कोल्हापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदा एक “महिला” आमदार म्हणून निवडून आलेय..

कोल्हापूर उत्तरची निवडणूक प्रतिष्ठेची होती. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी भाजपकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची होती तर कॉंग्रेसकडून बंटी पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. दूसरीकडे महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षाचा समन्वय कसा असेल हे दाखवण्यासाठी देखील ही पोटनिवडणूक महत्वाची होती.

झालं देखील तसच,

२२ व्या फेरीअखेर कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी ८३,३३८ मते घेतली आहेत तर भाजपचे सत्यजीत कदम यांनी ६८,८१३ मते घेतली आहेत. अजून ६ फेऱ्या शिल्लक असल्याने कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

विजयाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी हा विजय मात्र निश्चित झालेला आहे. या विजयामुळे जयश्री जाधव या कोल्हापूर शहरातून निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार ठरणार आहेत आणि ही निश्चितच कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट असेल.

कोल्हापूरकरांसाठी अभिमान वाटणारी गोष्ट का?

आख्या जगासाठी वूमन असतं, महिला असतं पण कोल्हापूरात “बाईमाणसं” असतं. नऊवारी लुगडं नेसून नवऱ्याच्या मिशीचा आकडा उतरवणारी खमकी बाई कोल्हापूरच्या जगण्याची गोष्टय. म्हणूनच इथल्या पोरी पण “मी आलो”, “मी गेलो” ची पुल्लिंगी भाषा बोलत असतात.

कोल्हापूरची ओळख काय तर..

अंबाबाईंच मंदीर, प्रत्येक भावकीला अडचणीत सोडवणारी ताईबाई..इतिहास गाजवणाऱ्या ताराराणी ते अगदी ऑस्कर पदरात घेवून येणाऱ्या भानू अथय्या..

कोल्हापूरचं राजकारण मिश्यांना पिळ देणारं. पण या राजकारणात कधीच महिलांची मक्तेदारी राहिली नाही.

आत्ता तस निम्म्या महाराष्ट्रातल्या शहरांवर, जिल्ह्यांवर कधिही महिला आमदार निवडून न देण्याचा  ठपका आहेच पण कोल्हापूर इथं वरचढ ठरत कारण कोल्हापूर ताराराणींचा इतिहास सांगतो..

ताराराणींच्या आयुष्याचा घटनाक्रम असा होता की, त्यांनी फक्त सुनेचीच नाही, मराठा साम्राज्याच्या रक्षणाची आणि रयतेच्या कल्याणाची जबाबदारीही पेलली.

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणींनी स्वराज्याची सूत्रं आपल्या हातात घेतली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई आणि पुत्र शाहू हे औरंगजेबाच्या कैदेत होते. नवऱ्याचं अकाली निधन, स्वराज्याने अल्पावधीत गमावलेले तीन छत्रपती आणि समोर औरंगजेबासारखा क्रूर शत्रू असतानाही ताराराणी डगमगल्या नाहीत.

मराठा साम्राज्यात असणाऱ्या सरदारांना, मावळ्यांना आणि असंख्य वीरांमध्ये त्यांनी स्वराज्याची ज्योत तेवती ठेवली. ताराराणींनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांचा राज्याभिषेक घडवून आणला आणि स्वराज्याचा कारभार हाती घेतला. मुगलांनी जिंकलेले किल्ले त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा स्वराज्यात आले. त्यांच्या संघर्षात कणखरता तर होतीच, पण त्यांनी कारभारही अगदी चाणाक्षपणे हाताळला.

ताराराणी फक्त मुघलांचं अतिक्रमण थोपवून थांबल्या नाहीत, तर त्यांनी स्वराज्य वाढवण्यासही बळ दिलं. काही सरदार मुघलांविरोधात लढत असताना, त्यांनी इतर सरदारांना मुलुख वाढवण्याची, शत्रूच्या भागांवर हल्ला करण्याची जबाबदारी दिली. युद्धाच्या रणात ताराराणींनी दस्तूरखुद्द औरंगजेबावर मात केली.

छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं, तेव्हा ताराराणींचं वय होतं अंदाजे २५ वर्ष. त्यांनी आपला देह ठेवला वयाच्या ८६ व्या वर्षी.

जवळपास ६१ वर्षांचा काळ ताराराणींच्या शौर्यानं, चाणाक्ष राजकारणानं गाजवला. आपल्या पतीच्या पश्चात एक महिला आपल्या सासऱ्यांनी कष्टानं उभारलेल्या स्वराज्याचं रक्षण करते, घराण्याची पराक्रमाची परंपरा कायम ठेवते, मुलुख सांभाळते, मुलुख वाढवते आणि करवीरची स्थापना करते..

अशा या करवीरचा इतिहास असणाऱ्या शहरातून एकही महिला आमदार आजवर आमदार झाली नव्हती, आत्ता कोल्हापूराने हा अनुशेष भरून काढला ही निश्चितच चांगली गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.