लग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या.
लग्न कशी मोडतात.कशीपण त्यात काय. पाहूण्यांचा अचानक फोन येतोय जमत नाही म्हणून आणि झालं मोडलं लग्न. त्यात काय एवढं. आपण बसतोय विचार करत. कशामुळे मोडलं ? काय झालं ? पण उत्तर मिळत नाही. नेमका नकार का आल्ता ते पण कधीच समजत नाही.
सगळ्या जगाला टेन्शन आहे. सोयरिक कशी टिकवायची ते. त्याच काळजीपोटी घेवून आलोय लग्न कशामुळ मोडतात त्याची कारणं. काय करा हे वाचा. जमलं तर प्रिन्ट आउट काढा. आम्ही सिंगल लोकांवर केलंल हे उपकार आहे समजा. धन्यवाद म्हणू नका !!!
भिडू लोकांच जुळणं हे आम्ही आमचं प्रथम कर्तव्य समजतोय. तर हा करा वाचायला सुरवात.
१) डेटा लिक प्रकरण.
डेटा लिक हे लग्न मोडण्याचं सगळ्यात मोठ्ठ कारण असत. गावातली एक जमातच या कामात सक्रिय असते. रिक्षा, टॉवर अशा नावांशी या लोकांना पंचक्रोशीत मान दिला जातो. हि लोकं काय करतात तर जरा कुठ कुणाच जुळत आलय हे त्यांच्या लक्षात आलं की आपली दहा बारा वर्षापुर्वीची नोंदवही काढतात. या नोंदवहीत पोरगं किंवा पोरगी याची दूसरी कुंडलीच लिहून ठेवलेली असती. दहा वर्षापुर्वी ही पोरगी मारुतीच्या मागच्या झाडाखाली दिसायची वगैरे छाप गोष्टी यात अचूक हेरलेल्या असतात.
कांद्या पोह्याच्या कार्यक्रमात पहिली दोन तीन वाक्य एकदम मोठ्यानं आणि तिसरं वाक्य हळूच कानात सांगणारी व्यक्ती या जमातीची असते हे ओळखून योग्य वेळीच अशा लोकांना नारळ द्यावा. नाहीतर तुमचा जुना डेटा लिक होवून हात चोळत बसायची वेळ तुमच्याव येवू शकते.
या लोकांची काही घोषवाक्य –
ते वे… आग आय आय गंडला तुम्ही गंडला सपशेल गंडला करत…
अहो एक वेळ पुरगी आडात ढकला… पण तो नको…
ते नव्हं पण मला न विचारतां हा शहाणपणा तुम्हाला कुणी कराय सांगितलेलाय…
२) परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान, अनुशासन.
लग्न मोडण्यात या गोष्टींचा वाटा ८० टक्यांहून अधिक असल्याचं जागतिक बॅंकेने डिक्लेर केलय. आमच्यात हे अस चालतच नाही म्हणून वांग्याच्या भाजीत तेल जास्त होतं सांगत लग्न मोडणारी जमात महाराष्ट्रात राहते हे आपणाला विसरून चालणार नाही. अशा वेळी वधू पक्ष आणि वर पक्ष अशा दोन्हीकडच्या लोकांनी आपल्या नेमक्या प्रथा, परंपरा, अनुशासन काय आहेत हे आपल्या घरातील बच्चन कडून समजून घ्यावे लागते.
दरवेळी घरातील हा बच्चन पुरूष व्यक्तीच असेल असं नाही. लांबची आत्त्या, काकू, मावशी देखील बच्चनची ही भूमिका अचूक पार पाडत असतात. या लोकांना अक्षताला असणाऱ्या तांदळाचा कलर देखील तोंडपाठ असतो हे विशेष. घरात असणाऱ्या कप आणि बश्या देखील एकाच सेटच्या असाव्यात हितपासून ते पोरगी घालवताना पाठ राखणी कोण कशी असावी हितपर्यन्त या व्यक्तींचा मुख्य सल्ला मान्य करावा लागतो. विशेष म्हणजे ही लोकं तज्ञ म्हणूनच उल्लेखली जातात. आपआपल्या बाजूचा व्यक्तीचा योग्य सल्ला घेणं आणि समोरच्या व्यक्तीचा पास चुकवणं हे शेवटच्या दिवसांपर्यन्त रेटण्याच स्किल असावं लागतं.
