गेम ऑफ थ्रोन्सच्या जगात राडा करणाऱ्या पाचजणी.

गेम ऑफ थ्रोन्सचा हिवाळा अगदी दारावर येऊन ठेपलाय.  लई वर्ष आपण ज्याची वाट बघत होतो त्या सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार याचा निकाल या एप्रिल २०१९ च्या सिझनमध्ये लागणार हे खरं ! 

स्टार्क पक्ष विरुद्ध लॅनीस्टर पार्टीचे कार्यकर्ते गावोगावच्या चावडीवर भांडाभांडी करत आहेत.  GOT ची गोष्ट लिहिणारा जॉर्ज आरआर मार्टिन आबा लई खज्जाळीचाय. आता जसा जसा शेवट जवळ आलाय तसा दर एपिसोडला चारपाच दावेदार तरी तो उडवेल याची खात्री आहे.

पण लासलगाव ते लॉस एंजिलीसमधल्या सगळ्या GOT बघणाऱ्या अभ्यासू भिडूंच एका गोष्टीवर एकमत हाय ते म्हणजे यंदा वेस्टरॉस देशाच्या आयर्न थ्रोन वर एखादी बाईचं बसणार !

आजकालच्या बाप्यांच्या जमान्यात बाया फक्त शोभेच्या वस्तू झाल्यात. पण गेम ऑफ थ्रोन्सचं तस नाही. इथ सगळ्यांना इक्वल स्थान दिलय जॉर्ज आज्जानी. तर बघू कोण कोण महिला आहेत ज्या या आयर्न थ्रोनची गादी चालवण्याची क्षमता राखून हायत.(अगोदरचं सांगतो आम्ही म्हणत नाही की याचं पाचजणी थ्रोनवर बसतील, पण आमच्या मते त्यांच्यात क्षमता आहे.)

१. सर्सी लॅनिस्टर.

सुरवात हिच्यापासुनच केली पाहिजे कारण आपण चर्चा करालोय थ्रोनवर कोण बसणार पण ही बया ऑलरेडी थ्रोनची मालकीण आहे. गेली अनेक वर्ष किंग्ज लॅडींग्ज नावाच्या राजधानीत चालणाऱ्या सगळ्या पोलिटिक्स, डावप्रतिडाव याला ही पुरून उरल्या.

लॅनीस्टर खानदानचा कर्तापुरुष टायविनच्या तीन मुलांपैकी ही एकुलती एक मुलगी. त्याला स्वतःला पण माहित होत की आपल्या दोन्ही मुलांपेक्षा ही जास्त कर्तुत्वान आहे. पण आहे तर शेवटी मुलगी म्हणून त्याने तिचं साती किंग्डमचा किंग रॉबर्ट बॅराथीयनबरोबर लग्न लावून दिलं. बापाने सर्सी वर अन्याय केला. नवरा दारुडा आणि बाहेरखयाली निघाला.

सर्सीच्या नसानसात कटुता भरली आहे. तीच खर प्रेम फक्त आपल्या तीन मुलांवर होत आणि त्यातल्या त्यात आपल्या जुळ्या भावावर म्हणजे जेमीवर. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की जेमीवरच तीच प्रेम बंधू प्रेमापेक्षा जास्तचं होत आणि तिची तिन्ही मूल जेमीपासून झालेली.

सर्सी जर मनात आणली असती तर राजाची राणी बनून आहे ते ऐश्वर्य उपभोगत निवांत राहिली असती. पण वो तो होणेवाला नही था. आपल्या पोरांना थ्रोन्वर बसवने आणि सगळा कारभार आपल्या हातात घेणे या एकमेव ध्येयाने तिला पछाडले. थोरला लेक जॉफ्री तिच्या लाडाने बिघडला. त्याच्या मूर्खपणामुळे साती राज्यामधले महायुद्धाला तोंड फुटले. सर्सीला आपल्या पोरावर कंट्रोल ठेवता आला नाही. पुढे सगळ्या राजकारणामध्ये तिची तिन्ही मूल एका पाठोपाठ मेली. अख्ख्या राजधानीसमोर सर्सीची नागडी धिंड काढली गेली.

