खाशाबा जाधव यांच्या सोबतच भारतासाठी पहिले ऑलिम्पिक मेडल जिंकणारे पहिलवान !
स्व. कृष्णराव धोंडीराम माणगावे. कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेला खऱ्या अर्थाने गौरवशाली सुरुवात करून दिली ती माझ्या आजोबांनी. संपूर्ण कोल्हापूर हे त्यांना ‘ माणगावे मास्तर’ म्हणून ओळखते.
१९५२ मध्ये हेलसिंकी फिनलंड येथे झालेल्या जागतिक कुस्ती सामन्यात अगदी पहिल्या प्रयत्नात माझे आजोबा जगात ४ थे आले आणि ऑलिंपिक पदक त्यांनी पटकावले. तेव्हा चौथ्या येणाऱ्या व्यक्तीला देखील पदक मिळण्याचा प्रघात होता.
त्यांची १९४८ रोजी इंग्लंड ऑलिंपिकसाठी देखील निवड करण्यात आली होती मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने त्यांना त्यावेळी सहभागी होता आले नाही.
घरातील परिस्थिती अतिशय बिकट, आई- वडील अशिक्षित पण कुस्तीची आवड सर्वाधिक होती. या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे पैलवानांचा खाण्याचा खर्च सर्वाधिक असतो. त्याला खुराक असे म्हणतात. रोज दुध, थंडाई, काजू, बदाम व तूप असे रोजच्या खाण्यात असते पण हे खाणे घरच्यांना परवडण्यासारखे नव्हते. आजोबांच्या आईने चटणी कांडायला जाऊन, काबाडकष्ट करून त्यांना लहानाचे मोठे केले.
माझे आजोबा जगात चौथे का आले हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.
१९५२ मध्ये भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. ऑलिंपिक स्पर्धा नेमक्या काय असतात व त्याचे महत्त्व काय हे तेव्हा सामान्य जनतेला सोडा पण राज्यकर्त्यांना देखील माहिती नव्हते. भारतातून ४ व त्यातील महराष्ट्रातील ३ मल्ल या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी व्हायला आर्थिक मदत द्या म्हणून मुंबई प्रांत सरकारकडे मागणी केली होती पण त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत देण्यास नकार दिला.
आमची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची. कुस्तीचा खुराकाचा खर्च कसाबसा निघायचा त्यात ऑलिम्पिकला जाणार कसे? कुठूनही पैशाची व्यवस्था होत नाही हे समजल्यावर तेव्हाच्या शाहू बँकेने पहाटे तीन वाजता बँक उघडून माझ्या आजोबांनी घर गहाण ठेवले व ते अखेर ऑलिंपिक स्पर्धेत जायला निघाले.
भारताच्या इतिहासात एका खेळाडूसाठी बँक अशी रात्री अपरात्री उघडण्याची पहिलीच वेळ हि असावी.
व्ही शांताराम यांच्यासारख्या दिग्गज लोकांनी पुढाकार घेतला व वर्गणी देखील काढली. आजोबांच्या या यशात सामान्य जनतेचा मोलाचा वाटा आहे.
आता परिस्थिती फार वेगळी आहे. स्पर्धकांना सर्व सुविधा मिळतात. सरकार त्यांच्या प्रशिक्षणापासून ते खुराका पर्यंत सर्व खर्च सरकार उचलते. आता प्रत्येक स्पर्धकाला आहारतज्ञ दिले जातात. जो त्यांच्यासोबत कायम असतो. त्यावेळी आपण काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही याची माहिती द्यायला कोणीही नव्हते. तेव्हा आहारतज्ञ वगैरे असा काही प्रकार नव्हता.
माझे आजोबा सांगायचे की,
भारत सरकारने एक व्यक्ती त्यांच्यासोबत पाठवला होता पण त्याने तिथे जाऊन पर्यटन करणे व खरेदीवर अधिक भर दिला.
