हॉलीवूडमध्ये हिरो म्हणून काम करणारा पहिला भारतीय.

एक जुना ब्रिज आहे. दोघेजण त्याच्या समोरच्या फुटपाथवर उभे आहेत. त्यातला एक जण जोश मध्ये आहे. दुसरा अगदी शांत उभा आहे. त्यातला उंच माणूस जोरजोरात हातवारे करत म्हणतो,

“मेरे पास गाडी है बंगला है,  क्या है तुम्हारे पास?”

दुसरा शांत सोज्वळ दिसणारा हिरो भुवया वर खाली करत निर्धाराने म्हणतो

“मेरे पास मां है.”

एकदम बरोबर ओळखलं. हा आहे दिवार सिनेमा. यश चोप्राचं दिग्दर्शन आणि सलीम जावेद यांच्या संवादामूळ हा सिनेमा सुपरहिट झाला.  या सिनेमाचा हिरो कोण होता असा प्रश्न विचारलं तर तुम्ही म्हणणार अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन . तर मग आम्ही म्हणणार अफसोस ये है गलत जवाब !! 

या सिनेमाचा खरा हिरो होता शशी कपूर. बच्चन तर अँटी हिरो होता. खर तर आधी शशी कपूरचा रोल राजेश खन्ना आणि बच्चन चा रोल शत्रुघ्न सिन्हा करणार होते. मगर ये हो ना सका.

बच्चन-शशी कपूर या जोडीने या सिनेमात काम केलं. दिवार सुपरहिट झाला. त्याच वर्षी आलेला शोले मेगा सुपर डुपरहिट झाला. १९७५ हे वर्ष बच्चन चं होत. तो सुपरस्टार झाला.  बच्चन आणि शशी कपूर जोडी सुद्धा सुपरहिट झाली.

तिथून पुढे जवळपास १२ सिनेमामध्ये या दोघांनी एकत्र काम केलं. यात नमक हलाल, शान, सिलसिला, कभी कभी, त्रिशूल असे अनेक सिनेमे गाजलेले. बऱ्याचदा या सिनेमांच्या ड्राईव्हिंग सिटवर अमिताभ असायचा आणि शशी कपूर साईड हिरो असायचा.

पण तरी सिनेमाच्या टायटलमध्ये शशी कपूरच नाव अमिताभ च्या आधी यायचं. फक्त एवढच नव्हे तर त्याला बच्चन पेक्षा जास्त पैसे मिळायचे. असा कोण होता शशी कपूर? काय होत त्याच्यात नेमक?

शशी कपूरचा जन्म भारतीय चित्रपटसृष्टीमधले आद्य घराणे अशी ओळख असलेल्या कपूर कुटुंबात झाला. सुप्रसिध्द अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा सर्वात धाकटा मुलगा. राज कपूर , शम्मी कपूर यांचा भाऊ. त्याच खर नाव बलबीर राज कपूर. कपूर घराण्यांमूळ त्याच्यात रक्तात अभिनय वाहत होता. अगदी लहानपणीच त्याने सिनेमात अभिनय करण्यास सुरवात केली.

जरी त्याचा जन्म कपूर घराण्यात झाला याचा अर्थ त्याकाळात ते लखपती वगैरे नव्हते. त्याचे वडील पृथ्वीराज कपूर सिनेमात काम तर करतच होते पण त्यांना नाटकाची खूप आवड होती. पृथ्वी थिएटर नावाची त्यांची स्वतःची नाटक कंपनी होती. त्यात ते नाटक बसवायचे, त्यात काम करायचे. अभिजात शांकुतल या नाटकाने त्यांनी पृथ्वी थिएटरची सुरवात केली होती. गावोगाव ही थिएटर कंपनी फिरायचीआणि आपलं नाटक दाखवायची. छोटा शशी कपूर सुद्धा त्यांच्याबरोबर असायचा.

स्वातंत्र्यलढयाचा तो काळ होता. पृथ्वीराज कपूर आपल्या नाटकामधून इंग्लिश सरकार विरुद्ध छुपा संदेश द्यायचे. खरतर त्यांची ही नाटक कंपनी फायद्यात नसायची. पुढे राज कपूर सिनेमात गेला आणि त्याचे सिनेमे हिट होऊ लागले. त्यातून आलेला पैसा पृथ्वीराज कपूरनी आपल्या नाटक कंपनीत लावला. या नाटकांचे हजारो प्रयोग करण्यात आले.

शशी कपूरनं पाहिलेलं आपल्या वडीलांचं पहिलं प्रेम नाटक आहे. त्यांचं नाटकाच वेड त्याच्यात उतरलं होत. दहावीत नापास झाल्यावर राज कपूरच्या आग्रहामुळे तो सिनेमात आला. तरुणपणी आपल्या भावाप्रमाणे वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं. यश चोप्राच्या धर्मपुत्र या सिनेमामधून त्याने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. सुरवातीला त्याच्या अभिनयाच कौतुक झालं पण यश काही मिळत नव्हत.