दुसरी एखादी असती तर मोडून पडली असती. पण किती जरी झालं तर एक गोष्ट मानली पाहिजे सर्सी आहे मोठी जिद्दी. युरॉन ग्रेजॉय या तिच्यापेक्षा जास्त क्रूर माणसाबरोबर तिने संगनमत केलय आणि सध्ध्या तरी सिंहासनावर आपला हक्क प्रस्थापित केलाय. 

आता अंतिम युद्ध तोंडाशी आलंय. जेमीसुद्धा तिला सोडून गेलाय. डेनेरीसच्या ड्रॅगनचं आणि व्हाईट वॉकरचं डेमोस्ट्रेशन तिच्या समोर झालंय. पण अजूनही बया हार मानायला तयार नाही. माउंटन नावाचा राक्षस, युरोन घेऊन येत असलेल सेलस्वोर्डचं सैन्य याच्या जोरावर ती अजूनही युद्ध जिंकू शकते याचा तिला स्वतःला विश्वास आहे.

२.सान्सा स्टार्क.

एक सिझन अगोदर जर कोण म्हणालं असत की सान्सा स्टार्क थ्रोनवर बसू शकत्या. तर तुम्ही म्हटला असता बोल भिडूला याड लागलंय. अहो सगळ्यात जास्त बिचारी, मूर्ख, आणि काय काय विशेषण असतील ते या पोरीला लागत होते. पहिल्या सिझन पासून ते शेवटच्या सिझन पर्यंत ती आरआर मार्टिनच्या तडाख्यात जगली हीच कौतुकास्पद कामगिरी समजली गेली होती. पण आता वेस्टरॉस मधल्या सगळ्यात स्ट्रॉंग व्यक्तींपैकी ती एक आहे.

सान्सा म्हणजे लॉर्ड नेड स्टार्कच्या अनेक मुलांपैकी एक मुलगी. हीच लग्न युवराज जॉफ्रीबरोबर होणार याची चर्चा होती. तिलापण आपण लग्न करून राजाची राणी झालोय अशी गोड स्वप्न पडायची. आपल्या घरचे मूर्ख लोक विशेषतः आपली छोटी बहीण येड्यासारखे वागून आपला हा चान्स घालवत आहेत असं तिला वाटायचं. 

पण किंग्ज लॅडीग या मायानगरीत आल्यावर तिला खऱ्या जगाची ओळख झाली. तिच्या डोळ्यासमोर तिच्या बापाचं मुंडक उडवण्यात आलं. जॉफ्री आणि सर्सीच्या तडाख्यातून कशीबशी तिची सुटका झाली .तरीसुद्धा वेळोवेळी लोकांवर विश्वास ठेवून गंडायची तिची सवय जात नव्हती. लबाड लांडगा पीटरबेलीशवर विश्वास ठेवून किंग्ज लँडीगमधून सुटली आणि अॅरीमार्गे परत विंटरफेल ला पोहचली.

पीटर बेलीशने तिचा सौदा रॅम्से बोल्टन नावाच्या माणसाशी केला. तीच त्याच्याबरोबर लग्न झालं पण पहिल्याच रात्री तिच्या लक्षात येते आपण आगीतून फुफाट्यात पडलोय. जगातले असतील नसतील ते अत्याचार तिच्यावर होतात. तिथून पण दैवयोगाने तिची सुटका होते. 

पण तिथून सान्सां बदलते. तिला सावत्र भाऊ जॉन भेटतो. तिच्याच डोकेबाजीमुळे जॉन रॅम्सेला युद्धात हरवतो.  रॅम्सेचा , पीटर बेलीशचा शेवट ती ज्या पद्धतीने केलीय ते बघून मान्य करावं लागत की “भिडू सान्सा मै दम है.”

ती सध्या विंटरफेलची मालकीण आहे. स्टार्क भावंडाच रियुनियन देखील झालंय. सध्यातरी सगळ्यात शहाणी सान्सांचं दिसत आहे. महायुद्ध विंटरफेलच्या दारात आलाय. ड्रॅगन डेड आर्मी सगळा गोंधळ तिच्या अंगणात होणार आहे. बघू आता काय होत ते.

