साथीच्या रोगामुळे काॅंग्रेसच्या स्थापनेलाच ब्रेक लागणार होता, पण..

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. सध्या मृत्युपंथाला लागलेला पक्ष. एक तर यांनी निवडणूक जिंकायचं कधीच बंद केलंय . चुकून जिंकल्याच तर त्यांचे आमदार कधी भाजप पळवेल सांगता येत नाही.

पण एक काळ असा होता अख्ख्या भारतात फक्त काँग्रेसचाच बोलबाला होता.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रमुख शक्ती काँग्रेस ही  होती. वेगवेगळ्या विचारसरणीचे धर्माचे वेगवेगळ्या प्रांताचे भाषेचे सर्व लोक या पक्षा च्या झेंड्या खाली राहून ब्रिटिशांशी लढत होते. पण याची स्थापना पुण्यात होणार होती.

काय कस सगळं सांगतो.

पुणे सुरवाती पासून भारतात अनेक राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र बनले होते. शहाजी महाराजांची जहागीर असलेल हे एके काळच छोटंसं गाव. आदिलशाहाने ते उद्धवस्त केलं मात्र शिवबा आणि जिजाऊंनी ते परत वसवलं.

पेशव्यानी या गावाला राजधानी बनवली. पुण्याचा दरारा दिल्लीपर्यंत पोहचला. सुरवाती पासून येथे सुशिक्षित लोकांचे प्रमाण हि खूप होते. १८१८ साली इंग्रजांनी पुणे जिंकले आणि अख्खा भारत त्यांच्या ताब्यात आला.

त्यानंतर हि अनेक घडामोडी या शहरात झाल्या. महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा इथेच सुरु केली. धोंडो केशव कर्वे, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असे अनेक समाजसुधारक  शहरातले होते.

भारतातील पहिली सनदशीर मार्गाने चळवळ करणारी राजकीय संस्था स्थापन झाली तीही पुण्यातच.

इ. स. १८६७ मध्ये पुणे येथे ‘पुना असोसिएशन’ नावाची संस्था सुरू झाली. पर्वती देवस्थानची व्यवस्था योग्य पद्धतीने व्हावी, पंचकमिटीचा गैरकारभार, आर्थिक भ्रष्टाचार व अंदाधुंदी दूर करणे हा या संस्थेचा प्रारंभिक उद्देश होता. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका हे या संस्थेचे संस्थापक होते.

या संस्थेचे पुढे २ एप्रिल १८७० रोजी ‘सार्वजनिक सभा’ अर्थात ‘पुणे सार्वजनिक सभा’ असे नामांतर झाले.

सार्वजनिक सभेचा प्रमुख उद्देश स्थानिक प्रश्न व समस्या दूर करण्यासंदर्भात इंग्रज अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडणे  हा होता. पुढे न्या. महादेव गोविंद रानडे पुण्यामध्ये आले आणि  सार्वजनिक सभेच्या कार्याची धुरा त्यांच्या हातामध्ये आली. त्यांनी दोन दशके सभेचे नेतृत्व व मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात सभेला राष्ट्रीय स्तरावरील एका राजकीय संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले.

पुणे सार्वजनिक सभेने विविध स्तरांवर आपले कार्य केले. १८७३ मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीची पाहणी करण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केले. याचवर्षी भारतीय अर्थव्यवहाराविषयी नेमलेल्या समितीसमोर साक्ष देण्यासाठी सभेने बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सहकार्याने फर्दुनजी नवरोजी यांना लंडनला पाठविले.

१८७४ मध्ये बंगालमधील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून सभेने मदतनिधी गोळा केला. याचवर्षी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत, या आशयाचा अर्ज पार्लमेंटच्या सभासदाकडे पाठविला.

महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तेव्हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे व त्यांची गाऱ्हाणी सरकारपुढे मांडण्याची महत्त्वाची भूमिका सभेने पार पाडली.

सार्वजनिक काकांनी सभेच्या व्यासपीठावरून स्वदेशीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळात सुधारणा, नागरी सेवा भरती, शैक्षणिक धोरण, करयंत्रणा, व्हर्नाकुलर प्रेस अॅक्ट, जंगलविषयक कायदे या विषयाकडे ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे कार्य सभेने केले.

