भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता

बाबू जगजीवन राम.

सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम.

या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न शकलेले आणि त्यामुळेच पंतप्रधानपदासाठी आवश्यक असलेली संपूर्ण पात्रता जवळ असून देखील पंतप्रधानपदाने हुलकावणी दिलेले,

भारताचे न होऊ शकलेले पहिले दलित पंतप्रधान म्हणूनही ज्यांचं नाव घेतलं जातं, असे नेते म्हणजे बाबू जगजीवन राम.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी जोडले गेलेले बाबू जगजीवन राम काँग्रेसमधील सर्वात मोठे दलित नेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील काँग्रेसकडील सर्वात मोठा नेता अशी त्यांची ओळख होती.

१९४६ सालच्या नेहरूंच्या अंतरिम सरकारमधील पहिल्या मंत्रिमंडळातील ते सर्वात तरुण मंत्री होते. या मंत्रिमंडळात त्यांच्यावर कामगार मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हापासून ते आपल्या निधनापर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते.

नेहरूंच्या काळात त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या  जगजीवन राम यांनी  १९६९ साली जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस फुटली त्यावेळी  इंदिरा गांधी यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (आय) पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १९७१ सालच्या बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी ते देशाच्या संरक्षणमंत्री पदावर विराजमान होते.

JR10
१९७१ सालच्या युद्धातील सैन्यासोबत संरक्षणमंत्री जगजीवन राम

१९७१ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध भारताने जिंकलं त्यात जितका वाटा पंतप्रधान इंदिरा गांधींचा होता, तितकाच वाटा संरक्षणमंत्री म्हणून जगजीवन राम यांचा देखील होता. परंतु इतिहासाने त्याचं योग्य मूल्यमापन कधीच केलं नाही. या युद्धातील इस्टर्न कमांडच्या लेफ्टनंट जनरल जेकब यांच्याच भाषेत सांगायचं तर,

‘जगजीवन राम हे भारताला मिळालेले सर्वोत्तम संरक्षणमंत्री होते.’

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली त्यावेळी जगजीवन राम इंदिरा गांधी यांच्यासोबतच होते. पण आणीबाणी उठविण्यात आल्यानंतर निवडणुकांची घोषणा झाली आणि ते अचानक काँग्रेसमधून बाहेर पडले. असं सांगतात की १९७७ सालच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी  काँग्रेसची जी पुरती वाट लावली होती, त्यात सगळ्यात महत्वाची भूमिका जगजीवन राम यांचीच होती.

१९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात जनता पक्षाचं सरकार स्थापन होणार हे नक्की झाल्यानंतर पंतप्रधानपदासाठी सर्वात मजबूत दावेदारी होती ती अर्थातच बाबू जगजीवन राम यांची. पण त्यावेळी बाजी मारली मोरारजी देसाई यांनी.

यावेळी एक गोष्ट जी जगजीवन राम यांच्या विरोधात गेली ती म्हणजे आणीबाणीच्या काळात त्यांचं इंदिरा गांधींसोबत असणं. आणीबाणीविरोधी जनादेशावर स्थापन झालेल्या सरकारचा प्रमुख एखादा आणीबाणी समर्थक कसा असू शकतो, असा दावा करत जनता पार्टीमधून त्यांच्या पंतप्रधानपदाला विरोध झाला.

पंतप्रधानपदासाठी मोरारजींचं नाव नक्की झाल्यानंतर जगजीवन राम यांनी आपली उघडपणे नाराजी दर्शवत ते मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला अनुपस्थित राहिले. या सगळ्या प्रकरणात जयप्रकाश नारायण यांना मध्यस्थी करावी लागली. जेपींनी समजावून सांगितल्यानंतर शेवटी ते मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीपदावर रुजू झाले. सोबतच देशाचे उप-पंतप्रधान देखील झाले.

JR6
डावीकडून तत्कालीन गृहमंत्री चौधरी चरणसिंग, प्रधानमंत्री मोरारजी देसाई आणि संरक्षणमंत्री बाबू जगजीवन राम

सरकार तर स्थापन झालं पण संरक्षणमंत्री बाबू जगजीवन राम आणि गृहमंत्री चरणसिंग हे दोघेही नाराज होते. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारणात जनता पार्टीत लवकरच फुटीचं वातावरण तयार होऊ लागलं. पंतप्रधान मोरारजी देसाई आणि गृहमंत्री चरणसिंग यांच्यातील वाद तर इतके चव्हाट्यावर आले की मोरारजी देसाई तर एका वेळी, आपण  चरणसिंगांना ‘चुरण सिंग’ बनवू असं म्हणाल्याची आठवण ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी सांगितलीय.

सरकारमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु असतानाच मोरारजींचे चिरंजीव कांतीभाई देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ‘प्रधानमंत्री कार्यालयात बसून कांतिभाईच  देसाईचं सरकार चालवतात, त्यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध असून त्यांना फायदा मिळवून देण्यासाठी ते काम करतात’ अशा प्रकारचे आरोप कांतिभाई देसाई यांच्यावर झाले.

आरोपांची सखोल चौकशी व्हावी असं पत्र चरणसिंगांनी मोरारजी देसाईंना लिहलं. त्यामुळे सहाजिकच मोरारजी चिडले आणि दोघांमधील वितुष्ट अजून वाढलं. परिणामी मोरारजी देसाईंनी चरणसिंग आणि त्यांच्यासोबत आपले अजून एक विरोधक राजनारायण (तेच राजनारायण ज्यांनी निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव केला होता) यांना पत्र लिहून राजीनामा देण्यास सांगितलं. दोघांनीही मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.

भारतीय राजकारणातलं बहुचर्चित सेक्स स्कॅन्डल 

खरं तर आता चरणसिंग यांनी राजीनामा दिल्यांनंतर मोरारजी यांच्यानंतर कोण हा प्रश्नच उरला नव्हता. कारण उत्तर एकच होतं, बाबू जगजीवन राम.

पण त्याच काळात बाबू जगजीवन राम एका वेगळ्याच प्रकरणात अडकले. त्यांचे चिरंजीव रमेश कुमार यांचं सेक्स स्कॅन्डल बाहेर आलं. या प्रकरणाने जगजीवन राम यांच्या राजकीय कारकीर्दीवर सगळ्यात मोठा डाग लागला.

हे स्कॅन्डल बाहेर आणण्यात आणि त्याला राजकीय रंग देऊन जगजीवन राम यांची कारकीर्द संपवण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ती इंदिराजींच्या सूनबाई मनेका गांधी आणि चिरंजीव संजय गांधी यांनी. त्यावेळी मनेका गांधींच्या संपादनाखाली एक मासिक निघायचं. ‘सूर्या’ असं या मासिकाचं नाव. जगजीवनराम यांचे चिरंजीव सुरेश कुमार यांचे एका युवतीबरोबरचे नग्नावस्थेतील फोटो ‘सूर्या’ मासिकाच्या हाती पडले होते.

रमेश कुमार यांचे दिल्ली विद्यापीठातील एका युवतीसोबतचे हे फोटोज ज्यावेळी ‘सूर्या’ मासिकाचे सल्लागार संपादक खुशवंत सिंग यांच्यासमोर बंद लिफाफ्यात त्यांच्या टेबलवर येऊन पडले त्यावेळी ते बघून त्याचं वर्णन त्यांनी आपल्या एका पुस्तकात ‘साक्षात पॉर्न’ असं केलंय. त्यामुळे मासिकाने हे फोटोज छापू नयेत असा सल्ला त्यांनी दिला होता, पण मेनका आणि संजय दोघांना काहीही करून हे फोटोज  छापून आणायचे होते.

JR4
‘सूर्या’ मासिकाने छापलेला सुरेश कुमार यांचा फोटो

‘सूर्या’ मासिकाने आपल्या ऑक्टोबर १९७८ सालच्या अंकात ‘द रिअल स्टोरी’ या शीर्षकाखाली एक रिपोर्ट छापला. या रिपोर्टमध्ये रमेश कुमार यांच्यासोबत असणारी युवती ही आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांच्या संघटनेची सदस्य असल्याचा तसेच भारताची गुपित माहिती तिने चीनला दिली असल्याचा दावा करण्यात आला. या दाव्याला कुठलाही आधार नव्हता. याशिवाय या अंकात सुरेश कुमार आणि त्या युवतीचे ते सगळे नग्न फोटोज छापण्यात आले होते, जे त्यापूर्वी कुणीच छापले नव्हते.

