चारा घोटाळ्यातील पैसे शोधण्यासाठी सरकारी बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी तलाव खोदून काढला होता

भारताच्या राजकारणात नेहमीच वादात राहणारं राज्य म्हणजे बिहार आणि बिहारचे वादग्रस्त राजकीय नेते कोण? असं म्हंटल की एकच नाव अनेक जण सांगतात, लालू प्रसाद यादव. नव्वदच्या दशकात लालूंनी जो देशभरात कुप्रसिद्ध घोटाळा केला त्याने आजवर त्यांचा पिच्छा सोडलेला नाहीये. हा घोटाळा म्हणजे ‘चारा घोटाळा’. १९९० ते १९९५ या काळात जनावरांना चारा देण्याच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून ९५० कोटी रुपये फसवणूक करून काढण्यात आले होते.

१९९६ मध्ये या घोटाळ्यावरून पडदा निघाला.

या घोटाळ्याच्या पाचही प्रकरणांत लालू दोषी सिद्ध झाले आहे. या घोटाळ्याचे अनेक किस्से गाजलेले आहेत. मात्र यातील एक किस्सा असा आहे जो त्या प्रश्नावर आधारित आहे ज्याच्या उत्तराची प्रतीक्षा आजही सगळे देशवासी करत आहेत.

 हा प्रश्न म्हणजे ‘चारा घोटाळ्यातील इतके पैसे लालूंनी नेमकं गडप कुठे केले?’ 

त्याच संदर्भातला हा किस्सा…

नितीश कुमार तेव्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. शपथविधीही झाला होता. तरीदेखील कार्यालयीन कामकाजासाठी नितीश राज्याच्या सरकारी अतिथि गृहाचा उपयोग करत होते. ते अजूनही मुख्यमंत्री निवासावर राहायला गेले नव्हते. इच्छा तर खूप होती पण तिथे जाता न येण्याचं कारण होतं लालू प्रसाद यादव.

लालू आणि राबडी देवी अजुनही ‘१, ॲनी मार्ग’ या मुख्यमंत्री निवासात वास्तवास होते. तसं नितीश दुसरा बंगला घेऊ शकत होते मात्र त्यांचाही जीव त्याच बंगल्यात अडकल्याने ते वाट बघायला तयार होते.

१, ॲनी मार्ग हा काही नितीश यांच्यासाठी नवीन नव्हता. या बंगल्यात त्यांनी लालूसोबत अनेक भेटी केल्या होत्या आणि याच भेटींदरम्यान त्यांचं या बंगल्याबद्दल आकर्षण वाढलं होतं. खरं तर इथूनच त्यांनी मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघितलं होतं. जेव्हा लालूंनी गंभीर मुद्यांवर सुद्धा बेफिकीरपणा दाखवायला सुरुवात केली तेव्हा नितीश यांना वाटायला लागलं होतं की, त्यांनी या बंगल्यात राहायचं स्वप्न का पाहू नये? त्यानुसार त्यांनी वाटचाल सुरु केली होती.

अखेर त्यांचं स्वप्न अस्तित्वात आलं, मात्र ते स्वप्न जगण्यासाठीचा बंगला अजून मिळालेला नव्हता. तिकडे लालू यांचा कार्यकाळ संपूनही ते बंगला सोडत नव्हते. दुसऱ्या बंगल्यात त्यांना हव्या तशा सोयी सुविधा बांधकाम खात्याने करून दिलेल्या नाहीत, मग खरमास हा हिंदू वर्षाच्या दृष्टीने अशुभ असा महिना आला ज्या महिन्यात बिहारी लोक लग्न वगैरे करीत नाही किंवा नवीन घरात राहायला जात नाहीत, अशी अनेक कारणं ते द्यायचे.

नितीश हे सर्व सहन करत होते आणि प्रतीक्षा करत होते. अखेर चार महिन्यांच्या टोलवा टोलवीनंतर लालू आणि राबडी यांनी बंगला सोडला. मात्र त्यांनी बंगला सोडण्याआधी एक आठवडा कुणालाही तिथे जाण्यास परवानगी नव्हती. तेव्हा याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागले.

त्यात एक शंका अशी लावली गेली की, चारा घोटाळ्यात लालूंनी जे पैशाचे गठ्ठे कमावले ते मुख्यमंत्री बंगल्याच्या आतील भागात दडवून ठेवण्याचं काम त्या आठवडाभरात उरकून घेतलं गेलं.

मात्र नितीश जेव्हा त्या बंगल्यात गेले तेव्हा सत्य समोर आलं जे पूर्णतः वेगळं होतं. त्या बंगल्याच्या आवारात लालू आणि राबडी भाज्या लावत होते आणि त्यांनी तिथली सगळी माती नवीन बंगल्यात नेली होती. कारण त्यांना नवीन बंगल्यात ती पसरवून लावायची होती. या मागे त्यांची अंधश्रद्धा होती की त्या पवित्र मातीच्या सुपीकपणामुळेच त्यांची पुन्हा भरभराट होईल.

आता नितीश तिथे राहायला गेले होते तेव्हा त्यांना जागा परत अधीसारखी नीट हवी होती. म्हणून त्यांनी कृषी खात्याला बोलावलं. पाहणी करून कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी नितीश यांना सांगितलं की आवारातील शेतात आता काहीच पिकणार नाही कारण तिथून जवळजवळ फूटभर खोलीची माती चोरण्यात आली आहे, ज्यातून सगळे उत्तम नैसर्गिक घटक निघून गेले आहेत.

तेव्हा आता नितीश यांनी त्या ठिकाणी पडलेले मोठ-मोठे खड्डे भरून काढण्यासाठी ट्रकद्वारे माती आणली मात्र ही माती वेगवेगळ्या ठिकाणांवरून आणल्यामुळे त्यामध्ये वेगवेगळी पोषक द्रव्य होती म्हणून कर्मचाऱ्यांना गांडूळ शेती करून एकसमान पोषक द्रव्ये निर्माण करावी लागली.

मात्र या दरम्यान हा प्रश्न होताच की लालूंनी अखेर पैसा लपवला कुठे? याबद्दल अजून एक किस्सा असा सांगितला जातो की नितीश कुमारांच्या कर्मचाऱ्यांना खबर लागली होती की या मुख्यमंत्री बंगल्याच्या पोहण्याच्या तलावाच्या फरशांच्या खाली आणि कडेच्या भिंतींच्या मागे हा पैसा लपवून ठेवण्यात आला आहे. तेव्हा सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून संपूर्ण तलाव खोदून काढला होता.

 मात्र बराच काळ खनन झाल्यावर देखील जेव्हा काहीच हाती लागलं नाही तेव्हा त्यांनी प्रयत्न सोडून दिले आणि हा प्रश्न अनुत्तरितच राहिला की नेमकं लालूंनी संपत्ती गडप कुठे केली?

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.