म्हणूनच, एक सिद्दी आमदार होण लई महत्वाची गोष्टे…..
दुपारच्या वेळेला आम्ही एका कौलारू घराच्या पुढच्या व्हरांड्यात बसलेलो. जंगलात असल्यामुळे उन एवढ जाणवत नव्हत. तिथ मारिया सिद्दी नावाच्या म्हातारीला भेटायला गेलेलो. म्हातारीन आमच तोंडभर हसून स्वागत केल.
कपाळावर रुपयाएवढ कुंकू, पिकलेल्या कुरळ्या केसांचा माग बुचडा बांधलेला, सुरकुतलेला चेहरा न पाणीदार मोट्ठे डोळे. म्हातारीन लुगड नेसलेलं. तिला बघून आमच्या आज्जीचीच आठवण आली. तिला विचारलं की तुम्हाला काय आख्यायिका, मागल्या गोष्टी माहित आहेत का ? हे विचारल्यावर आधीतर ती गोंधळली. मग तिला डमाम बद्दल विचारलं, (डमाम हे सिद्दी समाजाच पारंपारिक वाद्य आहे, मध्ये कापलेल्या झाडाचा पोकळ बुंधा न दोन्ही बाजूला चामड अस ढोलकीसारख त्या वाद्याच स्वरूप असत.)
डमाम म्हणल्यावर म्हातारीच डोळ लकाकल, तीन डमामची एक गोष्ट सांगितली.
“ माग कधीतरी देव सगळ्यांना काय काय वाटत हुता म्हण, तवा देवाकड सगळ्यात शेवटला सिद्दी गेला. देवान जरा हिकड तिकड हुडकल न कुठन तरी डमाम काढून आमच्या मानसाफूड धरला. हे बघ बाबा ! तु आलायस सगळ्यात शेवटला. आता एवढच उरलय माझ्याकड.”
अस म्हणून देवान डमाम आमच्या माणसाच्या गळ्यात अडकवला. म्हातारीन सांगितलेली ती गोष्ट लई दिवस डोक्यात राह्यलेली ! कुठल्याही समाजाच्या संस्कृतीच, त्यांच्या जीवनपद्धतीच प्रतिबिंब त्यांची लोकगीतांमध्ये, त्यांच्या आख्यायिकांमध्ये उमटलेलं असत.
हे सगळ आत्ता आठवायचं कारण म्हणजे तसच काहीस आत्ताही झालय, लोकशाहीच्या दरबारात पण त्यांचा नंबर शेवटचा लागलाय.
या २२ जुलै रोजी शांताराम सिद्दी यांची कर्नाटकच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झालीये. स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनी एका समुदायाचा प्रतिनिधी इतिहासात पहिल्यांदा निवडला गेलाय ही एकाच वेळी आनंदाची न खेदाची सुद्धा बाब आहे.
आता हे सिद्दी म्हणजे नेमके कोण ?
आपण माग बोल भिडूवर सिद्दी समाजावर एक आर्टिकल केलेलं, तरी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो.
सिद्दी म्हणजे मुळचे आफ्रिकन, बांटू वंशाचे ! गुजरात, कर्नाटक, काही प्रमाणात महाराष्ट्र न हैद्राबाद अशा भारतातल्या वेगवेगळ्या भागात सिद्दी राहतात. त्यांची लोकसंख्या बघायला गेली तर जवळपास साठ ते पासष्ट हजारांच्या घरात आहे. त्यातले तीस हजार तरी कर्नाटकाच्या जंगलामध्ये वास्तव्याला आहेत. आता ते भारतात कधी आले याबद्दल बरेच प्रवाद असले तरी कर्नाटकमध्ये असणारे सिद्दी हे मुख्यत्वेकरून पोर्तुगीज लोकांनी गुलाम म्हणून गोव्यात आणलेले होते, पुढे गुलामी रद्द झाल्यानंतर ते कर्नाटकच्या जंगलामध्ये स्थायिक झालेयत.
इतिहासात डोकावून बघितल तर खडकी (म्हणजे आत्ताच औरंगाबाद) शहर वसवणारा निजाम सेनापती मलिक अंबर हा सुद्धा सिद्दीच होता, जंजिऱ्याचा अजिंक्य किल्ला उभारण्याच श्रेय सुद्धा त्यालाच दिल जात.
