ही पाच वाक्ये तुमच्या खोलीत नसतील तर MPSC साठी तुम्ही अपात्र आहात ! 

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे

जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे ! 

दोघांच घर ??? खोली म्हण खोली. तिप पण ढेकणानं भरलेली. ढेकूण पण कस्सा पाहिजे हे तर तो ढेकूण हाय का डुक्कर हाय कळलं नाय पाहीजे. खोली सजवायचा पहिला नियम. त्यानंतर गादी. गादी कुठली तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर असती ती. चुकून बॉक्स गादीची स्वप्न बघशील भावा. तस आयुष्यात मिळावं म्हणून सध्या ४०० रुपयच्या गादीवरच झोप. राहता राहिला घर दोघांचे. दहा बारा हजार दोघात देणारायस का ? फि कोण भरणार क्लासची ?  किमान सहा जण पाहीजेत खोलीत त्याशिवाय फिल येत नाही. आणि हो डब्बा आलाच तर त्यासाठी लोकसत्ताचा अग्रलेख घ्यायचा नाही. पुरवणी टाकूनच डब्बा खायचा. तैमुरच्या डोक्यावर डब्बा ठेवून कित्ती जण IAS झाल्यात तुम्हाला माहित नाही. 

बाकी टोपी, टॉवेल, आईबाबा साईबाबाचा फोटो गरजेनुसार वापरायचा. फिल करायला बर असतय. एवढ सगळ केलं की तुम्ही MPSC पास !!! 

आगआयआय सीएम सारखं ७० हजारचं विनाअनुदानित स्वप्न दाखवाय लागलाय की, तर एवढ्याव पास होत नसतय. पास व्हायला लागतं जिद्द, चिकाटी, अमुक तमुक ! आणि हे जिद्द चिकाटी टिकवून ठेवत असतात त्या कविता. शेर, शायरी, उर्दू गझल !!! 

आजचा विषय ह्योच, खोलीत कोणती वाक्ये असल्यावर पास व्हायचे चान्सेस वाढतात ? 

क्रमांक १) 

कबुतरा गरूडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

व.पु. काळे

Screen Shot 2018 08 06 at 1.46.32 PM 

मुळात वजन, उंचीचा रेशो काढला तर पंख ट्रान्सफर केले तर गरूडाला कबूतराचं पंख लावलं तरी उडता यायचं नाही असा सगळा विषय. तरी देखील मोटिवेशनल लाईन म्हणून हि लाईन क्रमांक एक ची गणली जाते. ज्याकडे हि लाईन नव्हती तो पास होवून सुद्धा निराश असणार हे फिक्स. थोडक्यात लवकरात लवकर तुमच्या कबुतरांना गरुडाचे पंख लावा. तुमच्या एकनाथ तात्याच्या ठोकल्याला लक्ष्मीकांतच कव्हर लावा आणि घ्या भरारी सदाशिव पेठेच्या प्रांगणात. 

क्रमांक २. 

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहायचाय, ज्या शत्रूचा कुणी पराभव कुणी करु शकत नाही अशा शत्रूला मला हरवायचाय.

IPS विश्वास नांगरे पाटील. 

क्रमांक दोनच्या स्थानी असणारी हि शायरी. ज्यांना खाकी चढवायची आहे त्यांच्या खोलीत हि पहिल्या क्रमांकावर असते. अशक्य वाटणार स्वप्न. मन मैं हैं विश्वास पेरणारी हि ओळ म्हणजे MPSC, UPSC च बाळकडूच. आपण रोज घोटघोटभर हे बाळकडू सेवन करावं. शंभर टक्के रिझल्ट. नाही झाला तरी मनातून अधिकारी झाल्याचा फिल आयुष्यभर उतरणार नाही हे फिक्स. 

क्रमांक ३ . 

शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. 

स्व. बाबा आमटे. 

प्री नापास झाल्यानंतर, मेन्स नापास झाल्यानंतर इव्हन मुलाखतीतून एका मार्कात नापास झाल्यानंतर समोरच्या पोराच्या तोंडावर फेकून मारण्यासाठी सर्वात्तोत्तम लाईन. एका लाईनीचा कोट असल्याने नोट्सच्या अध्येमध्ये देखील हा सहजरित्या बसतो. शिवाय स्वत: बाबा आमटेनीं देलेले वचन आहे त्यामुळे आपोआप वजनप्राप्त होतं. तुम्ही चुलत्याच्या पोरांच्या, इंजनिरिंगच्या डिप्रेशनच्या किंवा BCA, BBA लयच लय भावनेच्या भरात सायन्स वरुन आर्ट करुन आला असाल तर हि लाईन फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे एवढं लक्षात ठेवा. तुमची पोस्ट एका मार्कात गेली याहून शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही सांगण बर पडत असतं. 

क्रमांक ४.  

स्वप्न ते नव्हे जे तुम्हाला झोपल्यानंतर पडतात, खरे स्वप्न ते असतात जे तुम्हाला पुर्ण केल्याशिवाय झोप लागू शकत नाही. 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम. 

Screen Shot 2018 08 06 at 1.03.34 PM

कलाम साहेबांना आपण ओळखतोच मुळात ते भारी भारी वाक्यांसाठी. त्यांच्या व्हिजन २०-२० पुस्तकातून निघालेलं हे वाक्य आहे अस समजून जा. हि ओळ तुमच्या खोलीत पाहीजे म्हणजे पाहीजेच. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पुण्यात ऐवून तुम्हाला वामकुक्षीची वाईट सवय लागू शकते. म्हणून सदरहू आपण कोणत्याही प्रकारे दुपारी एकदा या ओळीकडे तिरपा कटाक्ष टाकणे गरजेचं आहे. 

क्रमांक ५. 

आणि आत्ता शेवट. पुन्हा एकदा नांगरे पाटील सर !!! पुन्हा एकदा जबरदस्त वाक्य !!! 

शांततेच्या काळात जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. 

विश्वास नांगरे पाटील. 

हांग आश्शी. सारे मिळून घाम काढू.. हे वाक्य म्हणजे अधिकारी होण्याची गुरूकिल्ली. कालच तर प्री झाल्या म्हणून रुमवरच बसण्यापासून रोखणार दर्दी वाक्य. प्रत्येकानं शाततेच्या काळात या वाक्याचा दिवसातून अकरा वेळा उच्चार करावा. खरच सांगतो १४ तास, १५ तास, १६ तास… नुसते तासावर तास वाढत जातील. मग तिकडे जागा निघोत अथवा न निघोत पण आपलं फिक्स. शांततेचा काळ आणि घाम. सरकार काही युद्धाला बोलवत नाही तरीपण अभ्यास केलाच पाहीजे.

तर अशा वाक्यांनी आपल्या खोल्या सजल्या पाहीजेत. चांगला खुराक मिळाला आहे. यंदा अॅड आलीच तर पोस्ट नक्कीच. लवकर लिहून काढा.  

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.