१०० वर्षांपूर्वीचा पारसीबाबा सिरीयलवाल्या CID पेक्षाही जास्त फेमस होता.

आज आपण सीआयडी म्हटलं तर शिवाजी साटम यांचा एसीपी प्रद्युमन आठवतो. कुछ तो गडबड है म्हणत अवघड केस सॉल्व्ह करणारा सीआयडी, त्याची दया, अभिजित, डॉक्टर साळुंखे यांची टीम  म्हणजे भारतातला जेम्स बॉण्डचा दुसरा अवतारच. म्हणजे कधी कसलाही गुन्हा घडू दे, गुन्हेगार कितीही शातीर दिमाग वाला असुदे सीआयडी त्याला शोधून काढणारच याची आपल्याला शंभर टक्के खात्री असते.

पण ही सीआयडी म्हणजे सिनेमा सिरीयल मधली कुठली काल्पनिक टीम नाही. भारतीय पोलीसचा हा खरा विभाग आहे. अगदी सिरीयलमध्ये दाखवतात त्याप्रमाणे मसालेदार नाही पण अतिशय किचकट, गुंतागुंतीच्या केसेस पोलीस या डिपार्टमेंट कडे सोपवतात. पोलिसदलातील सर्वोत्तम व चलाख ऑफिसर्सची निवड सीआयडीमध्ये होत असते.

तुम्ही म्हणाल हे सगळं माहित आहे हो. पण तुम्हाला पहिला भारतीय सीआयडी कोण होता हे ठाऊक आहे काय ?

त्याच नाव कावसजी जमशेदजी पेटिगारा. नावावरूनच कळालं असेल कावसजी जन्माने पारसी होते.

स्वातंत्र्यापूर्वीचा एकोणिसाव्या शतकाचा काळ. भारतात इंग्रजांची पकड घट्ट झाली होती. कलकत्ता त्यांची राजधानी होती पण व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी मुंबई शहर आपले मुख्य केंद्र बनवले होते. युरोप अमेरिकेशी बऱ्यापैकी व्यापार मुंबई बंदरामधून चालायचा.

मुंबई हळूहळू महानगर बनत चालले होते. अनेक उद्योगधंदे उभारत होते. कापड गिरण्या कारखाने सुरु होत होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोटापाण्याचा धंदा शोधण्यासाठी मुंबईला येत होते. 

प्रचंड वाढत्या लोकसंख्येमुळे गावातली गुन्हेगारी देखील वाढत चालली होती. बकाल वस्त्या दारूचे अड्डे तिथले लहान मोठे गुंड आपली दहशत पसरवत होते. स्मगलिंगचा धंदा मूळ धरू लागला होता. मुंबईत संघटित गुन्हेगारीचे देखील प्रकार वाढत चालला होता.

यावर यावर घालण्यासाठी १८९५ मध्ये लंडन पोलीसच्या धर्तीवर मुंबई पोलीस मध्ये देखील सशस्त्र शाखेची स्थापना करण्यात आली. पोलीस शिपाई मार्टिनी हेन्रीस या ठासणीच्या रायफलने सुसज्ज होते, जिचा वापर करून पोलिसांची दहशत बसवण्यात आली.

मुंबईत १८७७ साली जन्मलेले कावसजी जमशेदजी पेटीगारा यांचे प्राथमिक शिक्षण प्रथम सुरतेत आणि मुंबईत झाले.

कोणतेही खास पोलिसी प्रशिक्षण झालेले नसताना ही त्यांची हुशारी बघून मुंबई पोलीसमध्ये त्यांची भरती करण्यात आली. त्याकाळी अशा प्रशिक्षण नसलेल्या पोलिसांना ‘वर्दी’ नसलेले म्हणून ‘सफेदवाला’ असे म्हणत. हा सध्या कपड्यांमधला सफेदवाला म्हणून कावसजी यांनी सुरवात केली. ते वर्ष होतं १९०३.

कावसजी भरती झाले याच काळात मुंबई पोलीसमध्ये गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीची स्थापना करण्यात आली होती. कावसजी यांचं कर्तृत्व, त्यांची गुन्हेगारांना शोधून काढायची खास हातोटी हे पाहून त्यांची या सीआयडी मध्ये बदली करण्यात आली.

फक्त बदलीचा नाही तर त्यांना प्रमोशन देखील मिळाले. त्यांची सीआयडी मधली नियुक्ती सब इन्स्पेकटर म्हणून करण्यात आली होती.