या स्पर्धकांना इंग्रजीची अडचण देखील सर्वात मोठी होती. संभाषण येत नव्हते, समोर काय सूचना दिल्या जातात हे देखील त्यांना कळत नव्हते. आजोबांचा कुस्तीचा शेवटचा सामना लागणार तेव्हा एक घटना घडली. कुस्तीत स्पर्धा सुरू होण्याआधी वजन घेतले जाते कारण कुस्ती हि वजनावर लागते. आजोबांनी कुस्तीच्या आधी कोकाकोला पिला.त्यामुळे त्यांचे वजन वाढले.
तुम्हाला कुस्तीत वजन तीनदा देण्याची संधी असते. त्या तीन संधीत तुमचे वजन भरले नाही तर तुम्ही खेळातून बाद होता. त्यांनी दोनदा वजन दिले पण ते भरत नव्हते मात्र शेवटी वजन काही ग्रामने जास्त होते म्हणून ते अक्षरशः नग्न अवस्थेत वजन काट्यावर उभे राहिले आणि नेमके गरजे एवढे वजन भरले.
जास्त वेळ धावल्याने ते दमले आणि लगेच त्यांचा कुस्तीचा अंतिम सामना लावण्यात आला.
अर्धा तास धावल्याने शरीरातील अर्धी ताकद निघून गेली होती तरीही ते कुस्ती खेळले आणि ते जगात चौथे आले. १९५२ च्या फिनलंड ऑलिंपिकमध्ये त्यांची कुस्ती हि सुवर्ण पदकासाठी लागली होती. ते ती कुस्ती हरले आणि त्यांना चौथा क्रमांक मिळाला.
खाशाबा जाधव हे सांगलीचे व त्यांचा ऑलिंपिक मध्ये सहभागी होण्याची दुसरी वेळ होती. त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला. अशा दोन्ही मल्लांनी भारतासाठी पहिले ऑलिंपिक पदक आणले.
कोणतेही पाठबळ नसताना, अनुभव पाठीशी नसताना माझे आजोबा जगात चौथे आले पण सरकारला त्यांच्या कार्याचे स्मरण कधी झाले नाही.
माझ्या आजोबांना ‘तुम्ही हिंद केसरी नाही ‘ या कारणास्तव भारत सरकारने पेंशन नाकारली होती. आता ऑलिंपिक हि स्पर्धा मोठी की हिंद केसरी हा प्रश्न देखील कोणाला कसा पडला नसेल याचे आश्चर्य वाटते. ऑलिंपिक मध्ये माझ्या आजोबांनंतर चौथा क्रमांक पटकावलेल्या अनेकांना राजीव गांधी खेलरत्न व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पण आजोबा मात्र यापासून वंचित राहिले.
आजोबांनी त्यांच्या हयातीत पद्म पुरस्करासाठी अर्ज केला होता पण तेव्हा आणि आज तागायत मिळालेला नाही.
आपल्याला जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे पुढील आयुष्य हि कुस्तीची विद्या इतरांना शिकवण्यात घालवलेले. पिटीचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. कोणत्याही व्यक्तीला मदत करणे हे ते स्वतःचे कर्तव्य समजायचे. संकटात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.
पोटाला चिमटा लावून, प्रशिक्षण द्यायला कोणी नसताना ऑलिंपिक पर्यंत जाण्याची मजल माझ्या आजोबांनी केली. अशा या ‘ ऑलिंपिक वीर ‘ कुस्तीगीर कृष्णराव माणगावे यांना विनम्र अभिवादन. आज त्यांनी भारतासमोर ठेवलेल्या उदाहरणाने असंख्य मल्ल ऑलिंपिक मध्ये जाण्याची तयारी करतात आणि कोल्हापूर हे कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा माझा छोटा प्रयत्न. माझ्या आजोबांची प्रेरणा घेऊन सतत काम करत पुढे जायचे आहे.
- अॅड. कल्याणी माणगावे
हे ही वाच भिडू.
- त्या दिवशी कुस्ती बघायला गेलेला पैलवान, भारतासाठीच पहिल कांस्य पदक घेवुन आला.
- राष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक!!!
- त्या दिवशी ऑलिंपिक गोल्ड मिळवणारी धावपटूदेखील उषासाठी रडली होती.