‘हिट विकेट’ म्हणजे काय रे भाऊ..?

 

श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहस ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले. पण या सामन्यात भारताच्या के.एल. राहुलने एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावे केला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ‘हिट विकेट’ पद्धतीने आउट होणारा तो भारताचा पहिलाच बॅटसमन ठरला. तेव्हाचपासून हे नेमकं काय प्रकरण आहे, असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडलाय. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला सांगतोय ‘हिट विकेट’ ‘डक’ आणि ‘गोल्डन डक’ या संकल्पनांविषयी तसंच यासंदर्भातील काही मजेदार गोष्टींविषयी…

‘हिट विकेट’ म्हणजे काय ..?

साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं तर ‘हिट विकेट’ ही बॅटसमनने केलेली आत्महत्या असते. बॅटिंग करताना ज्यावेळी बॅटसमनचा पाय, शरीराचा कुठलाही भाग, बॅट किंवा हेल्मेट यांचा स्पर्श होऊन स्ट्म्पवरच्या बेल्स पडतात, त्यावेळी बॅटसमनला आउट दिलं जातं. संपूर्णतः आपल्या चुकीमुळेच बॅटसमनला स्वतःची  विकेट गमवावी लागते. असं असलं तरी ही विकेट बॉलरच्या खात्यात मात्र जमा होते. त्यामुळे ‘हिट विकेट’ रन-आउट पेक्षा वेगळं ठरतं. (रन-आउटला देखील क्रिकेटमध्ये आत्महत्यचं मानलं जातं, मात्र रन-आउट ची विकेट बॉलरच्या खात्यात जमा होत नाही )

रंजक किस्से

१९२१ च्या अॅशेज सिरीजमधल्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर टेड मॅकडोनल्डनं टाकलेल्या बॉल टाकलेला बॉल इंग्लडचा बॅटसमन अँडी डकॅटच्या बॅटला स्पर्श करून गेला, जो  स्लीपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरने कॅच केला. पण बॉलचा वेग इतका होता की त्यामुळे डकॅटची बॅट तुटली आणि बॅटचा तुकडा स्ट्म्पवर जाऊन पडल्याने बेल्स पडल्या त्यावेळी डकॅटला कॅच आउट देण्यात आलं. हाच किस्सा पुन्हा त्याच वर्षात घडला. बॉलरही तोच. टेड मॅकडोनल्ड. फक्त विरोधी संघ आणि बॅटसमन बदलले. बॅटसमन होता दक्षिण आफ्रिकेचा बिली  झल्च. पण यावेळी झल्चला ‘हिट विकेट’ ठरवण्यात आलं.

केनियाचा माजी कर्णधार मॉरीस ओडुम्बे याच्या नावेही ‘हिट विकेट’ संदर्भातील एक विक्रम जमा आहे. ओडुम्बे हा असा एकमेव क्रिकेटर आहे जो वर्ल्डकप सारख्या महत्वाच्या इव्हेंटमध्ये २ वेळा ‘हिट विकेट’ झालाय. सर्वप्रथम १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये आणि त्यानंतर २००३ च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ‘हिट विकेट’ प्रकाराने आपली विकेट फेकलीये. विशेष म्हणजे दोन्हीही वेळा विरोधी संघ होता वेस्ट इंडीज.

sunil ambris 2
Sunil

सुनील अंबरीस या वेस्ट इंडीज खेळाडूच्या नावावर तर ‘हिट विकेट’ संदर्भातील अनोखा रेकॉर्ड जमा आहे. आपल्या पदार्पणातील कसोटीत तो पहिल्याच बॉलवर ‘हिट विकेट’ झाला.  २ डिसेंबर २०१७ रोजी वेलिंग्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यादरम्यान पार पडलेल्या कसोटी सामन्यात त्याच्या नावावर हा नकोसा रेकॉर्ड जमा झाला. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात यापूर्वीही अनेक खेळाडू ‘हिट विकेट’ झालेले आहेत परंतु पदार्पणातील सामन्यात ‘हिट विकेट’ आणि ‘गोल्डन डक’ अशा दोन्हीही गोष्टी मात्र यापूर्वी कधीच घडल्या नव्हत्या. त्यामुळे अशी कामगिरी करून एका अर्थाने अंबरीस यानं एक इतिहासच घडवला. विशेष म्हणजे एवढ्यावरच तो थांबला नाही तर न्यूझीलंडविरुद्धच्या पुढच्याच हॅमिल्टन कसोटीतही तो ‘हिट विकेट’ झाला. अशा प्रकारे सलग दोन कसोटीत ‘हिट विकेट’ होणाराही तो क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला.

‘डक’ आणि ‘गोल्डन डक’ यांत नेमका काय फरक..?

क्रिकेटच्या कुठल्याही फॉरमॅटमध्ये एखादा प्लेअर ज्यावेळी शून्यावर आउट होतो, त्यावेळी त्याला ‘डक’ असं म्हंटलं जातं, तर ज्यावेळी एखादा प्लेअर तो खेळत असलेल्या पहिल्याच बॉलवर आउट होतो, त्यावेळी त्याला ‘गोल्डन डक’ असं म्हंटलं जातं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.