त्याकाळी सीआयडी खात्याचे दोन उपविभाग होते. गुन्हेगारी आणि राजकीय. यापैकी राजकीय उपविभागात कावसजी पेटीगरा होते. त्याकाळी स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जोर पकडत होती. तेव्हा तिथे राजकीय घडामोडी काय घडतात, कोणता पक्ष सरकार विरुद्ध काय हालचाली करत आहे याची बित्तंबातमी काढायची जबाबदारी पेटीगारा यांच्याकडे असायची.

सीआयडी मध्ये कावसजी यांनी झपाट्याने केलेले काम पोलीस खात्यात प्रचंड गाजले. त्यांनी बनवलेलं खबऱ्यांच जाळं जबरदस्त होतं. मुंबईत घडणारी कोणतीही घडामोड या पारशीबाबाच्या नजरेतून सुटत नाही असं म्हटलं जायचं. डाव्या विचारांची चळवळ भारतात रुजवणारे मानवेंद्रनाथ रॉय यांनी एक आंतरराष्ट्रीय कट करण्याचा प्रयत्न केला होता तो कावसजी सीआयडी असताना त्यांनी हाणून पाडला.

१९१२ साली कावसजी पेटीगरा यांना ब्रिटिश सरकारने खानबहादूर ही पदवी दिली.

त्याकाळी इंग्रज अधिकारी भारतीयांना पोलीस खात्यात मोठ्या पदावर नियुक्ती करण्यास नाखूष असायचे. पण तरीही कावसजी पेटीगारा त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर वरच्या पदांवर भराभर बढती मिळवत गेले. १९१९ साली त्यांची पोलीस सुप्रीटेंडेंट म्हणून निवड झाली. पुढच्या पाच वर्षात त्यांनी इम्पेरियल मेडल देखील मिळवलं.

या कर्तृत्वान पोलिसाला १९२८ साली मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचचा ‘डीसीपी’ म्हणजे पोलीस उपआयुक्त बनवण्यात आलं. या उच्चपदावर नियुक्त झालेले ते पहिले भारतीय होते. त्यांना १९३४ साली तेव्हाचे सर्वोच्च किंग्ज मेडल देऊन सन्मान करण्यात आला होता.

विशेष म्हणजे ब्रिटिशांचा विश्वास जिंकणारा हा पोलीस अधिकारी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांच्या जवळकीमधला होता.

महात्मा गांधीजींच्या सोबत असणारी त्यांची मैत्री तर सर्वश्रुत होती. गांधीजींना जेव्हा गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचं होतं तेव्हा त्यांच्या पासपोर्टसोबत दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारसपत्रे लागणार होती. गांधीजींनी त्यापैकी एक पत्र कावसजी पेटीगारा यांचे घेतले!

आजही हे पत्र मणिभवनमध्ये ठेवलेले आहे.

गांधीजींना जेव्हा जेव्हा मुंबईत ब्रिटिश सरकारकडून अटक व्हायची तेव्हा ते कावसजी पेटीगारा यांना बोलावून घ्यायचे. त्यांच्या समक्षच गांधीजींना अटक व्हायची. एवढा गांधीजींचा विश्वास त्यांनी जिंकला होता.

मुंबईचे तत्कालीन प्रसिद्ध सर्जन डॉ. गिल्डर हे ही सच्चे गांधीवादी. गांधींच्या मुंबईतल्या प्रत्येक आंदोलनात ते  हजर असायचे. एकदा असेच आंदोलन चालू होते व गांधीजी आपल्या कार्यकर्त्यांसह अटक होण्यासाठी निघाले होते. तेव्हा त्यांनी डॉ.गिल्डर यांना निरोप पाठवला की तुम्ही देखील आमच्या सोबत सहभागी व्हा. पण तेव्हा नेमके डॉ. गिल्डर हे कावसजी यांच्यावरच उपचार करत होते. हे कळल्यावर गांधीजींनी त्यांना आंदोलनातून बाहेर राहण्याची परवानगी दिली.

विशेष म्हणजे कावसजींचे गांधीजींशी जवळचे संबंध गांधीजींच्या मृत्यूनंतरही संपले नाहीत!

कावसजींचा सुपुत्र नोशिरवान, गांधीजींच्या हत्येच्या खटल्यात सरकारी वकिलांचा प्रमुख सहायक सॉलिसिटर होता. ब्रिटिश सरकारचा भरवसा आणि जनतेचा आदर मिळवणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याच्या १९४१ साली झालेल्या निधनानंतर लोकांनी वर्गणी जमवून त्यांचा संगमरवरी पूर्णाकृती पुतळा मुंबईत धोबी तलाव येथे उभारला आहे!

आज सिरियलच्या सीआयडी प्रद्युमनला जे वलय आलंय त्याची सुरवात या मुंबईच्या पहिल्या सीआयडीपासून झाली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.