यासाठी भारतात ठिकठिकाणी पोस्टमनचे पुतळे उभारण्यात येत आहेत.

पोस्टमन काका ? एकेकाळी यांच्या शिवाय आपल्या आयुष्याचं पान सुद्धा हलत नव्हत. घरात बाळ जन्मलय इथं पासून ते कोणाच्या मृत्यूची बातमी पत्रानेच कळायची. प्रत्येक सुखादुखाच्या बातम्या पोस्टमन काकांच्याकडूनच कळायच्या, तेच सगळ्याचे पहिले साक्षीदार असायचे. आपल्या सायकलवर अशाच अगणित भावनांच गाठोडं घेऊन ऊनपावसाची पर्वा न करता हे पोस्टमन मामा निरपेक्षपणे हे काम करत राहायचे.

पण आज आपली त्यांच्यावरची डिपेंडसी कमी झाली. संपर्क क्रांती मुळे एक रुपयात फोन कॉल करता येऊ लागले. तेच फोन मोबाईल बनून हातात आल्यावर सेकंदावर बिलिंग सुरु झालं. पत्र लिहिण्याची कला दुर्मिळ होत गेली. हातातले मोबाईल कधी स्मार्ट झाले कळलच नाही.

जिओने ४ जी च्या रुपात इंटरनेट डेटाचे लोकशाहीकरण केले.  व्हॉटस्अपच्या जगात आपण एकमेकाच्या अगदी जवळ आलो आहोत. एका क्षणात व्हिडिओ कॉल करून समोरच्याला पाहता येत असताना टपालाची वाट कोण बघत राहणार. 

आज फक्त टेलिफोन बिल, लाईटबिल अशी ऑफिशियल कागदपत्रे देवान घेवाण करण्यापुरते पोस्टमन काका उरलेत. पत्राची, पोस्टमन काकांची, त्यांच्या सायकलच्या घंटीची आपण वाट बघत नाही. त्यांना पूर्णपणे विसरून गेलोय.

पण सगळेच जग एवढे निष्ठुर नाही. पोस्टमन आणि टपाल हा आपला गौरवशाली भूतकाळ आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या शेकडो फुटी पुतळे उभारण्याच्या स्पर्धेत बेळगाव मध्ये मागच्या आठवड्यात एका अनोख्या पुतळयाच अनावरण करण्यात आलं.

कोणाचा माहित आहे काय? पोस्टमन काकांचा पुतळा.

बेळगाव मध्ये पोस्टाच्या कर्मचाऱ्यानी वर्गणी काढून पोस्टमन काकांचा आठ फुटी ब्राँझचा पुतळा बनवून घेतला. एवढच नाही तर धनगरी ढोलच्या गजरात अख्ख्या गावात त्याची मिरवणूक काढली. सगळे पोस्ट कर्मचारी या मिरवणुकीत हजर होते.

यात जुन्या संस्थान काळातल्या वेशातले फेटावाले पोस्टमन काका आणि स्वातंत्र्यानंतरचे खाकी कपड्यातले पोस्टमन काकासुद्धा आघाडीवर होते. पूर्ण गाव हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी हजर झाले होते. कर्नाटक राज्याच्या वनमंत्र्यांनी बेळगावच्या मुख्य कार्यालयासमोर या पुतळ्याचे अनावरण केले.

या घटनेची रितसर बातमी झाली, लोकांनी छान कौतुक देखील केल पण बातमी इतक्यावर थांबत नाही कारण हा काही भारतातला पहिला पुतळा नाही. यापूर्वी कोल्हापूर जवळच्या वारणानगर मध्ये देखील थंडीवाऱ्यात जनतेची सेवा करणाऱ्या पोस्टमन काकांच्या सेवेला न्याय म्हणून पुतळा उभा केला आहे.

पण भारतातला पोस्टमन काकांचा पहिला पुतळा म्हणजे, म्हैसूर मध्ये असलेला पोस्टमन बसप्पा यांचा पुतळा.

बसाप्पा हे संस्थानकाळातले पोस्टमन होते. त्या काळात रस्ते, बस इतकेच काय सायकलीची सुद्धा सोय नव्हती. त्यावेळी बसप्पा यांनी दारोदारी पायी फिरून वेळेत पत्रे पोहचवली. अख्ख्या म्हैसूरमध्ये ते पोस्टमामा म्हणून प्रसिद्ध होते.

१९०७-०८ साली म्हैसूरचे राजे कृष्णराजा वाडियार यांनी त्यांच्या आणि पोलीस हवालदार भुजंगराव जगदाळे यांच्या कार्याचा गौरव म्हणून दोघांचे पुतळे उभा केले. 

शंभरच्या वर वर्षे झाली, आजही हे पुतळे पोस्टमन काकांच्या प्रमाणे ऊनपावसाचा सामना करत खंबीर पणे उभे आहेत. पण जसे आपण पोस्टमनना विसरून गेलोय तसे प्रशासनाचेही या पुतळ्याकडे दुर्लक्ष झालय. रस्ता रुंदी करणाच्या चढाओढीत पोस्टमामा आणि हवालदारमामांचे पुतळे अनेक ठिकाणी फरफट चालूच आहे.

फक्त पुतळे उभा करणे म्हणजे इतिहासाचा गौरव करणे नसून त्यांची व्यवस्थित देखभाल करणे हे सुद्धा या गौरवाचा भाग आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.