ष दिलं. चेट्टी यांच्या नंतर अर्थमंत्री बनलेल्या जॉन मथाई यांनी गोपनीयतेकडे म्हणावं तेव्हढा भर दिला नाही.

याचाच परिणाम १९५० साली भारताचे अर्थसंकल्प राष्ट्रपती भवनातून लीक झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांनी याचे गांभीर्य ओळखून अर्थसंकल्प गोपनीय राहावा यासाठी मोठे निर्णय घेतले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवनाच्या बाहेर मिंटो रोडवरील एका प्रेस मध्ये होऊ लागली. दिल्ली पोलिसांचे मोठे संरक्षण त्या प्रेसला दिले जाऊ लागले.

१९८० साली तर आज होते त्या प्रमाणे साऊथ ब्लॉकच्या तळघरात अर्थसंकल्प तयार होऊ लागले.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.