ही फक्त काका पुतण्याची भांडणे नाहीत तर नितीश कुमारांनी निवडणुकीचा बदला घेतलाय
बिहार मधला वाद काय थांबायचं नाव घेईन. शेवटी बिहारचं ते. असो… काका पुतण्याचा वाद आता घर सोडून चव्हाट्यावर आलाय. कसा तो वाचा.
लोक जनशक्ती पार्टीचा अंतर्गत वाद थांबायचं नाव घेईना. उलट सगळ्यांसमोर एकमेकांना विवस्र करण्यात काका पुतण्या मग्न आहेत. चिराग पासवान आणि काका पशुपति कुमार पारस असा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे.
आता हा ड्रामा काय आज सुरू झालेला नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये पक्षाचे अध्यक्ष म्हणून चिराग पासवान यांची नियुक्ती झाल्यानंतर हे वातावरण गढूळ व्हायला सुरुवात झाली. पण आत्ता, जेडीयूने म्हणजेच नितीशकुमारांच्या जनता दलानं शेवटची काडी टाकण्याचं काम केलंय. आणि यामुळं लोक जनशक्तीत आग लागलीय. असं बिहारमध्ये तरी बोललं जातंय.
मध्येच काय झालं पशुपति पारसांना
लोक जनशक्ती पार्टीचे खासदार पशुपती कुमार पारस यांना पक्षाचा संसदीय नेता बनायचं आहे. तशा आशयाच पत्र पार्टीतल्या ६ पैकी ५ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलयं.
आता या संपूर्ण प्रकरणात पशुपती कुमार पारस यांनी एकाच बाणात अनेक पक्षी मारलेत. बिहारमधल्या माध्यमांशी बोलताना पशुपती पारस यांनी चिराग पासवान यांच नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तर दुसरीकडे नितीशकुमारांच कौतुक केलं.
“मैं नीतीश कुमार को अच्छा नेता मानता हूं. नीतीश कुमार विकास पुरुष हैं.”
ते आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणतायत की,
काल घेतलेला निर्णय नाईलाजाने घेतलाय. आम्ही रामविलास पासवान यांचे भाऊ आहोत. आम्ही तिघे भाऊ होतो. आणि जगाला माहित आहे की आमच्यात किती अतूट प्रेम होतं. २८ नोव्हेंबर २००० रोजी रामविलास पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली होती. पार्टी खूप चांगली चालली होती. माझे मोठे व लहान भाऊ दोघेही या जगातुन गेलेत. हे माझं दुर्दैव आहे. मी एकटा पडलोय.
२०१४ च्या निवडणुकांत आम्ही एनडीएच्या गठबंधनचा भाग होतो. आणि ते गठबंधन २०२० च्या निवडणुकांत पण राहावे अशी पक्षाच्या ९९ टक्के कार्यकर्ते, खासदार, आमदार या सर्वांची इच्छा होती. पण तसं काही घडले नाही.
तसेच जाता जाता त्यांनी, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या पक्षाविरोधात उमेदवार उभे करण्याबद्दलही चिराग पासवान यांना टोला लगावला. ते म्हणाले की,
९९ टक्के कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं आणि युती तोडली.
एखाद्याला जवळ करून आणि एखाद्याशी वैर राखण्याचा परिणाम असा झाला की बिहारमध्ये एनडीए कमकुवत झाली. आमचा पक्ष लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. आमच्याकडे फक्त ६ खासदार आहेत, त्यातल्या अर्ध्यांची मागणी आहे की, पक्ष वाचवण्याची गरज आहे. पण मी पक्ष तोडलेला नाही उलट पक्ष वाचविला आहे.
चिराग पासवान हे अध्यक्ष राहतील की नाही या प्रश्नाला उत्तर देताना पशुपती पारस म्हणतात, चिराग माझा पुतण्या आहे, मला त्याच्याविषयी काही हेवेदावे नाहीत. त्यांना पक्षात राहायचं तर ते राहू शकतात.
यात आता नितीशकुमारांनी काडी टाकण्याचा काय विषय आहे?
२०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमात चिराग पासवान यांनी नितीशकुमारांना तुरूंगात पाठवण्याची भाषा केली होती. त्या पुढं जाऊन चिराग पासवान यांनी नितीशकुमारांच्या पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे केले होते.
स्वतःला पंतप्रधानांचा हनुमान म्हणवून घेणारे चिराग यांनी नितीश यांना पराभूत करण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले. विधानसभेसाठी १४३ जागांवर लढलेल्या लोक जनशक्ती पार्टीला केवळ एकच जागा जिंकता आली. चिरागच्या या चालीचा भाजपला फायदा झाला. मात्र नितीशकुमार यांच्या पक्षाच्या जागा घटल्या आणि ४३ वर आल्या.
निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आणि चिरागच्या मनोवृत्तीमुळे पक्षात असंतोष पसरु लागला होता. याचाच फायदा घेत नितीशकुमारांनी पहिला डाव टाकला. त्यांनी लोक जनशक्ती पार्टीच्या २०० हून अधिक जिल्हाध्यक्षांना जनता दलात घेतले.
लोक जनशक्ती पार्टीच्या प्रवक्त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एक महत्वाची माहिती दिली,
विधानसभा निवडणुकी पासून ते चिरागचे अध्यक्ष होण्यापर्यंतच्या गोष्टींदरम्यान पशुपती पारस एकटे पडलेत हे नितीशकुमारांना ठाऊक होते. या बिघाडात अजून बिघाड करण्यासाठी नितीशकुमार यांचे निकटवर्तीय आणि जनता दलाचे खासदार लल्लन सिंह यांनी महत्वाची भूमिका निभावली.
ते पशुपति पारस यांच्या जवळ आहेत. अलीकडेच पाटणा येथे जेडीयू अध्यक्ष आर.पी. सिंह, जेडीयूचे खासदार लल्लन सिंग आणि पशुपती पारस यांची बैठक झाली होती. स्वत: पशुपती पारस जेडीयूमध्ये जाणार नाहीत मात्र जेडीयूचा त्यांना पाठिंबा राहील असं त्या बैठकीत ठरले.
यावर लोक जनशक्ती बिहारचे प्रवक्ते संजय सिंह यांनी सांगितले की,
पारस जरी पक्षाचे संसदीय नेते होत असले तरी पारस यांना अध्यक्ष होता येणार नाही. कारण त्यांना हे ठाऊक आहे की कार्यकर्ते चिराग पासवानांनाच निवडणार.
नितीशकुमारांचा पुढचा डाव म्हणजे धोबीपछाड,
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला नितीशकुमार यांनी बांगला प्रतीक असलेला लोक जनशक्तीचा एकमेव आमदार राजकुमार सिंह याला पण फोडून आपल्या जनता दलात घेतले. म्हणजे आता बिहार विधानसभेत लोक जनशक्तीचा एकही आमदार नाही.
राजकारणाचं एक कटू सत्य आहे ते म्हणजे, राजकारणात तरी कोणी कोणाचं नसतं. आता हेच बिहार मध्ये याची देहा याची डोळा बघायची वेळ आलीय. ज्या भाजपासाठी चिरागने नितीशच्या विरोधात मोर्चा उघडला होता, त्याच चिरागचं वस्त्रहरण होत असताना भाजपा मात्र कार्यक्रम बघत बसलंय.
भिडू हे ही वाचा
- बिहारमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर १५० पेक्षा जास्त मृतदेह आढळले? नक्की काय आहे प्रकरण
- कित्येक वर्षांपासून युपी, बिहार गरीबच का राहिले आहेत ?
- नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणात पलटूराम अस का म्हणतात?