आता मेन मुद्दा सांगतो,
जवळपास चारशे वर्ष इथे राहूनपण आपण त्यांना आपल म्हणायला तयार नाय. कारण काय ? तर एवढच की तुम्ही इथल्यासारखे दिसत नाही. अगदी चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी जंगलामध्ये एखाद्या सायकलचा आवाज जरी आला किंवा बाहेरचा कोणी येताना दिसला तर गावातले सगळे पुरुष जंगलात पळून जात, का तर बाहेरचा माणूस आलाय म्हणजे आपल्याला धरायलाच आला असणार ह्या भावनेन ! सुरुवातीला फक्त कंदमूळ खाऊन, मिळेल तर शिकार करून नाहीतर दिवस दिवस उपाशी राहून त्यांनी दिवस काढलेले आहेत.
अजूनपण ऐंशी वर्षांचे म्हातारे असे भेटतील ज्यांनी जंगलाच्या बाहेर कधी पाउल ठेवलं नाय. आणि अस काय नाय बरका की जंगल एकदम दुर्गम भागात आहेत, यल्लापूर हे तालुक्याच ठिकाण त्यांना अगदी चालण्याच्या अंतरावर आहे, पण ते बाहेर पडले नाहीत कारण आपण सतत दुजाभाव करत आलोय.
आत्तापण त्यांना विचारलं तर ते सांगतात की जंगलच आमच घर आहे कारण तुम्ही कुठन आलंय ? तुम्ही असे का दिसताय ? असले प्रश्न जंगल विचारत नाय.
कधी यल्लापूर किंवा अगदी हुबळी धारवाड भागात गेला तर तुम्हाला सिद्दी हमखास भेटतील. तुम्हीपण त्यांच्याकड मान वळवून बघितल्याशिवाय राहणार नाय ! त्याच कारण अस की धोतर न सदरा घातलेले, डोक्याला टॉवेल बांधलेले पण कन्नड बोलणारे आफ्रिकन पुरुष, कुरळ्या केसांचा अंबाडा बांधलेल्या, गोल साडी नेसणाऱ्या आफ्रिकन बायका बघायची तुम्हाला सवय नाहीये. त्यांची मूळ जागा, मूळ भाषा, मूळ संस्कृतीबद्दल त्यांना काहीच माहित नाहीये. अगदी जेवणापासून ते चालीरीतींपर्यंत सगळ्या बाजूंनी ते पक्के भारतीय आहेत.
त्यांची भाषा सुद्धा कोकणी, कन्नड न काही प्रमाणात मराठी या तिन्ही भाषांची मिळून बनलेली आहे. हिंदू,मुस्लीम न ख्रिश्चन या तिन्ही धर्मामध्ये सिद्दी आढळतील पण त्यांचे धर्म त्यांच्या कोणत्याच गोष्टीच्या कधी आड आले नाहीयत.
आधी आम्ही सिद्दी आहोत मग बाकी काय असेल ते अस प्रत्येक सिद्दी अभिमानाने सांगतो.
आता भारतीयत्वाचा निकषच लावायचा झाला तर या बाबतीत ते आपल्याहून काकणभर सरस आहेत, असच म्हणल पायजे नाय का ? १९८६ मध्ये पहिल्यांदा सिद्दी आणि काही इतर लोकांनी मिळून AKSDA (Akhil Karnatak Siddi Development Association) ची स्थापना केली. त्यायोगे सिद्दी समाजाला S.T. स्टेट्स मिळावा म्हणून त्यांनी लढा दिला, यामध्ये त्यांना मोलाची मदत केली ती तत्कालीन कॉंग्रेस खासदार मार्गारेट अल्वा यांनी. त्यांच्या लढ्याला यश आले ते २००३ मध्ये ! पण तेव्हा फक्त उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिद्दीनाच S.T. स्टेट्स मिळाला. धारवाड न बेळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी असणाऱ्या सिद्दींना यासाठी अजून सतरा वर्षे झगडावं लागल, आत्ता २०२० मध्ये केंद्र सरकारने त्यांना सुद्धा STमध्ये समाविष्ट केल जावं म्हणून परिपत्रक काढलंय.
दोन्ही वेळेला तिथल्या स्थानिक लोकांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. एका संघटनेनं तर फक्त हिंदू सिद्दींचा समावेश केला जावा अशीही मागणी केलेली.
