थ्रो केला जॉन्टी ऱ्होडसने आणि एक आगळा वेगळा विक्रम नोंदवला गेला सचिनच्या नावावर.

क्रिकेट म्हंटले की सचिन आणि सचिन म्हंटले की विक्रम असे समीकरणच तयार झालेले आहे. कित्येक विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहेत. पण एक लाजवणारा विक्रम सुद्धा सचिनच्या नावावर नोंदवला गेला होता. आणि हा विक्रम नोंदवण्यात हात होता जॉन्टी ऱ्होडसचा

जॉन्टी ऱ्होडस हा साऊथ आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू. तो अजुनही त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. म्हणजे क्रिकेट विश्वात खरतर खेळाडू हे त्यांच्या फलंदाजीने अथवा गोलंदाजीने ओळखले जातात. पण जॉन्टी ऱ्होडस माञ त्याला अपवाद ठरला. 

जॉन्टी ऱ्होडसच्या अगोदर देखील अनेक चांगले क्षेत्ररक्षक होऊन गेले. पण ते फक्त उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून कधीही लक्षात राहिले नाहीत.

जॉन्टी ऱ्होडस हा असा एकमेव क्षेत्ररक्षक होता की, फलंदाजी आणि गोलंदाजी या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून क्रिकेट विश्वामध्ये नाव करण्याच्या काळात जॉन्टी ऱ्होडसचे फिल्डिंगचे पोस्टर्स जगभर लागत होते. त्याने फक्त फिल्डिंगच्या जोरावर जाहिरीती मिळवल्या होत्या. धावा वाचवून सुद्धा सामने जिंकता येतात हे त्याकाळी फक्त फक्त जॉन्टी ऱ्होडसमुळे कळाल.

आजही कुठल्या खेळाडूने उत्तम क्षेत्ररक्षण केले तर त्याला लगेच जॉन्टी ऱ्होडस असे संबोधले जाते. एवढ ठोस काम त्याने क्षेत्ररक्षणात करून ठेवले आहे. फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जगभरात आपल नाव अजरामर करणारा जॉन्टी ऱ्होडस हा एकमेवच. 

तर एकदा झाले असे की, १९९२ साली भारतीय क्रिकेट संघ साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यामध्ये ५ टेस्ट सामने खेळले गेले. त्यातला पहिला सामना हा डरबन येथे खेळला गेला. भारताची धुरा तेव्हा अझरुद्दीन वर होती तर साऊथ आफ्रिकेची धुरा केपलर वेसल ह्याच्यावर होती.

क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज खेळाडू त्या मॅच मध्ये नवखे म्हणून खेळत होते. भारताकडून सचिन तेंडुलकर तर साऊथ आफ्रिकेकडून जॉन्टी ऱ्होडस. तसा सचिन हा थोडाफार अनुभवी झाला होता पण जॉन्टी ऱ्होडसने त्याच साली आपले पदार्पण केले होते.

पहिला कसोटी सामना सुरु झाला. भारताची पहिली फलंदाजी आली. सचिन खेळायला आल्यानंतर त्याने दमदार सुरुवात केली. आपल्यासारखेच ह्यांचे सुद्धा क्षेत्ररक्षण मवाळ असेल असे समजुन सचिन खेळू लागला. तेव्हा जॉन्टी ऱ्होडस हा सगळ्यांसाठी नवखा होता आणि त्याच मॅचमध्ये जॉन्टी ऱ्होडस काय चीज आहे हे त्याने सगळ्यांना दाखवुन दिले. 

सचिनने घेतलेल्या एका धावावर जॉन्टी ऱ्होडसने एक अचूक थ्रो साधला आणि स्टंप उडवले. पण निर्णय देताना पंचांच्या मनात शंका होती. म्हणून त्यांनी टीव्हीवर स्लो मोशन रीप्ले पहिला आणि सचिन आऊट असल्याचा दिव्यातून संदेश देण्यात आला.

अशा प्रकारे टीव्ही च्या साह्यान (थर्ड अंपायर) धावबाद होणारा सचिन हा क्रिकेट इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला. कित्येक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या सचिनला जॉन्टी ऱ्होडसने अश्या प्रकारे एका विक्रमाचा मानकरी ठरवले.

  •  कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.