१९६५ साली आलेला “जब जब फुल खिले” हा त्याचा पहिला यशस्वी सिनेमा. या पाठोपाठ छोटे मोठे चित्रपट येत गेले. सत्तरच्या दशकात मात्र अमिताभ बरोबर जोडी जुळली आणि तो सुपरहिट झाला.

पण याच्या पूर्वीच त्याच नाव सातासमुद्रापार पोहचल होत. हॉलीवूड मध्ये हिरो म्हणून काम करणारा तो पहिला भारतीय होता. १९६१ साली जेम्स आयव्हरी या नंतर ऑस्कर मिळवलेल्या दिग्दर्शकाने त्याला ‘द हाउसहोल्डर’ या सिनेमात चान्स दिला. त्याच्याच ‘शेक्सपियरवाला’ या पुढच्या सिनेमातही शशी कपूर हिरो होता. 

शेक्सपियरवाला हा सिनेमा शशी कपूरच्या सर्वात जवळच्या सिनेमापैकी एक होता. या सिनेमामध्ये एका शेक्सपियराना नावाच्या टुरिंग नाटक कंपनीची स्टोरी सांगितली आहे. ही नाटक कंपनी जॉफ्री केंडाल नावाचा माणूस आणि त्याची फॅमिली चालवत असते. शशी कपूरने खऱ्या आयुष्यात देखील त्या नाटक कंपनीत काम केले होते आणि याच जॉफ्री केंडालच्या पोरीशी म्हणजे जेनिफर केंडालशी प्रेमात पडून त्याने लग्न केले होते.

शशी कपूरचे बरेच इंग्लिश सिनेमे हॉलीवूडमध्ये रिलीज झाले. यात बरेचसे रोल हीरोचे होते. त्याला इतक सार काम मिळण्यामागे त्याचा नाटकात काम करण्याचा अनुभव कामी आला होता. द डिसीव्हर्स या सिनेमात त्याने पीयर्स ब्रोस्नन सोबत स्क्रीन शेअर केला.

सत्तरच्या दशकात हिंदी सिनेमात शशी कपूर व्यवस्थित सेटल झाला होता. त्याचा अभिनय, त्याची सिनियॉरीटी, त्याच हॉलीवूडमध्ये झालेलं नाव यामुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये हायेस्ट पेड अक्टर्समध्ये त्याच नाव घेण्यात येऊ लागलं. एकवेळ अशी होती तेव्हाचा सुपरस्टार राजेश खन्नाच्या खालोखाल शशी कपूरच मानधन होत. अमिताभ, धर्मेंद्र,जितेंद्र असे त्याकाळचे सगळे स्टार शशी कपूर पेक्षा कमी मानधन घेत.

हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये असं त्याच यशस्वी करीयर सुरु होत पण शशी आपल्या पहिल्या प्रेमाला म्हणजेच नाटकाला विसरला नव्हता.

५ नोव्हेंबर १९७८ रोजी शशी आणि जेनिफर या नाटकवेडया जोडप्याने शशीच्या वडिलांची पृथ्वी थिएटर कंपनी पुनरुज्जीवित केली. मुंबईमधल्या जुहू येथे हिंदी नाट्यचळवळीला हक्काचं घर मिळवून दिल. फक्त हिंदीच नाही तर इंग्लिश, मराठी गुजराती असे अनेक नाट्यप्रयोग इथे सादर झाले. भारतीय नाट्यक्षेत्रामध्ये पृथ्वी थिएटर एका मायलिंग स्टोन प्रमाणे समजले जाते.  जेनिफरच्या मृत्यूनंतर शशीने आपल्या मुलांना सोबत घेऊन ही नाट्यचळवळ जिवंत ठेवली.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जो समांतर सिनेमाचा प्रयोग सुरु होता यामध्ये सुद्धा शशी कपूरचा मोठा सहभाग होता. जुनून , कलयुग , उत्सव असे ऑफबीट प्रयोग त्याने प्रोड्यूस केले. न्यू दिल्ली टाईम्स, इजाजत,इन कस्टडी अशा नितांत सुंदर सिनेमात काम केलं. त्याला अभिनयासाठी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. फिल्मफेअरचा लाइफ टाईमअचिव्हमेंट अवार्ड मिळाला. २०११साली भारत सरकारने पद्मभूषण सन्मान दिला.

४ डिसेंबर २०१७ रोजी त्याच निधन झालं. आयुष्यभर त्याला हॉलीवूड बॉलीवूड मध्ये भरपूर पैसा मानसन्मान मिळाला.पण शेवटपर्यंत पृथ्वीवाला नाटकवाला ही ओळख त्याने कधी मिटू दिली नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.