क्रिकेटचा शोध लावणारा इंग्लंड, इतिहासातील पहिल्याच कसोटीत पराभूत झाला होता !!

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या आणि एकूणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. ही कसोटी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १००० वी कसोटी ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी इंग्लंडच्या संघाचे आयसीसीकडून अभिनंदन करण्यात आले असून संघाला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या प्रसंगी जाणून घेऊयात कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या कसोटी सामन्याविषयी, जो इंग्लंडचा देखील पहिलाच कसोटी सामना होता.

क्रिकेट हा साहेबांच्या देशातील म्हणजेच इंग्लडमधील खेळ. जगभरात जिथे कुठे क्रिकेट खेळलं जातं, तिथे क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार करण्याचं श्रेय निर्विवादपणे इंग्लंडला जातं. इंग्रज जिथे कुठे गेले, सोबत क्रिकेट देखील घेऊन गेले.

क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना खेळवला गेला तो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान. १५ मार्च ते १९ मार्च १८७७ दरम्यान ऑस्ट्रेलियातील ‘मेलबर्न क्रिकेट ग्राउंड’ अर्थात एमसीजीच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यानेच कसोटी क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही ‘टाइमलेस टेस्ट मॅच’ होती. म्हणजेच सद्यस्थितीतल्या सामन्यांप्रमाणे ५ दिवसात मॅच संपवण्याचं कसलंही बंधन नव्हतं. जोपर्यंत निकाल लागणार नाही, तोपर्यंत सामना खेळवला जाऊ शकत होता. शिवाय या सामन्यातील एक ओव्हर ४ बॉल्सची होती.

charles bannerman
चार्ल्स बॅनरमन

ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन बॅट्समन चार्ल्स बॅनरमन याने जेव्हा इंग्लंडच्या आल्फ्रेड शॉने टाकलेल्या पहिल्या बॉलचा सामना केला त्यावेळी दोघांनीही इतिहास रचला होता. दोघांनीही आपली नावे अनुक्रमे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या बॉलला सामोरा जाणारा बॅट्समन आणि पहिला बॉल टाकणारा बॉलर म्हणून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नोंदवली होती.

चार्ल्स बॅनरमनसाठी तर हा सामना स्वप्नवत ठरला होता. कारण या सामन्यात त्याने दणदणीत नाबाद १६५ धावांची इनिंग साकारली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या  बॉलचा सामना करणारा  खेळाडू, पहिला शतकवीर, पदार्पणात शतक झळकावणारा पहिला खेळाडू असे अनेक विक्रम त्याच्या नावे नोंदवले गेले होते.

क्रिकेटच्या इतिहासातील अशी टेस्ट मॅच ज्यामध्ये खेळाडूंना रविवारची सुट्टी देण्यात आली

ब्रॅडमनचा खेळ बघण्यासाठी देवदास गांधींनी जेलमध्ये रात्र घालवली होती

या खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळलंय

एवढं कमी म्हणून की काय बॅटिंग करताना दुखापतग्रस्त झाल्याने त्याला अर्ध्यातच आपली इनिंग थांबवावी लागली होती. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला ‘रिटायर्ड हर्ट’ खेळाडू देखील ठरला. कदाचित जखमी झाला नसता तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलं द्विशतक देखील त्याच्या नावावर नोंदवलं गेलं असतं.

चार्ल्स बॅनरमनच्या १६५ धावांच्या इनिंगनंतर देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपल्या पहिल्या डावात फक्त २४५ रन्स उभारता आल्या. चार्ल्स बॅनरमनच्या १६५ धावा या ऑस्ट्रेलियन संघाच्या एकूण धावसंख्येच्या ६७.३ % एवढ्या होत्या. अशाप्रकारचा संघाच्या एकूण धावसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक धावा करण्याचा हा आगळावेगळा विक्रम अजूनही त्याच्याच नावावर जमा आहे. कुठल्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूने पदार्पणात काढलेल्या सर्वाधिक धावांचा बॅनरमनचा विक्रम देखील अजूनही कुठल्याच ऑस्ट्रेलियन खेळाडूला मोडता आलेला नाही.

cricketar2
बिली मिडविंटर

ऑस्ट्रेलियाच्या २४५ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ बिली मिडविंटरच्या भेदक माऱ्यासमोर आपल्या पहिल्या डावात केवळ १९६ धावाच  उभारू शकला.  मिडविंटरने आपल्या ५४ ओव्हर्समध्ये ७८ रन्स मोजत ५ विकेट्स मिळवल्या. कसोटीच्या एका डावात तसेच पदार्पणाच्या कसोटीत ५ विकेट्स घेणारा तो इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला.

पहिल्या डावातील ४९  रन्सच्या आघाडीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने १०४ रन्सची भर घातली आणि इंग्लंडच्या संघासमोर विजयासाठी १५४ धावांचं आव्हान दिलं. पण हे छोटंसं आव्हान देखील इंग्लंडच्या संघाला पेलवलं नाही. त्यांचा संघ अवघ्या १०८ धावांमध्ये ढेपाळला. इंग्लंडच्या संघाचं कंबरड मोडण्यात सर्वात महत्वाची भूमिका निभावली ती टॉम केंडाल यानं. त्याने आपल्या ३३ ओव्हर्समध्ये ५५ धावा देत इंग्लंडच्या ७ बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या कामगिरीने केंडालने आपला सहकारी बिली मिडविंटरच्या विक्रमाशी बरोबरी केली.

अशाप्रकारे क्रिकेटच्या इतिहासातील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४५ धावांनी जिंकली. गंमत म्हणजे १९७७ साली कसोटी क्रिकेटच्या १०० व्या वर्षपूर्तीनिमित्त १२ ते १७ मार्च १९७७ या कालावधीत मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान कसोटी सामना खेळविण्यात आला. हा सामना देखील ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या कसोटीएवढ्याच फरकाने म्हणजे ४५ धावांनी आपल्या खिशात घातला.

क्रिकेटच्या बॅटचा आकार कसा बदलत गेला

भारतीय क्रिकेटमधील ‘राज कपूर’, ज्याने संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी विजय मिळवून दिला 

गेल्या २१ वर्षांपासून गांगुलीचा हा विश्वविक्रम कोणीच मोडू शकलेलं नाही

Leave A Reply

Your email address will not be published.