३. ब्रियान ऑफ टार्थ.

लेडी ब्रियान ला लेडी म्हटलेलं आवडत नाही. ती स्वतःला नाईट म्हणजेच एक योद्धा समजते. तिला पाहिलं तरी कळत, ब्रियान उंच धिप्पाड ताकदवान योद्धा आहे. तिची सिरीयल मधली एंट्रीचं लॉरेस टायरेलला एका टूर्णी मध्ये हरवून होते. ब्रियानचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती टोकाची प्रामाणिक आहे. एकदा तिने एखाद्याला आपला बॉस मानलं तर ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते.

सुरवातीच्या सिझन मध्ये रेन्ली बॅराथियन ला आपला राजा मानून ती आपली सेवा त्याच्या चरणी वाहते. तो सुद्धा तिला आपली किंग्जगार्ड बनवून जुनी वहिवाट मोडून टाकतो. पण दुर्दैवाने भावाने केलेल्या काळ्या जादूमुळे रेन्ली मरतो. त्याचा आळ ब्रियानवर येतो. ब्रियानला पळून जायला आर्या सान्साची आई कॅटलीन मदत करते. या मदतीच्या बदल्यात तिच्या दोन्ही मुलींचं रक्षण करेन अशी प्रतिज्ञा ब्रियान घेते.

लेडी कॅट्लिंन आपल्या मुलाच्या तावडीत सापडलेल्या जेमीला सर्सीला परत देऊन सान्सां, आर्याला परत आणण्याची जबाबदारी ब्रियानवर येते. याकाळात तीच जेमीवर प्रेम बसत. जेमीला सुद्धा ब्रियान बद्दल आपुलकी वाटते. याच आपुलकीचा परिणाम ब्रियानला तो आपली वलेरियन स्टीलवाली तलवार देतो.

ब्रियान आणि तिचा स्क्वायर पॉड्रिक सान्सां आणि आर्याच्या शोधात निघतात. या त्यांच्या प्रवासात तिला डेंजर क्लिगेन भावंडापैकी हाउंड भेटतो. आर्या त्याच्या ताब्यात असते. दोघांचे तुंबळ युद्ध होते. या युद्धात वेस्टरॉसच्या सर्वोत्तम योद्धा असणाऱ्या डोंगरा एवढ्या हाउंडला ती हरवते. त्याला अर्धमेला करते. पण तिथून पळालेल्या आर्याला शोधायला निघून जाते.

आता आठव्या सिझन पर्यंत ब्रियान एक दमदार पात्र बनले आहे. ती सान्सा स्टार्कसोबत विंटरफेल मध्ये आहे. सान्सांच्या महत्वाच्या आणि विश्वासू सरदारांमध्ये ती एक आहे. आर्या सोडली तर बाकीच्या स्त्रीपात्रांप्रमाणे ती फक्त दरबारी राजकारण करत नाही तर ती युद्धभूमीतही पराक्रमी आहे. तिला बघूनच भल्या भल्यांची फाटते.

ती राजघराण्यातली नाही हाच तिच्या विरुद्ध बाजूने जाणारा मुद्दा. नाही तर ब्रियान जर थ्रोनवर बसली तर वेस्टरोसच्या नागरिकांकडे कोणाला डोळे वटारून पाहण्याची हिंमत होणार नाही यात शंका नाही.

४.आर्या स्टार्क.

सान्सां धाकटी बहीण, लॉर्ड एडाड स्टार्कची सगळ्यात लाडकी लेक. सर्सी जिला बघितल्यावर जंगली म्हणते अशी ही आर्या हे आपल्या सगळ्यांच पहिल्या एपिसोडपासूनचं लाडकं कॅरेक्टर. तिला सोकॉल्ड पोरींनी करायच्या स्वंयपाक , शिवणकाम या कामात काडीचा ही इन्टरेस्ट नाही. ती स्पष्टवक्ती आहे. धनुष्यबाण, तलवार हीच तिची लहानपणापासूनची खेळणी आहेत. सावत्र भाऊ असूनही जॉनचं तिच्यावर विशेष प्रेम आहे. त्यान तिला तलवार गिफ्ट दिली होती. वडील हँड ऑफ किंग (थोडक्यात पंतप्रधान) झाल्यावर तिला सिरिओ फरेल कडे तलवारबाजीची शिकवणी लावतात.

