जगाला शहाणं करणाऱ्या गुगलचा पहिला गुरु भारतीय होता.

आज आपलं आयुष्य गुगलमय झालय. जगाच्या टोकावरची कोणती ही माहिती, कोणतीही बातमी शोधायची असेल तर आपण गुगल करतो. असं म्हणतात की जगभरातल्या इंटरनेट वापरापैकी गुगल या वेबसाईटवरचा आपला वावर जवळपास निम्मा आहे. रस्ता शोधायचा आहे तर गुगल मॅप, मेल चेक करायचा आहे तर जीमेल ते जाऊ द्या आपला मोबाईलसुद्धा ज्या एंड्रोइड प्लॅटफॉर्मवर काम करतो ते देखील गुगलचे आहे.

गुगलने इंटरनेटला व्यापून टाकलय यात शंका नाही.

पण हे गुगल सुरु करण्यामागे एका भारतीय माणसाचा देखील ब्रेन होता हे आपल्या गुगल सर्च वर कधी आलंय का? नाही सुंदर पीचई नाही. ते सध्याचे सीईओ आहेत पण त्यांचा गुगल सुरु होण्याचा तसा काही संबंध नाही. मग कोण? तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना. त्याच नाव राजीव मोटवानी.

राजीव मोटवानी मुळचे जम्मूचे. त्यांचे वडील आर्मीमध्ये होते. पण राजीवना लहानपणापासून गणिताच वेड होतं. त्याच सगळ शालेय शिक्षण दिल्लीमध्ये गेलं. आयआयटी कानपूरमध्ये कॉम्प्युटर इंजिनियरिंगला त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यांच आयुष्य बदलून गेलं. 

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. भारतात नुकतेच कॉम्प्यूटर्सनी प्रवेश केला होता. राजीवच्या गणिती डोक्याला खेळण्यासाठी कॉम्प्यूटरचं खाद्य मिळालं. त्याचे वेगवेगळे अल्गोरिदम लिहिणे याच त्याला वेडचं लागलं. आयआयटीमधल इंजिनियरिंग पूर्ण झालं. पण पुढ काय? नोकरीमध्ये त्याला रस नव्हताचं. भारतात त्याच्या पंखाला सामावून घेईल एवढ आभाळ देखील नव्हत.

अमेरिकेत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया बर्कले इथे पीएचडीची स्कॉलरशिप मिळाली. तिथे रिचर्ड कार्प या दिग्गज कॉम्प्युटर संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली आपली डॉक्टरेट पूर्ण केली. त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठात आला. एक मास्तर व्हायला.

त्याच्या कडे एवढ नॉलेज होतं, एवढी मोठी डिग्री होती की जगातली कोणतीही मोठी सॉफ्टवेअर कंपनी त्यांना मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी घेतली असती. पण राजीवना शिक्षकचं बनायचं होतं. साधा शिक्षक नाही तर पुढे जाऊन जगाच रूप बदलून टाकणऱ्या कंपन्याचा गुरु.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाला सुद्धा या माणसाच कॅॅलीबर माहित होतं. त्यांनी मोटवानीना Mining Data at Stanford उर्फ मिडास प्रोजेक्टची जबाबदारी दिली. हात लावेल त्याला सोने बनवणारा मिडास.

या मिडास मध्ये डेटा मायनिंग पासून रोबोटिक्स वेबसर्च अशा प्रचंड गोष्टीवर रिसर्च चालायचा. स्टॅनफोर्ड विद्यापीठातले एकापेक्षा एक हुशार विद्यार्थी आपल्या डोक्यातल्या आयडिया घेऊन राजीव मोटवानी यांना भेटायचे. सध्या कोडींगच्या शंकेपासून ते करीयरच्या दिशा, होस्टेलचे इश्यू प्रत्येक गोष्टीचं उत्तर प्रोफेसर मोटवानीकडे असायचं.

अशातच राजीवना दोन मूले भेटली. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन. दोघेही पीएचडी स्टुडंट्स. या कायम कुतुहुलाने प्रश्न विचारणारी, उत्साहाचा धबधबा कायम वाहत असलेली ही जोडी बघितल्यावर राजीवला आपल्या  नुकताच डॉक्टरेट करण्यासाठी अमेरिकेत आला होता ते दिवस आठवले. ही मूले पुढे जाऊन चमत्कार करतील याचा त्याला विश्वास होता. त्यांना लागेल ती मदत करण्याचं आश्वासन त्याने दिल.

रात्री अपरात्री कधीही टपकनाऱ्या या उत्साही मुलांना त्याने घडवले. त्यांच्या डोक्यातल्या आयडियांना दिशा दिली. आज गुगल सर्च ज्या अल्गोरिदमवर उभा आहे तो पेजरँकचा पेपर राजीव मोटवानीने या दोघांसोबत लिहिला. इथेच जगात क्रांती आणणाऱ्या गुगलच्या स्वप्नाची सुरवात होती.

पुढे १५ सप्टेंबर १९९७ साली पेज आणि ब्रिन या दोघांनी याच पेजरँकचे गुगल बनवले. हे सर्च इंजिन क्रांतिकारी ठरले. गुगल उभा रहात असताना देखील राजीव मोटवानी यांनी आपल्या शिष्यांवरचा मदतीचा हात काढून घेतला नाही.  त्यांच्या देखरेखीखालीचं गुगलने आपली सुरवातीची वाटचाल केली. गुगलच्या अनेक डेव्हलपर्सनां ट्रेनिंग देण्याचं काम देखील राजीव मोटवानी यांनी केलं.

फक्त गुगलचं नव्हे तर ऑनलाईन पेमेंट जगातली सर्वात मोठी कंपनी पेपाल, कॅपीटल फर्म सिक्वेरा अशा अनेक कंपन्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या राहिल्या. 

मनात आणल असत तर अशी छोटीमोठी कंपनी बनवन त्यांना अशक्य नव्हतं. पण शेवटपर्यंत त्यांनी आपला शिक्षकी पेश सोडला नाही. Business Association of Stanford Entrepreneurial Students (BASES) या स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप ग्रुपमध्ये ते अक्टिव्ह होते. तिथे अनेक मुलांना फक्त आपले अनुभवाच्या सल्ल्याचीच मदत केली असे नाही तर काही स्टार्टअपना एंजल इन्व्हेस्टर म्हणून  देखील काम केलं. त्यांना मानाचा गॉडेल पुरस्कार देखील मिळाला.

असा हा हाडाचा शिक्षक वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी एका अपघातामध्ये जग सोडून निघून गेला. 

आज असं म्हणतात की अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये सर्वात जास्त रिस्पेक्ट भारतीय इंजिनियर्सना आहे. भारताच सिलिकॉन व्हॅलीवरच राज्य राजीव मोटवानी सारख्या जिनियस गुरुजीमुळे बनलं होतं हे नक्की.

आज त्यांच नाव गुगल मध्ये कुठे दिसत नाही पण जगभरात प्रत्येक सेकंदाला लाखो लोक जेव्हा गुगल सर्च करतात तेव्हा ते क्लिक राजीव मोटवानी यांच्या सारख्या पडद्यामागच्या अनेकांच्या कष्टाला सलाम करणारे असतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.