दक्षिणेतल्या सांबरचा शोध संभाजी महाराजांमुळे लागला.

कुठल्या पण साउथ इंडियन हॉटेल मध्ये जावा. तिथ गल्ल्यावर एक आण्णा बसलेला असतो. खांद्यावर टॉवेल टाकलेला पोऱ्याला मेनू मध्ये काय आहे विचारल्यावर रेल्वेच्या गाडीप्रमाणे तो सुरु होतो, “म्हैसूर डोसा, मसाला डोसा, इडली , मेदू वडा…. ” लिस्ट मोठी असते पण प्रत्येक गोष्ट चविष्ट असते. पण या सगळ्या पदार्थांच्या सोबतीला हमखास असते ते म्हणजे सांभार किंवा सांबर.

सांबारला दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा राजा म्हटल तरी चुकीच ठरणार नाही. सांबर नसेल तर इडली डोस्याला म्हणावी तशी चव येत नाही. म्हणूनच दक्षिणेत गेल्यावर बघाल तर तिथली प्रत्येक गृहिणी सकाळी स्वयंपाकाची सुरवातचं सांबर बनवण्यापासून करते.

गरम गरम वाफाळलेलं मसाल्याचा विशिष्ट सुगंध असणारं आंबट तिखट सांबर लहानथोर सगळ्यानाच आवडते.

आज जगभर सांबार साउथ इंडियन क्युझिनची ओळख बनला आहे. मात्र आपल्या पैकी अनेकांना ठाऊक नसेल सांभार ही महाराष्ट्राची देन आहे. या सांबरच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. पण यातील सर्वात सुप्रसिध्द स्टोरी संभाजी महाराजांशी निगडीत आहे.

दक्षिणेमध्ये तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे तंजावूर. शहाजी राजांनी हे तंजावूर राज्य जिंकले आणि तिथली जहागिरी मिळवली. त्यांच्या नंतर ही जहागिरी व्यंकोजीराजेना मिळाली. हे व्यंकोजी उर्फ एकोजी म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. त्यांनी मराठी सत्तेचा दक्षिणेत विस्तार केला.

तंजावूरमधील भोसले घराण्याचे वंशज हे शूर वीर देखील होते आणि त्याच बरोबर रसिक देखील होते. त्यांनी या परमुलुखात मराठी संस्कृती टिकवली वाढवली शिवाय दाक्षिणात्य संस्कृतीलाही सामावून घेतले.

अख्ख्या दक्षिण भारतावर मराठी सत्तेचा अंमल असावा हे शिवरायांचे स्वप्न होते. संभाजी महाराज छत्रपती बनल्यावर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्नाटक मोहीम हाती घेतली. म्हैसूरच्या वाडियार चिक्कदेवराजाला गुडघे टेकायला लावले. या विजयानंतर आपल्या चुलत भावाची भेट घेण्यासाठी महाराज तंजावूर ला आले.

यावेळी तंजावूरमध्ये व्यंकोजींचे सुपुत्र शाहूजी राजे गादीवर होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले. 

तंजावूरच्या शाही मुद्पाकखाण्यात खास मराठी पद्धतीचे पदार्थ शिजत होते.  खुद्द शाहूजी महाराजांनी स्वयंपाकावर जातीने लक्ष दिले होते. संभाजी महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचे आदेश त्यांनी खानसाम्याला दिले होते. मेजवानीमध्ये कोणतीही कसूर ठेवायची नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली होती.

अचानक त्यांना स्वतः आपल्या भावासाठी काही तरी आपल्या हाताने काही तरी बनवून खिलवण्याची लहर आली. त्यांना माहित होते संभाजी महाराजांना तुरीच्या डाळीची आमटी आवडते. त्यांनी हीचं आमटी करायचे ठरवले. सगळी तयारी झाली. पण फोडणी देताना लक्षात आले की डाळीच्या आमटीसाठी लागणारे आमसूल संपले आहे. मुद्पाक खाण्यात शोधाशोध सुरु झाली.

कोकम आमसूल हे दक्षिणेत पिकत नाही. वर्षभरासाठी लागणारे आमसूल महाराष्ट्रातून तंजावूर ला यायचे. नेमके ते संपले होते. या गुस्ताखीमुळे शाहूजी महाराजांचा पारा चढला.  हजर असलेल्या सेवकांच्यात गोंधळ उडाला.

तंजावूर राजाचा मुख्य बल्लवाचार्य हा देखील मराठीच होता. त्याने भीतभीत महाराजांना सूचना केली की,

 “आंबटपणा येण्यासाठी आज कोकमांऐवजी चिंचेचा कोळ वापरून पहावा.”

हा प्रयोग यशस्वी ठरला. त्या दिवशीच्या मेजवानीमध्ये सगळ्यात लोकप्रिय डिश म्हणजे शाहूजी महाराजांनी बनवलेली आमटी होती. तिला संभाजी राजांच्या खिदमतीची आठवण ठेवण्यासाठी त्यांचं नाव देण्यात आलं.  संभासाठी केलेला आहार,  संभासाठी केलेली आमटी अर्थात सांभार उर्फ सांबर !!

काही जण असाही दावा करतात की कोकमच्या ऐवजी चिंच वापरण्याची सूचना पाकशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या संभाजी महाराजांनी दिलेली होती. काही जण म्हणतात खुद्द छत्रपतींनी पहिलं सांबार बनवलं होतं. तंजावूर मध्ये हे सांबरचे किस्से रंगवून रंगवून सांगितले जातात. कथा काही का असेना पण पहिला सांबार छत्रपती संभाजी महाराजांसाठी बनलं होतं हे नक्की. 

तंजावूर मधल्या सरस्वती महाल लायब्ररीमधल्या सर्भेन्द्र पाकशास्त्रं या पुस्तकात सांभारची पहिली लिखित स्वरूपातील पाककृती लिहिलेली आहे. पुष्पेश पंत यांच्यासारखे अनेक पाकशास्त्रतज्ञ इतिहासकार मान्य करतात की सांभरचा जन्म तंजावूरमध्ये झाला आणि त्याच्यामागे महाराष्ट्राचे ऋणानुबंध आहेत. अशीच माहिती करीज ऑफ इंडिया या लाइफस्टाइल वाहिनीवरील कार्यक्रमात सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी देखील दिलेली आहे.

एक दावा असा आहे की सांभर हे छ.शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराजांसाठी बनवले होते.

आज सांबार शिवाय दाक्षिणात्य पदार्थ अपूर्ण आहे. तिथे सांबारचे ५० वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. जगभरातल्या खवय्यांपर्यंत सांबार पोहचले आहे. नावाजलेल्या इंग्रजी डिक्शनरी मध्ये सांबार हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे. अशा या सगळ्यांच्या लाडक्या सांबारला फोडणी आहे मराठी संस्कृतीची.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Pritish Suryawanshi says

    छान माहिती

  2. Krushna Wani says

    Sambhar he nav shivaji rajenche mothe bandhu Sambhajiraje je Banglore yethe rajya karit hote tyani banavale hote te pak kalet atishay nipun hote. Tynachyach navavrun tyala sambhar ase nav denyat ale.

Leave A Reply

Your email address will not be published.