३) आहेर, रुखवत, साड्या.
गावभर चर्चा होणारा सर्वात जलद प्रकार म्हणून आहेर, रुखवत व साड्यांचा उल्लेख करण्यात येतो. लग्नात येणाऱ्या एकूण स्रीया. त्यामध्ये कोणाला साड्या द्याव्यात त्या स्री या. एका साडीची किंमत गुणूले अचूक साड्या देण्याची किंमत व या सर्वाचा लग्नाच्या एकूण खर्चावर होणारा परिणाम याचा ताळमेळ घालत योग्य सन्मान करण्याचं स्किल काही विशिष्ट महिलांकडे असलेलं दिसून येतं. या महिलांना समोर करुन आपलं ध्येय साध्य करण्याचं कोकिळेसारखं स्किल देखील काही महिलांकडे असलेलं दिसून येतं. वरकरणी सोप्पा वाटणारा हा प्रकार काश्मिर प्रकरणाहून गंभीर असल्याचं मत अनेक अभ्यासकांनी दिलं आहे.
४) लुझ कंट्रोल.
पायावर दगड मारुन घेण्याचा हा प्रकार सर्रास चि व चि. सौ. का. यांच्याकडून केला जातो. भावना आवराव्यात, थोडा कंट्रोल करावा, इतक्यात तासन तास फोनवर बोलण्याची गरज नाही अशा साध्या वाटणाऱ्या गोष्टी वयात आलेल्या वधू व वराकडून पाळल्या जात नाहीत. परिमाणी अचानक पणे हे काही रुचल नाही.. लग्न ठरलं आहे म्हणून इतकी सलगी करणं योग्य वाटतं का अशा प्रकारचे टोमणे खावे लागतात. पण हे प्रकरण टोमण्यांपुरतच मर्यादित राहिलं तर ठिक असतं कधी कधी बच्चन कॅटेगरीतल्या लोकांना या गोष्टींचा राग आला तर ठरलेलं मोडायला वेळ लागत नाही. म्हणूनच थोडासा कंट्रोल ठेवण्याचा सल्ला बोलभिडू कडून आपुलकिनं देण्यात येतोय.
५) राडा करणारी पोरं.
महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकिय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात वर्चस्व गाजवणारा युवावर्ग आज राडा करणारी पोरं या नावाने ओळखला जातोय. नवऱ्याला घोड्यावर बसवून तासभर नाचवणे, वर पक्षाच्या खोलीच दार बंद वरास अपमानित करत बसणे, मित्राच्या लग्नात सोयरिक जोडण्याचा आतोनात प्रयत्न करणे, फोमचा स्प्रे आणून नवरा नवरीला काश्मिरचा फिल करुन देणे, लग्नाच्या वरातीत नागिण डांन्स करणे, तीस चाळीस व्यक्तींचे गुलाबजाम व श्रीखंडे एकट्याने खाणे अशी प्रमुख काम ही राडा करणारी मुलं करतात.
हे सर्व एका टप्यापर्यन्त सहन करण्याचं काम अनेक मान्यवर करत असतात मात्र अचानक एखाद्या बच्चन कॅटेगरीतल्या व्यक्तीचा पारा चढला तर भर मांडवातून वरात पुन्हा मागं फिरण्याची शक्यता असते. या गोष्टी हाताळण्यासाठी पुर्वाश्रमीचा राडा करणारा व्यक्ती आपणाला अचूक गर्दीतून हेरावा लागतो. समजणाऱ्या भाषेत समजावणं हे अवघड स्कील असून आत्ता संसारास लागलेल्या व पुर्वाश्रमीचा राडा करणारा व्यक्ती असणाऱ्यास ते अचूक जमतं. हा डाव तुम्हाला साधता आलां तर तुम्हास लग्न मोडणं टाळता येवू शकतं.