चेतन शर्माला आजही त्या सिक्सरसाठी ओळखताय, हे वाचा मत बदलेल..!!!

चेतन शर्मा हे नांव भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनावर कायमचं कोरलं गेलंय ते जावेद मियादादकडून शेवटच्या बॉलवर खाल्लेल्या सिक्सरसाठी.

चेतन शर्माचं नांव जेव्हा कधी निघत, तेव्हा मियादादचा हा सिक्सर सुद्धा भारतीयांना आठवतो. १९८६ सालच्या आशिया चषकाच्या फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर पाकिस्तानला जिंकण्यासाठी ५ रन्स हव्या होत्या. बॉल चेतन शर्माच्या हातात होता. चेतन शर्माने टाकलेल्या शेवटच्या बॉलवर जावेद मियादादने खणखणीत सिक्सर ठोकला आणि भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला होता.

तर ही झाली भारतीय क्रिकेटमधल्या ‘त्या’ दुखद सिक्सरची आठवण.

परंतु त्याचवेळी आपण वर्षभरानंतर चेतन शर्माने जागतिक क्रिकेटमध्ये घेतलेल्या विश्वचषकातल्या पहिल्या-वहिल्या हॅट्रिकला मात्र विसरलेलो असतो.

१९८७ चा क्रिकेट वर्ल्डकप.

८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर १९८७ या महिनाभराच्या कालावधीत क्रिकेटजगतातील ८ संघांनी सहभाग नोंदवलेला हा वर्ल्डकप प्रथमच इंग्लंडच्या बाहेर खेळविण्यात आला होता. या आधीच्या तीन्हीही वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये भरविण्यात आल्या होत्या.  १९८७ मध्ये मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयुक्तपणे वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं आणि ५० ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये खेळविण्यात आलेला हा पहिलाच वर्ल्डकप होता.

३१ ऑक्टोबर १९८७, नागपूरचं व्हीसीए स्टेडीयम.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना. ग्रुपमधला हा शेवटचा सामना होता. भारताने यापूर्वीच्या आपल्या ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवत आधीच सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं होतं. साखळी फेरीतला आपला एकमेव पराभव वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झाला होता. तो देखील फक्त १ रनने. अर्थात या पराभवाची सव्याज परतफेड देखील भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांचा ५६ धावांनी पराभव करत केली होती. दुसरीकडे न्यूझीलंडचं स्पर्धेतील आव्हान मात्र संपलं होतं.

न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता.

४१ ओव्हरनंतर न्यूझीलंडच्या स्कोअर बोर्डवर १८२ रन्स लागल्या होत्या आणि त्यांच्या ५ विकेट्स पडल्या होत्या. ४२ वी ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार कपिल देवने बॉल चेतन शर्माच्या हातात सोपवला होता.

चेतन शर्माने पहिले ३ बॉल डॉट टाकले होते. आता स्ट्राईकवर होता के.आर. रुदरफोर्ड.चेतन शर्माने आपल्या ओव्हरचा चौथा बॉल टाकला आणि या बॉलने थेट रुदरफोर्डचा मधला स्ट्म्प उडवला.

त्यानंतर क्रीझवर आला तो आयडीएस स्मिथ. स्मिथचे देखील तेच हाल जे रुदरफोर्डचे झाले होते. यावेळी फक्त स्ट्म्प बदलला होता. स्मिथचा ऑफ स्ट्म्प उडाला होता.

आता ओव्हरचा शेवटचा बॉल होता आणि चेतन शर्मा हॅट्रिकवर होता.

स्मिथचा ऑफ स्टंप आणि रुदरफोर्डचा मिडल स्टम्प आधीच उडाला होता आणि आता स्वतःचा लेगस्टम्प सांभाळण्याची जबाबदारी इ.जे. चॅटफिल्डवर होती. चेतन शर्माने शेवटचा बॉल टाकला आणि व्हीसीएवरील भारतीय क्रिकेटरसिकांनी एकंच जल्लोष केला.

चॅटफिल्डचा लेग स्टम्प उडवत चेतन शर्माने वर्ल्डकपच्या इतिहासातील पहिली हॅट्रिक नोंदविली होती. 

ज्या हॅट्रिकमध्ये बॅट्समनचे वेगवेगळे तीन्ही स्टम्पस उडवले अशी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बहुतांश एकमेव हॅट्रिक असावी.

पुढे न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित ५० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून २१५ रन्स केल्या. न्युझीलंडचं २१६ रन्सचं लक्ष्य भारतीय संघाने सुनील गावस्करच्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीमधील पहिल्या आणि एकमेव शतकाच्या जोरावर ३२ ओव्हर्समध्येच पूर्ण करत सहज विजय मिळवला.

या विजयामुळे भारतीय संघाने नेट-रनरेटच्या आधारे ग्रुपमध्ये पहिलं स्थान देखील मिळवलं. सुनील गावसकर आणि चेतन शर्मा यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आलं.

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.