संजय गांधी हे फोटोज छापून आणण्यासाठी इतके उतावीळ होते याची २ मुख्य कारणं अशी की एकतर १९७७ सालच्या काँग्रेसच्या पराभवाला बाबू जगजीवन राम जबाबदार ठरल्याने त्यांच्याविषयी संजय गांधींच्या मनात राग होताच. दुसरं असं की त्यांनी चौधरी चरणसिंग यांना हाताशी धरून मोरारजी देसाई यांचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

‘सूर्या’ मासिकाने जेव्हा हे फोटो छापून अंक प्रकशित केला तेव्हा तो अंक व्यवस्थितपणे स्टॉलवर पोहचविण्याची जबाबदारी खुद्द संजय गांधींनी स्वीकारली.

बाबू जगजीवन राम यांच्याकडून तो अंक स्टॉलवर पोहचू दिला जाणार नाही अशी भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे नियमितपणे चालविण्यात येत असलेल्या वितरण व्यवस्थेऐवजी संजय गांधींनी हे अंक थेट वृत्तपत्राच्या स्टॉलवर पोहोचवले.

सुरेश कुमार यांचे हे फोटोज प्रकाशित झाल्यानंतर देशाच्या संपूर्ण राजकारणात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरेश कुमार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की आपलं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर बेशुद्धीच्या अवस्थेत आपले हे फोटो घेण्यात आले होते. आपल्या अपहरणाचा आरोप त्यांनी त्यावेळचे दिल्ली विद्यापीठातील तरुण नेते के.सी. त्यागी यांच्यावर लावला.

अर्थात सुरेश कुमार यांच्या या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नव्हतं. त्यामुळे या प्रकरणामुळे जगजीवन राम यांच्या राजकीय कारकीर्दीचं व्हायचं ते नुकसान झालंच होतं. पुढे सुरेश कुमार यांनी फोटोमधील ‘त्या’ युवतीशी लग्न देखील केलं, ज्याला जगजीवन राम यांचा विरोध होता. त्यामुळे सुरेश कुमार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या ‘या’ बायकोला घर सोडावं लागलं.

पण म्हणतात ना ‘कर्मा इज ए बीच’ काहीश्या याच न्यायाने २०१६ मनेका यांचे चिरंजीव वरून गांधी यांच्यासंदर्भातील देखील असंच प्रकरण बाहेर आलं होतं.

JR9
डावीकडून राजनारायण आणि चौधरी चरणसिंग

सरकारमध्ये पडलेल्या अंतर्गत फुटीचा फायदा पुढे विरोधी पक्ष काँग्रेसने उठवला. चरणसिंग यांचे हनुमान समजल्या जाणाऱ्या राजनारायण यांची भेट घेऊन संजय गांधी यांनी मोरारजी देसाईंचं सरकार पाडण्यासाठी फिल्डिंग लावली. ‘भारतीय लोक दल आणि जनसंघ जर जनता पार्टीमधून बाहेर पडला तर, चरणसिंगांना पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेस मदत करेल’ असा शब्द त्यांनी राजनारायण यांना दिला.

लोकसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर काँग्रेसचे लोकसभेतील नेते यशवंतराव चव्हाण यांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. चरणसिंग आणि राजनारायण यांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सहाजिकच राजीनामा देण्यासाठी मोरारजींवर दबाव वाढला. शेवटी अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी त्यांनी राजीनामा दिला.

त्यानंतरच्या घडामोडीत काँग्रेसच्या पाठींब्याने चरणसिंग देशाचे पंतप्रधान झाले. यावेळी जगजीवन राम यांना पंतप्रधान पदाने हुलकावणी दिली त्याला ३ गोष्टी कारणीभूत होत्या. पहिली म्हणजे सुरेश कुमार सेक्स स्कॅन्डल प्रकरणामुळे  बाबू जगजीवन राम यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठंच भगदाड पडलं होतं.

दुसरी गोष्ट अशी की ग्रेस जगजीवन राम यांना पंतप्रधानपदावर बसलेलं बघू शकत नव्हती. खरं तर चरणसिंगांना पंतप्रधान पदाचा शब्द देऊन मोराराजींचं सरकार पाडल्याने किमान थोड्या कालावधीसाठी का होईना काँग्रेसला चरणसिंग यांना पाठींबा देणं क्रमप्राप्त होतं.

तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जातीय समीकरण. चरणसिंग असोत किंवा मोरारजीभाई देसाई असोत या ‘तथाकथित उच्चवर्णीय’ लोकांना एक दलित नेता देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतोय, हे पचवणं अवघड होतं.

काँग्रेसच्या पाठींब्याने चरणसिंग देशाचे पंतप्रधान झाले परंतु फक्त २३ दिवसांसाठी. काँग्रेसच्या पाठींब्याने स्थापन झालेलं सरकार पाडणं, हा काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवरील सुरुवात काँग्रेसने चरणसिंग यांच्यापासून केली होती.

सरकार स्थापनेच्या अवघ्या २३ दिवसानंतर पंतप्रधान म्हणून चरणसिंग संसदेला सामोरे जाण्यापूर्वीच इंदिरा गांधींनी सरकारचा पाठींबा काढून घेतला आणि चरणसिंग यांचं सरकारदेखील पडलं. चरणसिंग हे संसदेला सामोरे न जाऊ शकलेले देशाच्या आजतागायतच्या इतिहासातील पहिले आणि एकमेव पंतप्रधान ठरले.

राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डींनी बदला घेतला…?

चरणसिंगांचं सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा जगजीवन राम यांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली होती. सत्तास्थापणेसाठी आवश्यक असणारं बऱ्यापैकी संख्याबळ त्यांच्या समर्थनात देखील होतं. ज्या काही मतांची गोळाबेरीज जमवणं गरजेचं होतं, ते जगजीवन राम यांना आपल्या  दीर्घकालीन राजकीय कारकिर्दीतील अनुभवाच्या आधारे सहजशक्य होतं.

JR2
रडणारे जगजीवन राम आणि उजवीकडे तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी

यावेळी मात्र जगजीवन राम यांच्यासमोर व्हिलन म्हणून समोर आले ते तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी. आता नीलम संजीव रेड्डी हे आपला साधारणतः दशकभरापुर्वीचा बदला पूर्ण करणार होते.

१९६९ सालच्या राष्ट्रपतीपदाच्या ऐतिहासिक निवडणुकीत जेव्हा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेल्या नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव झाला होता, त्यावेळी बाबू जगजीवनराम हे इंदिरा गांधींच्या सोबत म्हणजेच नीलम संजीव रेड्डींच्या विरोधात होते. रेड्डींच्या उमेदवारीला जगजीवन राम यांनी अतिशय उघडपणे विरोध केला होता.

चरणसिंग यांचं सरकार पडल्यानंतर राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी सूत्रे आपल्या हातात घेतली आणि राष्ट्रपतींच्या विवेकाच्या आधारे निर्णय घेण्याच्या अधिकारात लोकसभा विसर्जित करून देशात नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. अशा तर्हेने तिसऱ्या वेळी बाबू जगजीवन राम यांचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं गेलं.

आपल्याला सरकार स्थापन करण्याची संधी न देऊन नीलम संजीव रेड्डी यांनी १० वर्षांपूर्वीचा बदला घेतला असावा’

असं जगजीवन राम यांनीच ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. या मुलाखतीत त्यांना रडू कोसळलं होतं. एवढ्या दिग्गज राजकारण्याचा रडतानाचा फोटो त्या सगळ्या गोष्टींची साक्ष देत होता, ज्या राजकीय षड्यंत्राचे ते शिकार झाले होते.

हे ही वाच भिडू 

3 Comments
  1. Call Center Software says

    Nice Blog, Thank you for sharing a valuable topic.

  2. Bhavana says

    नक्की फोटोज सुरेश कुमारचे होते की रमेश कुमारचे ?

  3. Rohan kakade says

    Don Dalit Nete hya bharat deshala labhale pan babasaheb ambedkar yanchi barobari babu jagjivnram kadhi karu shakle nahi karan asel babasaheb congress ne dhoka karun nivdun n anun dile tari pan tyanche aj nav saglya deshat kay jagat ahe v 8 vela nivdun yeun v cabinet minster asun suddha babu jagjivnram yala kutr dekhil olkhat nahi

Leave A Reply

Your email address will not be published.