हे शिकून मस्तीला येतील, हे शिकले तर आमच्या शेतात काम कोण करणार, शिकून करणार काय ? ही तिथल्या स्थानिकांची भाषा ! आता अनुसुचित जमातींमध्ये समाविष्ट केल्यामुळे ज्या विविध सुविधा मिळतायत त्याचा त्यांना खरच फायदा होतोय. ते पहिल्यांदा पक्क्या घरांमध्ये राहतायत, त्यांची मुल चांगल्या शाळांमध्ये शिकतायत, त्यांना सरकारकडून दर महिन्याला पोषणआहार मिळतोय. पण अजूनही पिण्याचे पाणी, घरांसाठीच अनुदान, रस्ते या गोष्टींसाठी त्यांना जिल्हा कलेक्टरकडे धाव घ्यावी लागते, वेळप्रसंगी आंदोलन करावी लागतात.
स्थानिक पातळीवर कितीही प्रयत्न केले तरी जोवर आमचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात आमचा माणूस असणार नाही, तोवर गोष्टी सोप्या होणार नाहीत ही तिथल्या प्रत्येकाची धारणा होती, आहे.
पिढ्यानपिढ्या झापड लावून जगणाऱ्या न रिझर्वेशनच्या नावान खडे फोडणाऱ्या लोकांना हे कोण सांगणार की बाबांनो, आजही तुमच्या प्रीव्हीलेजच्या पलिकड कुणाचतरी जगण सुरु होत? आपल्या आपल्यातच कोण पुढचा न कोण मागचा, कोण वरचा न कोण खालचा हा सावळागोंधळ चालू असताना, लाईनमध्ये शेवटला जे उभे आहेत, त्यांच्याकड कधी लक्ष जायचं? कायद्यामध्ये तरतुदी केल्या असल्या तरी त्यांचा फायदा खरच होतोय का नाय हे बघणार कोण? म्हणूनच,
एक सिद्दी आमदार होण लई महत्वाची गोष्टे !
आता आपल्या आजूबाजूलाच बघायचं झाल तर नोकरी, शिक्षण ते पार हॉस्पिटलमध्ये उपचार चांगेल व्हावेत न इच्छुक स्थळी बदली व्हावी अश्या एक ना अनेक कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे आपण खेटे घालत असतोय. आमदार विकास फंडाच्या माध्यमातून होणारी छोटीमोठी विकास काम ही वेगळीच ! लोकांच म्हणण सरकारपर्यंत न सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवणारा दुवा म्हणजे लोकप्रतिनिधी !
वेगवेगळ्या निकषांच्या फुटपट्ट्या लावून तुमची राष्ट्रभक्ती मोजली जातेय आणि तुमच्या नागरिकत्वाचा पुरावे मागितले जातायत अशा काळात सिद्दी लोकांचा स्वतःचा आवाज विधानपरिषदेत असण खूप मॅटर करत.
त्यांचा प्रतिनिधी म्हणून योग्य माणसाची निवड झालीये यात शंका नाहीये. १९८८ मध्ये अर्थशास्त्रातून B.A. झालेले शांताराम सिद्दी गेले ३० वर्षे समाजकार्य करतात. वनवासी कल्याण आश्रम या संस्थेशी ते संलग्न आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सिद्दी मुलांसाठी हॉस्टेल्स, उच्चशिक्षण आणि चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केलेत. आपण आमदार होऊ अशी त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती, मात्र आता मिळालेल्या जबाबदारीची जाणीव असून सिद्दींचा आवाज पोचवण्याच काम करेन अस ते म्हणतात.
The true measure of a democracy is the way it treats its minorities, अस म्हंटलं जात. आणि या समाजाला मिळालेलं प्रतिनिधित्व हे आपली लोकशाही तसूभराने का होईना बळकट झाली याचच द्योतक आहे अस म्हणूयात. जगातल्या सगळ्यात मोठ्ठ्या लोकशाहीसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.
- अभयसिंह जाधव.
- फोन नंबर : 82377 83567
हे ही वाच भिडू
- लायजी पाटलांनी जंजिऱ्याच्या सिद्दीला अरबी समुद्रात गाडण्यासाठी धाडसी योजना आखली होती.
- आफ्रिकन म्हणून चेष्टा होणारे सिद्दी भारताला ऑलिंपिकमध्ये गोल्ड मिळवून देतील?
- मलिक अंबर: या आफ्रिकन हबशी माणसाने मराठ्यांना गनिमी काव्याची देणगी दिली.