नेहरूंनी सर्वात श्रीमंत माणसाला जेल मध्ये घातलं आणि LIC ची स्थापना झाली.

एकोणिसाव्या शतकातला उत्तरार्ध. राजस्थान मधल्या छोट्या गावातून आपलं नशीब उजळविण्यासाठी दोन मारवाडी भाऊ कलकत्त्याला आले. रामकिशन दालमिया आणि जयदयाल दालमिया. त्यांचा मामा कलकत्त्यामध्ये ट्रेडिंग दलाल म्हणून काम करायचा. त्याच्या हाताखाली राहून काम शिकून घेतल.

रामकिशन जात्याच धूर्त होता. त्याने फक्त धंदा शिकूनच घेतला नाही तर काही दिवसात मामा सकट सगळ्या कलकत्ता मार्केटला मागे टाकलं.

नशिबाने देखील त्याला साथ दिली. ज्या धंद्याला हात लावेल त्याच सोन होतं होतं. त्याने बिहारमध्ये साखर कारखाना काढला. त्यात बराच पैसा छापला. काही वर्षात कमोडीटी मार्केटचा भारतातला सर्वात मोठा दलाल बनला.

त्यातच त्याच्या पहिल्या बायकोच्या मुलीच लग्न शांतीप्रसाद जैन नावाच्या एका खटपट्या तरुणाशी झालं. आपल्या जावयाला घेऊन त्याने दालमिया-जैन ग्रुपची स्थापना केली. तिथून पुढचा काळ तर उत्कर्षाचा होता.

त्यांनी एसीसी सिमेंटला फाईट देण्यासाठी सिमेंट कंपन्या स्थापन केल्या. जावयाने बेनेट आणि कोलमन या कंपनीकडून आशियातला सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा टाईम्स ऑफ इंडिया हा वर्तमानपत्र विकत घेतला. भारत इंश्युरंस नावाची विमा कंपनी स्थापन केली. दालमिया जैन विमान कंपनी सुरु केली.

टाटा-बिर्ला यांच्या सोबत भारतातला सर्वात मोठा उद्योजक म्हणून रामकिशन दालमिया याचं देखील नाव घेतल जायचं.

त्यांची अफाट संपत्ती, त्यांनी केलेली ५-६ लग्ने, प्रत्येक बायकोला राहण्यासाठी बांधलेले राजवाडे, त्यांची १७ मुल याची खुमासदार चर्चा तेव्हाच्या मिडिया मध्ये असायची.याशिवाय ते राजकीय क्षेत्रात देखील सक्रीय होते. मुस्लीम लीगचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना बरोबर त्यांचे अगदी घरगुती संबंध होते. अस म्हणतात की जिना यांची बहीण फातिमा हिच्याशी देखील त्यांना लग्न करायचं होतं.

फाळणी नंतर जिना याचं दिल्लीमधील घर त्यांनीच विक्रमी किंमत देऊन खरेदी केलं होतं.

पण गंमत म्हणजे याच सोबत दालमिया हे एक कट्टर हिंदुत्ववादी देखील होते. आपल्या गुरु असणाऱ्या करपात्री महाराज यांना रामराज्यपरिषद या राजकीय पक्षाची उभारणी करण्यासाठी मोठी आर्थिक मदत त्यांनी दिली होती. याच करपात्री महाराज यांनी १९५२च्या निवडणुकीत ४ खासदार निवडून आणले.

करपात्री महाराज आणि पर्यायाने रामकिशन दालमिया यांच्यावर पंतप्रधान नेहरूंचा राग होता.

यातच भारतीय समाजसुधारणेसाठी नेहरूंनी संसदेत हिंदू कोड आणले. याला तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी विरोध केला पण नेहरूंनी लोकसभेतील संख्याबळावर हे बिल पास केल. अस म्हटल जात की या विरोधामागे देखील रामकिशन दालमिया होते. याचा परिणाम असा झाला की नेहरूंनी दालमिया यांना वैयक्तिक शत्रू मानलं.

पंडीत नेहरू हिशोब चुकता करण्यासाठी योग्य वेळेचे वाट पहात होते. आणि ती संधी लवकरच चालून आली.

रामकिशन दालमिया यांनी वेगवेगळ्या आर्थिक उलाढाली करण्यासाठी भारत इंश्युरंस कंपनीतील रिझर्व्ह कॅशमधून अवैधरित्या तब्बल 2 कोटी रुपये काढले. ही चूक त्यांना महागात पडली. त्यांचे इतर व्यवहार फसल्यामुळे काढलेले पैसे कंपनीत जमा करणे अशक्य झाले.

 १९५६ मध्ये हे प्रकरण उघडकीस आलं. हजारो लोकांची कष्टाची कमाई यात अडकली. सर्वत्र आक्रोश सुरु झाला.

दालमिया यांना टाईम्स ऑफ इंडिया आणि जयपूर उद्योग या आपल्या कंपन्यामधील भागीदारी शान्तिप्रसाद जैन यांना विकावी लागली आणि त्या पैशातून भारत इन्शुरन्स कंपनीमध्ये परत भरणा केली व सर्व घोटाळ्याबाबत कबुलीजबाब देखील दिला. मात्र नेहरूंच्या सरकारने त्यांना दया दाखवली नाही.

याप्रकरणी विव्हियन बॉस चौकशी समिती स्थापन केली जिने रामकिशन दालमिया यांना दोषी ठरवल आणि फौजदारी गुन्हयासाठी खटला चालवला गेला. सुमारे ७ वर्षे त्यांनी या खटल्यात स्वतःचा बचाव करून पाहिला मात्र तरीही त्यांना 2 वर्षांची कारावासाची शिक्षा झालीच.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आर्थिक घोटाळ्यासाठी तुरुंगात गेलाय स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच अस घडल होतं .

त्याचे १०० कोटींचे साम्राज्य खालसा झाले. या आर्थिक घोटाळ्याचे परिणाम दूरवर झाले. नेहरू सरकारवर दबाव आला. त्यांनी 1 सप्टेंबर १९५६ रोजी भारतातील सर्व विमा कंपन्या विसर्जित करून एलआयसी या एकमेव राष्ट्रीयकृत विमा कंपनीची स्थापना केली व पॉलिसी धारकांना दिलासा दिला.

गंमत म्हणजे पुढच्या दोनच वर्षात याच एलआयसी मध्ये हरिदास मुंध्रा या उद्योगपतीने केलेला आर्थिक घोटाळा सापडला आणि नेहरू सरकारवर प्रचंड टीका झाली. हा घोटाळा उघडकीस आणण्यात नेहरूंचे जावई फिरोज गांधी सगळ्यात आघाडीवर होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.