पाऊस आणि पाणी ओसरतय, पण पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य कसे चालू आहे?

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना मागच्या ४ दिवसांमध्ये तुफान पावसानं झोडपलं आहे. त्यामुळे चिपळूण, महाड, कोल्हापूर, सांगली, कराड अशा भागांमध्ये पूरपरिस्थिती तयार झाली होती. सोबतच दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या होत्या. मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे पुराचं पाणी देखील कमी होऊ लागलं आहे.

सोबतच बचाव आणि मदतकार्य देखील सुरु असून आज त्यात आणखी वेग आला आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर या भागातील मदत कार्याचा घेतलेला आढावा.

मंत्रालय नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार,

सद्यस्थितीत राज्यात NDRF च्या २१ टिम, SDRF च्या ४ टिम, कोस्ट गार्डच्या ३ टिम, नेव्हीच्या ७ टिम आणि लष्करच्या ३ टिम बचाव कार्यासाठी कार्यरत आहेत.

रायगड जिल्हा मदत आढावा

मध्यरात्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तळीये गावाला भेट देऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

सोबतच आज सकाळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी देखील आज घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार,

तळीये गावात आतापर्यंत ३५ जणांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेत ५० जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्तामध्ये ३५ महिला आणि १० मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुले देखील या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत.

सध्या एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखाची तर पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येकी २ लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार जखमीवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. 

तर मंत्रालय नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार,

पोलादपूर तालूक्यात २ ठिकाणी भुस्खलन झाल असून साखर सुतारवाडी इथं ५ जणांचा मृत्यू झाला असून १ नागरिक बेपत्ता आहे. सोबतच १६ नागरीक जखमी झाले आहेत. तर केवणाळे इथं ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ नागरीक जखमी झाले आहेत.

तर रायगड जिल्ह्यातचं अतिवृष्टीमुळे काल महापारेषणच्या कांदळगाव ते महाड दरम्यान २२० के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळले होते. त्यामुळे महाड आणि पोलादपूर हे उपविभाग पूर्णतः अंधारात गेलेत.

यामुळे जवळपास ८० हजार ग्राहकांना आपली पूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली होती. सध्या या अति उच्चदाब टॉवरच्या दुरुस्तीच काम प्रगतीपथावर सुरु असून हे काम पूर्ण होईपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. 

चिपळूण – खेड मदत आढावा 

चिपळूण शहराला मागच्या ४ दिवसांपासून पुराचा जोरदार फटका बसला आहे. काही ठिकाणी १० ते १५ फूट पाणी साचलं होतं. मात्र पूर आता ओसरू लागला आहे. पण पुराचं पाणी नागरी वस्तीत शिरल्यान अनेक घरांमधील सामानाचं नुकसान झालं आहे.

मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चिपळूण येथे ५ तात्पुरत्या निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सोबतच रत्नागिरी जिल्ह्यात मदत कार्यासाठी सध्या नेव्हीची ५, लष्कराच १, कोस्ट गार्ड २ आणि एअरफोर्सची १ टिम कार्यरत आहे.

जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,

खेडमध्ये पोसरे-बौद्धवाडीतही काल १८ घरांवर दरड कोसळली आहे. यात १७ जण गेल्याची अडकले असून ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु असून १३ ते १४ लोक अजूनही अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील मदत कार्य आढावा 

ABP माझा आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

आंबेघरमध्ये भुस्खलन होऊन १६ लोक कालपासून बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत गावातील ७ ते ८ घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर, जवळपास २० घरांचं नुकसान झालं. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे १६ ते १८ तास उलटून देखील ग्रामस्थांना मदत मिळालेली नव्हती.

सातारच्या जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तिथं एनडीआरएफची टीम पोहोचली असून मदतकार्याला सुरुवात झाली आहे.

सोबतच जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका ओळखून एकूण १८९ कुटुंबातील ७५५ जणांना त्यांच्या गावातील जवळच्या नातेवाईकांकडे तसेच नगरपालिका शाळा या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर मदत कार्य आढावा…

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने उसंत घेतली असून पाणीपातळी कमी होत आहे. तरीही अजून बचावकार्य सुरू आहे. मात्र पंचगंगा नदी धोका पातळीच्या बाहेर गेल्यानं शहरासह चिखली, शिये, कसबा बावड्यासह अनेक गावांना फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

सोबतच पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,

दोन दिवसांपूर्वी शहरात एनडीआरएफच्या ३ तुकड्या दाखल झाल्या होत्या. सोबतच आज दुपारी अजून ४ तुकड्या हवाईमार्गे कोल्हापूर विमानतळावर दाखल होत आहेत. त्यामुळे मदत कार्यासाठी आणखी वेग येणार आहे.

सोबतच कोल्हापूर शहर विभागातील ३ उपकेंद्रे, १९ वीजवाहिन्या आणि ५०३ वितरण रोहित्रे बंद असल्याने ५० हजार ३२३ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. त्यामुळे दोन्ही ग्रामीण विभागातील ७२ हजार ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याच्या नियंत्रणासाठी पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे कोल्हापुरात दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

सांगली जिल्हा मदतकार्य आढावा…

सांगलीमधील आयर्विन पुलाची पाणी पातळी सध्या ५० फुटांवर पोहोचली आहे. मात्र कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या कमी केल्यामुळे उद्यापर्यंत हि पाणी पातळी कमी होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हयात सध्या पुरपट्यातील जवळपास ७ हजार ६७१ कुटुंबातील ३६ हजार ९८७ व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच लहान व मोठी अशा एकूण १४ हजार ८०० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.

सोबतच मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मदतकार्यानुसार २ NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.