विदेशी भूमीवर शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू…!!!

 

सैय्यद मुश्ताक अली. भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातलं  एक खूप महत्वाचं नांव. सी. के. नायडू नावाच्या पारखी माणसाने, जे की भारताच्या कसोटी संघाचे पहिले कॅप्टन होते त्यांनीच मुश्ताक अली नावाचा क्रिकेटर भारताला दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या छोट्याशा कारकिर्दीत त्यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासावर आपला ठसा उमटविला. १९३६ च्या इंग्लंड दौऱ्यातील ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर ज्यावेळी त्यांनी शतक झळकावलं त्यावेळी विदेशी भूमीवर शतक झळकावणारे ते पहिलेच भारतीय फलंदाज ठरले. या सामन्यात त्यांनी ११२ रन्सची इनिंग साकारली होती. यावेळी विजय मर्चंट यांच्याबरोबर २०३ रन्सची भागीदारी देखील त्यांनी केली होती. ही भारतीय संघाकडून करण्यात आलेली पहिलीच द्विशतकी भागीदारी ठरली होती. हा विक्रम देखील पुढच्या ४३ वर्षांसाठी ‘मुश्ताक-मर्चंट’ जोडीच्या नावावर जमा होता.

indian team
१९३६ च्या इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघ

मुश्ताक संघात नसतील तर सामना होऊ दिला जाणार नाही…!!!

देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रामुख्याने होळकरच्या संघाकडून खेळणारे मुश्ताक अलींची ओळख फक्त क्रिकेटर म्हणूनच नव्हती तर ते त्यांच्या काळातील प्रख्यात व्यक्तिमत्व म्हणून देखील प्रसिद्ध होते. अनेकांसाठी ते प्रेरणास्थान होते आणि त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज १९४५ सालातील एका किस्स्यावरून आपल्याला येऊ शकतो. किस्सा असा की, १९४५ साली कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एक प्रदर्शनीय  सामना खेळविण्यात येणार होता. या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातून मुश्ताक अली यांना वगळण्यात आलं होतं. भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर त्यात मुश्ताक अलींचं नांव नाही, हे बघून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. पण चाहते फक्त नाराज होऊन थांबले नाहीत तर त्यांनी या निर्णयाला विरोध केला. ‘नो मुश्ताक, नो टेस्ट’ या घोषणेसह निर्णयाच्या विरोधात प्रदर्शनं केली. प्रकरण इतकं चिघळलं की काही चाहत्यांनी त्यावेळच्या निवड समितीचे प्रमुख असणारे दुलीपसिंहजी यांना धक्काबुक्की देखील केली .शेवटी क्रिकेटप्रेमींच्या नाराजीसमोर निवड समितीला झुकावं लागलं आणि मुश्ताक अली यांचा संघात समावेश करण्यात आला.

 भारतीय संघाचा पहिला कसोटी विजय आणि निवृत्ती…!!!

१९५२ साली इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला पहिला कसोटी सामना जिंकला. हीच कसोटी मुश्ताक अलींची शेवटची कसोटी ठरली. या सामन्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी त्यांनी १९५२ सालीच निवृत्ती पत्करली होती तरी प्रथमश्रेणी क्रिकेटमधला आपला शेवटचा सामना ते १९६२-६३ साली खेळले. ज्यावेळी त्यांचं वय होतं ४९ वर्षे. आपल्या एकूण प्रथमश्रेणी क्रिकेटच्या कारकिर्दीत ते वेगवेगळ्या अशा ४६ संघाकडून क्रिकेट खेळले होते.

एमसीसीकडून आजीवन सदस्यत्व…!!!

मुश्ताक अलींच्या केवळ आकडेवारीवरून त्यांच्या महानतेचं मोजमाप करण्याचा विचार केला तर कदाचित आपली गफलत होऊ शकेल परंतु त्यांच्या महानतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की ‘मेरीलीबोन क्रिकेट क्लब’ अर्थात एमसीसीने त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना क्लबचं आजीवन सदस्यत्व बहाल केलं होतं. भारत सरकारकडून देखील त्यांच्या क्रिकेटसाठी असणाऱ्या योगदानाची दाखल घेत १९६४ सालीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २००८-२००९ पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मुश्ताक अली यांच्या नावाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी-२० स्पर्धा सुरु करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.