पुणे सार्वजनिक सभेचे सभासदत्व प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला किमान ५० प्रौढ व्यक्तींचा लेखी पाठिंबा आणणे आवश्यक होते. सभेने अल्पावधीतच सभासदांची मोठी संख्या पूर्ण केली.

सभासद झालेल्या प्रत्येक सदस्याला सभेने दिलेले कोणतेही कार्य स्वशक्तीनुसार, नि:स्पृहपणे व भेदभाव न करता पार पाडेन, अशी शपथ घ्यावी लागत असे.

प्रामुख्याने सुशिक्षित, प्रतिष्ठित, श्रीमंत लोकांचे सभासदत्व अधिक होते. विशेषत: ब्राह्मण, सरदार, जमीनदार, इनामदार, व्यापारी, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी, वकील व शिक्षक या पेशांतील व्यक्ती सभेचे काम पाहत.  संपूर्ण महाराष्ट्रात या  शाखा स्थापन झाल्या.

 या सभेचे पहिले अध्यक्षपद औंध संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांनी भूषविले.

त्यानंतर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, आण्णासाहेब पटवर्धन, ल. ब. भोपटकर, लोकमान्य टिळक आदी मान्यवरांनी सभेचे अध्यक्षपद भूषविले.

पुढे भारत भरात सार्वजनिक सभेचे यश पाहून संपूर्ण देशात अशा राजकीय संस्था स्थापन होऊ लागल्या. इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले. १८८१ साली मद्रासला महाजनसभा स्थापन झाली.  नाना शंकर शेठनी मुंबईत स्थापन केलेल्या संस्थेचे १८८५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये  पुनरुज्जीवन झाले.

जेव्हा लॉर्ड लिटन भारताचा व्हाइसरॉय बनला तेव्हा त्याने भारतीयांच्यांतील असंतोषाला वाट मिळून देण्यासाठी सार्वजनिक सभे सारख्या नेमस्त विचारांच्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.

ऍलन ह्यूम सारख्या निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने देशभरातल्या सर्व संस्थांना एकत्र आणून एक राष्ट्रीय चळवळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या.

यातूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची कल्पना पुढे आली. पुण्याच्या सार्वजनिक सभेचे लोक यात आघाडीवर होते. 

हा पक्ष स्थापन करण्याचे ठिकाण देखील पुणे च असावे असे निश्चित झाले.

काँग्रेस चे पहिले अधिवेशन पुण्यात व्हावे म्हणून सगळी तयारी करण्यात आली. पण दुर्दैवाने या काळात प्लेगच्या साथीने पुणे शहराला घेरले. त्याकाळी प्लेग  हा दुर्धर र्पग मानला जायचा. अनेकांचा मृत्यू देखील झाला. नाईलाजाने काँग्रेस चे पहिले अधिवेशन पुण्याच्या ऐवजी मुंबईत आयोजित करण्यात आले.

२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथील गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत दुपारी बारा वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.

फिरोज शहा मेहता, दादाभाई नौरोजी , न्यायमूर्ती रानडे,  बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, के. टी. तेलंग, गो. ग. आगरकर इ. मंडळींची या अधिवेशनात उपस्थिती होती.

श्री. व्योमेश चन्द्र  बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष तर  ऍलन  ह्यूम ची जनरल सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली .  या अधिवेशनात काँग्रेसचे धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद इ. भेदांवर मात करणारी अखिल भारतीय एकराष्ट्रीयता निर्माण करणे हे संघटनासूत्र ठरविण्यात आले.

लोकमान्य टिळक व पुण्यातील इतर मोठे नेतेदेखील काँग्रेस मध्ये सक्रिय झाले.

सार्वजनिक काकांच्या मृत्यू नंतर सार्वजनिक सभेच्या कार्यावर मर्यादा येत  होत्या. तिची जागा या तिनेच जन्म घातलेल्या काँग्रेसने घेतली आणि राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले.

हे ही वाच भिडू.