पण दुदैव, तिथून सगळ्या स्टार्क कुटुंबाच्या मागे दुष्टचक्र सुरु होते.

नेडस्टार्कचं मुंडक उडवण्यात येत तेव्हा आर्या तिथेच असते. जाता जाता नेड तिच्या रक्षणाची सोय करून जातो. वडिलांच्या दोस्ताच्या मदतीने एका मुलाच्या वेशात ती अंडर ग्राउंड होते. त्या दिवसापासून तिचा प्रवास एकटीच सुरु होतो. रोज रात्री झोपताना आपल्याला कोणाकोणाला मारायचं आहे त्या यादीची उजळणी करत असते. वाटेत ती काही जणांनाच प्राण वाचवते. तिने प्राण वाचवलेला माणूस जॅकेन हेगार म्हणजे मेनी फेस गॉड असतो. म्हणजेच चेहरा बदलून समोरच्याचा खून करण्याची क्षमता असलेला माणूस.

अनेकदा घरी पोहचता पोहचता ती चुकते.  पण शेवटी जॅकेन हेगारनं दिलेलं कॉईन घेऊन ती ब्रावोसला जाते. तिथ जॅकेन हेगार तिला मेनी फेस गॉड बनवण्यासाठी प्रशिक्षण सुरु करतो. त्याचं म्हणन असतं की तुम्ही तुमच्या नावापासून तुमचा सगळा भूतकाळ विसरला पाहिजे. आर्या त्यासाठी तयार होते. या अघोरी प्रशिक्षणा पायी एकदा आपली दृष्टी गमावते. जॅकेन हेगारच्या सांगण्यावरून तिच्या जीवावर उठलेल्या वैफ ला मारते. त्यादिवशी जॅकेन हेगार तिला म्हणतो की तू नो नेम गॉड झाली आहेस . पण आर्या त्याला तोंडावर सांगते.

” A girl is Arya Stark of Winterfell, and I am going home. “

त्या सिझनचा तो सगळ्यात हाय पॉईंट होता. आता आर्या जॅकेन हेगार प्रमाणे खरोखरची स्किल्ड मारेकरी बनली आहे. आपल्या लिस्टमधल्या एकेकाला संपवण तिने सुरु केलय. वाल्टर फ्रेला ज्या पद्धतीने मारून तिने बदला घेतला ,यामुळे तिच्या थंडपणे मारण्याचं कौतुक संपून आता तिची भीती वाटायला सुरवात झाली आहे. गेली सात सिझन ताणलेलं तीच घरी परतण आता आणखी काय काय घडवणार याची उत्सुकता आहे. पण आज आपल्याला जर कोण म्हणालं की थ्रोनची मालकीण म्हणून कोणाला बघायला आवडेल तर आपण आर्याचं नाव सांगणार.

५.डेनेरिस टारगेरियन.

युगानुयुगे वेस्टरॉस वर राज्य करणाऱ्या टारगेरियन घराण्याची उरलेली एकुलती एक वंशज. ही सुद्धा सुरवातीला एकदम हतबल वाटायची. तिचा सख्खा भाऊ तिला जनावरांप्रमाणे राहणाऱ्या खाल ड्रोगोला विकतो. खाल बरोबर लग्न होऊन ती खलीसी होते.

चंदेरी केसाची नाजूक डेनि उन्हातान्हात ओसाड परदेशात राहू खालच्या डोथ्राकी जमातीबरोबर फिरू लागते. त्यांचा जंगली व्यवहार पाहते. पण हळूहळू खालला माणसात आणायचा प्रयत्न सुरु करते. तिचा खून करण्याचे अनेक प्रयत्न होतात पण खालीसी जगते. अगदी खाल ड्रोगो सुद्धा मरतो. पण त्याच्याबरोबर सती गेलेली डेनि जगते. डेनि त्या आगीतून बाहेर येते ते आपल्या मुलांना घेऊन. साधी सुधी नाहीत तर ड्रॅगन पिल्ले.

