पुरपरिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थिती काय आहे?
कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राला सध्या तुफान पावसाने झोडपून काढलं आहे. चिपळूणमध्ये अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या भागातील जिल्ह्यांमध्ये सद्यस्थिती काय आहे हे बघणं महत्वाचं ठरत…
१. रत्नागिरी जिल्हा :
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. तर वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत
चिपळूणमधील पूरपरिस्थिती लक्षात घेत एनडीआरएफच्या दोन टीम आधीच त्याठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत. सोबतच आणखी २ टीम मध्यरात्री पर्यंत दाखल होणार आहेत. यातील टीम १ खेड आणि १ चिपळूणमध्ये तैनात करण्यात येणार आहे.
महापुरामुळे कोकण रेल्वेच्या एकूण ९ एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. सकाळपासून या गाड्या स्थानकावरच उभ्या आहेत. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ५ हजार प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संध्याकाळी कोकण रेल्वेकडून या ५ हजार प्रवाशांना अन्नाची पाकीटं वाटण्यात आली आहेत.
२. सिंधुदुर्ग जिल्हा :
तळकोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तुफान पाऊस आहे. पावसामुळे कणकवली वागदे भागात मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी झालं आहे. नदीला पूर आल्यानं मुंबई गोवा महामार्गावर नदीच्या पुराचं पाणी आलं आहे. त्यामुळे मुंबई आणि गोवा या दोन्ही दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर सध्या २ फूट पाणी आहे.
तसेच सिंधुदुर्गात कणकवलीमधल्या नाटळ मल्हारी नदीवरचा पूल कोसळला असून त्यामुळे नरडवे, नाटळ, दिगवळे, दारिसेसह सुमारे १० गावांचा संपर्क तुटला आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या सगळ्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, प्रशासनाला सहकार्य करावं. अधिक माहितीसाठी तसेच मदतीसाठी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केलं आहे.
करुळ आणि भूईबावडा घाट बंद असून सध्या फोंडा आणि आंबोली मार्गे अजून वाहतूक सुरू आहे.
३. रायगड जिल्हा :
रायगड जिल्ह्यात महाड शहराला सध्या पुराचा विळखा पडला आहे. सध्या सावित्री आणि काळ या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. महाडमधील बाजारपेठ, भोईघाट, सुकटगल्ली, दस्तुरीनाका भागात पुराचं अडीच ते तीन फूट पाणी शिरलं आहे.
शहरात तीन ते साडेतीन फुटांवर पाणी गेलं आहे. सोबतच दादली पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळे अनेक गावांचा महाडशी संपर्क तुटलाय. सध्या महाड नगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे.
४. सांगली जिल्हा :
सांगलीच्या चांदोली धरण परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी ८ ते दुपारी ४ या आठ तासात इथं ७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी आज दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून ४ हजार ८८३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस तसेच धरणातील विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सोबतच सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी २८ फूट ३ इंचावर होती. पुलाची धोका पातळी ४५ फुटांवर आहे. तर राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी ३१ फूट ०९ इंच होती. धोका पातळी ५८ इंच आहे. सध्या नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
५. सातारा जिल्हा :
सातारा जिल्ह्यामधील कोयना धरणातून सध्या २१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या धरणाने ७५ टीएमसीची पाणी पातळी ओलांडली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. त्यामुळे उद्या म्हणजे २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कोयना धरणातून १० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.
त्यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोयना नदी काठच्या नागरिकांनी न घाबरता सतर्क रहाण्याचं आवाहन केले आहे. खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
६. कोल्हापूर जिल्हा :
सध्याची अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तर प्रयाग चिखली, आंबेवाडी आणि आरे यासह पुराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गावातील ग्रामस्थांचे शंभर टक्के स्थलांतर करून तात्काळ मदतकार्य सुरू करावे, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
तसेच चंदगड, आजरा, गडहिंग्लज या भागात जाणारे सर्व रस्ते पूरपरिस्थितीमुळे बंद आहेत. त्यामुळं चंदगड, आजरा आणि गडहिंग्लजला जाण्यासाठी पुणे बेंगलोर महामार्गावरून कोगनोळी मार्गे वाहतूक सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिले.
सध्या राजाराम बांधाराची पाणी पातळी ४१ फुटांवर असून धोका ४३ फुटांवर आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.