मुस्लीम संताने दाढीत लपवून आणलेल्या चार बियांमुळे देशात फिल्टर कॉफी आली..
आपल्या देशात भारत विरुद्ध पाकिस्तान सारखी अजून एक टफ फाइट असते ती म्हणजे चहा विरुद्ध कॉफी. चहा प्रेमी आणि कॉफी प्रेमी यांच्यात बरेचदा चहा श्रेष्ठ की कॉफी या मुद्यावरून जुंपलेली असते.
पण चहा प्रेमी सुद्धा एका गोष्टीवर थोडं नमतं घ्यायला तयार होतात, ती गोष्ट म्हणजे ‘फिल्टर कापी’ भारतभर पसरलेली ही साऊथची फिल्टर कापी साऊथच्या सुपरस्टार्स एवढीच फेमस असते, आणि बरेचदा चहा प्रेमींची सुद्धा फिल्टर कॉफी प्यायला ना नसते हे ही खरय..
पण ही फिल्टर कापी भारतात आणि स्पेशीयली दक्षिण भारतात कुठून आली आणि इतकी फेमस कशी झाली हे जाणून घेऊया.
एक उभ्या आणि एक आडव्या स्टेनलेस स्टिलच्या सोनेरी रंगाच्या भांड्यात फिल्टर कापी दिली जाते…. या कॉफीचं सतराव्या शतकात, कर्नाटकात पहिल्यांदा उत्पादन झालं आणि ही कॉफी भारतात पहिल्यांदा आणली ती मुस्लिम संत बाबा बुदान यांनी.
बाबा बुदान हे चिकमंगळूरचे होते. त्यांनी बेकायदेशीरपणे हजहून येताना तिथून कॉफीच्या सात बिया आणल्या. त्यावेळी अरेबियन देशांमधून कॉफीच्या बिया इतर कुठल्याही देशात नेणं म्हणजे स्मगलिंग मानलं जायचं, कारण तिकडच्या लोकल ट्रेडर्सना कॉफीच्या उत्पादनावरचं आपलं वर्चस्व कमी होऊ द्यायचं नव्हतं.
असं म्हणतात की त्यावेळी बाबा बुदान यांनी आपल्या दाढीमध्ये कॉफीच्या बिया लपवून त्या भारतात आणल्या आणि चिकमंगळूरमध्ये त्या बियांची लागवड केली….
आणि म्हणूनच चिकमंगळूरला पुढे ‘लँड ऑफ कॉफी’ असं संबोधलंही जाऊ लागलं.
नंतरच्या काळात म्हणजे पुढच्या शंभर एक वर्षातच इथल्या कॉफीचं उत्पादन वाढत गेलं, चिकमंगळूरच्या चंद्रागिरी भागात पहिल्यांदा कॉफीची लागवड करण्यात आली होती पण ती त्या भागापुरतीच मर्यादित राहिली होती. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या दरम्यान कॉफीच्या विक्रीबाबत विचार करण्यात आला आणि मग ही कॉफी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळ नाडू आणि केरळ अशा दक्षिण भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली.
जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांची नजर या कॉफीवर आणि कॉफीच्या उत्पादनावर पडली आणि त्यांनी ती जगभर एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला…. शिवाय देशभरात सुद्धा कॉफी लोकप्रिय होतच होती… ब्रिटिशांनी कर्नाटकाटल्या कूर्गच्या परिसरात आणि केरळातल्या Wayanad मध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं आणि ते वाढवत नेलं…
एकोणिसाव्या शतकात दक्षिण भारतातल्या नागरिकांनी कॉफीत दूध घालायला सुरवात केली…
आधी ही कॉफी लोकं कोरी पित असतं पण नंतर कॉफीच्या चवीत बदल करण्यासाठी आणि कॉफीला अधिक गोड बनवण्यासाठी त्यात मध आणि गूळ घालण्याची पद्धत सुरू झाली.
बघता बघता हीच कॉफी लोकांच्या रोजच्या सवयीची झाली. एव्हाना दक्षिण भारतात तर लोकांना कॉफी प्यायची सवय लागलीच होती पण उत्तर भारतात मात्र अजून कॉफी प्यायचं प्रमाण तेवढं वाढलं नव्हतं.
पुढे मात्र इंग्रजांच्या या कॉफीला कमर्शिअल बनवण्याच्या उद्देशामुळे विसाव्या शतकापर्यंत अख्ख्या भारतभरात फिल्टर कापी सगळ्यांची आवडती बनत गेली. आता ही फिल्टर कापी साऊथला तर मिळतेच शिवाय देशभरातल्या साऊथच्या प्रत्येक हॉटेलमध्ये सुद्धा हमखास मिळते.
भारतातल्या कुठल्याही ठिकाणी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये तुम्ही गेलात की तिथे तुम्हाला traditional आणि authentic पद्धतीची फिल्टर कॉफी मिळाल्याशिवाय राहत नाही. शिवाय ती ट्रेडिशनल वाटते त्याचं कारण म्हणजे अजूनही ही कॉफी सर्व्ह करण्याची पद्धत बदललेली नाही…
स्टेनलेस स्टीलच्या उभ्या पेल्यात फिल्टर कापी देण्याची प्रथा तेव्हा सुरू झाली होती ती आजही तशीच आहे. या पेल्याच्या खाली सुद्धा स्टेनलेस स्टीलचंच एक आडवं गोलाकार भांडं दिलं जातं म्हणजे पेल्यातून भरून वाहणारी कॉफी जमिनीवर न सांडता त्या खालच्या भांड्यात जमा होते. आपल्या साध्या कपबशीचाच दूसरा एक प्रकार.. उभ्या पेल्याला टंबलर म्हणतात तर खालच्या भांड्याला दावरा असं म्हणतात.
आजच्या काळात फिल्टर कापी म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीचं प्रतीक मानली जाते तसंच देशाच्या आणि जगाच्या विविध भागातले लोकं ही कॉफी आवर्जून पिणं आजही तितकच पसंत करतात..
हे ही वाच भिडू
- पुण्याचा ‘आद्य अमृततुल्य’ चहा फेमस होण्यामागे शम्मी आणि महम्मद रफी कनेक्शन आहे
- कॉफीचे मळे शोधत केरळला जायची गरज नाही. आपल्या विदर्भात आहे खास डेस्टीनेशन!