आता ती जुनी निरागस हतबल डेनि उरत नाही. ती तीन ड्रॅगनची आई आहे. ती खालीसी आहे. तिच्या जवळ डोथ्राकीचं सैन्य आहे. त्यांच्या जीवावर ती एसोस देशातली एक एक शहर जिंकत निघते ती फक्त जिंकत नाही आहे तर तिथल्या गुलामांची सुटका देखील करते. कधीही न ऐकलेलं अनुभवलेलं स्वातंत्र्य ती त्या गावातल्या गोरगरीब जनतेला मिळवून देते. ते सुद्धा डेनिला आपली आई मानतात.

तिथे तिच्यासाठी आपल प्राणसुद्धा पणाला लावू शकणारे सेलस्वोर्ड मिळल्यामुळे तिची ताकद डबल होते. वेस्टरॉस मध्ये देशद्रोही म्हणून गणले गेलेले शहाणे व हुशार टीरियन लॅनिस्टर आणि लॉर्ड वरिस तिला येऊन मिळतात. या सगळ्यामुळे मिळालेल्या आत्मविश्वासामुळे ती आपल्या घरी परतायचा आणि आपली हक्काची गादी मिळवायचा निर्णय घेते.

पण तिला वाटलेले तेव्हढे वेस्टरॉसचे साती किंग्डम जिंकणे सोपे नाही. इथे तिला आपल्या जनतेचा विश्वास परत मिळवायचा असतो. शिवाय त्यातच उत्तरेचा जॉन स्नो तिला व्हाईट वॉकरचा डोक्यावर असलेला खतरा सांगतो. मिनटाइम ती फ्र्सट्रेट होऊन आपल्या विरोधी लोकांना ड्रॅगनला ड्रकारीस असा आदेश देऊन जाळायला सुरवात करते. जॉनमध्ये मात्र तिला आपला मित्र सखा वगैरे वगैरे दिसू लागतो. त्याला वाचवण्याच्या पायी ती आपला एक ड्रॅगन सुद्धा व्हाईटवॉकरला गमावून बसते पण या दरम्यान दोघांच प्रेम जडत.

तर आत्ताची कंडिशन अशी की डेनि सगळ्यात ताकदवान आहे. शेवट गोड करायचा झाला तर ती आपल्या ड्रॅगनच्या जोरावर डेड आर्मीला हरवून सर्सीच्या सेनेला हरवून थ्रोनवर निवांत बसू शकते. शिवाय तिच्यासोबत जॉन स्नो , टीरियन लॅनिस्टर असे सेनापती आणि हुशार पंतप्रधानची जोडगोळी आहे. ती प्रजेमध्ये लाडकी आहे आणि तस बघायला गेल तर वंशपरंपरेनुसार तिचाच गादीवर अधिकारही आहे. तिच्यात कधी तर येणारा विक्षिप्तपणा सोडला तर कोणता दुर्गुणही नाही. अनेकांचं मत आहे की डेनि आयर्न थ्रोनच्या गादीवर बसणार.

पण खऱ्या फॅनला माहित आहे की जॉर्ज आरआर मार्टिन आजोबा एवढ्या सहजासहजी आपल्याला हवा तो रिझल्ट देतील असं वाटत नाही.

तर या आहेत थ्रोन्सच्या प्रबळ महिला दावेदार.

या सोडून लेडी ओलेना, कॅटलीन स्टार्क, मार्जरी टायरेल अशा भारी बायका होत्या ज्या थ्रोनवर बसल्या असत्या तर कोणाला वाईट वाटल नसत पण आरआर मार्टिन आबाच्या आशीर्वादाने त्या आता जिवंत नाहीत. याशिवाय लेडी लायाना मोरमोंट नावाची एक गोड दहा बारा वर्षाची छोकरी आहे. जीचा शहाणपणा आणि रुबाब भलभल्या कडे नाही. ती एका प्रसंगात रॅमसी बोल्टनकडे एकदा रागाने कटाक्ष टाकते.  या एका सीन साठी तिला असे दहा थ्रोन कुर्बान करावेत असे कोणाला वाटले तर चुकीचं म्हणणार नाही.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.