दिल्लीला जाण्याचा प्लॅन असेल तर या १० राज्यांच्या भवनांमध्ये खायला विसरू नका

मित्र सांगत होता दिल्लीत कामाला होतो पण खायचे फार वांधे व्हायचे. खाण्याच्या प्रत्येक गोष्टीत नुसतं बटर टाकत्यात. भाजीत बटर, चहात बटर. तोंडाला काय चव येईना.. मग या भावाने एक ऑप्शन शोधून काढला. दिल्लीत वेगवेगळ्या राज्यांची भवन आहेत. त्या त्या भवनात जाऊन त्या त्या राज्यांच्या जेवणाची चव घेण्याचा त्याने सपाटाच लावला. त्याचीही यादीही त्यांनी पाठवली.

जर तुमचाही दिल्लीला जाण्याचा प्लॅन असेल तर या मित्राने सांगितलेल्या या १० राज्यांच्या भवनांमध्ये अप्रतिम चवीचे पदार्थ ट्राय करायला विसरू नका.

१) महाराष्ट्र सदन 

दिल्लीचा प्लॅन बनवत असाल तर राहण्यासाठी आणि खाण्यासाठी पहिलं स्थान म्हणजेच महाराष्ट्र सदन. महाराष्ट्र सदनात राहण्याची फाईव्ह स्टार व्यवस्था आहेच सोबतच अस्सल मराठमोळं जेवण करण्याची सोय सुद्धा आहे. अगदी वडापावपासून साबू वडा, पोहे, मिसळ, मिसळ पाव पर्यंत सगळे चमचमीत नाष्ट्याचे पदार्थ महाराष्ट्र सदनात मिळतात.

जेवणात साधा वरण भात, पिठलं भाकरी, कोकणातील स्पेशल खोबऱ्यात शिजवलेले मासे, कोल्हापूरचं स्पेशल चिकन, मटण विथ तांबडा पांढरा रस्सा एकदम कडक असतो. मटकीची उसळ, पोळी आणि स्वीटची थाळीने पोट भरलंच म्हणून समजा. त्यावर शेवटी श्रीखंड आणि पुरणपोळी मागवायला विसरू नका.

२) आंध्र भवन 

दिल्लीमध्ये स्थानिक पदार्थाची अस्सल चव चाखायची असेल तर सर्वात महत्वाचं नाव म्हणजे आंध्र भवन. दिल्लीच्या १ अशोक रोडवर असलेल्या आंध्र भवनातील कॅंटीनमध्ये ऑथेंटिक आंध्रातील पदार्थ सर्व्ह केले जातात. या पदार्थांची चव इतकी भारी असते की, दिल्लीतील सगळ्यात राज्यांच्या भावनांपैकी सगळ्यात जास्त गर्दी ही आंध्र भवनातच असते. म्हणून सीट पकडायची असेल तर लवकर जावं लागेल.

यात ब्रेकफास्टसाठी स्पेशल कॉम्बिनेशन मिळतो, ज्यात इडली डोसा, वडा, सांबर आणि साऊथची फेमस कापी म्हणजेच कॉफी असते. यासोबत आंध्राची बिर्याणी, मटण फ्राय, चिकन फ्राय, चिकन कढी, प्रॉन कढी हे एकदम बेताचे पदार्थ आहेत. हॉटेलमध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे आंध्र थाळी, जी १६० रुपयाला मिळते. तर रविवारची स्पेशल थाळी २५० रुपयाला मिळते. 

३) गरवी गुजरात भवन  

ज्यांना मस्तपैकी गुजराती पदार्थ खायचे असतील त्यांच्यासाठी एकच पर्याय, ते म्हणजे गुजरात भवन. इथे गुळाचा ऑथेंटिक गोड स्वाद असलेली गुजराती थाळी मिळते. गुजरातमधील खमण, ढोकळा, फाफडा-जिलबी, पापडी, खांडवी, लोचा, गुजराती फारसनाचे पदार्थ आणि स्पेशल गुजराती कढी. सगळे पदरात अगदी गुजराती पद्धतीत सर्व केले जातात. 

दोन जणांचं गुजराती थाळीचं बजेट अगदी ४०-५०० रुपयात बसतं. त्यामुळे दिल्लीच्या चाणक्यपुरीत ११ कौटिल्य मार्गावर असलेल्या या नव्या आणि दिमाखदार हॉटेलच्या कॅंटीनमध्ये जेवायला अवश्य जा. 

४) बंग भवन 

गुजरात निवडणुकीत वादात अडकलेली बंगाली मासळी खायची इच्छा असेल तर दिल्लीत एकमेव ठिकाण, मु. पो. बंग भवन, ३ हॅली रोड, बाराखंबा रोड. इथे बंगालच्या गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील एकदम टेस्टी मासे मिळतात. बंगालची फेमस हिल्सा आणि रोउ मासळी इथे मिळते. यासोबत बंगालचे स्पेशल कोशा, मटण कोशा, झिंगे आणि लूची प्रसिद्ध आहेत.  

बंगाली पदार्थ म्हटले आणि त्यात गोडधोड नसेल असं होईल का कधी. बनगलचे प्रसिद्ध रसगुल्ले, सोंदेश, मिष्टी दही आणि फाफा दही डेझर्ट मध्ये खायला विसरू नका. मिष्टी दही आणि फाफा दही हे मातीच्या भांडयात बनवले जाणारे दोन गोड दह्याचे प्रकार एकदम भारी असतात.

५) दिल्ली कर्नाटक संघ भवन 

आंध्र भवनात ज्या प्रकारे खवय्यांची गर्दी असते अगदी त्याचप्रकारची गर्दी असलेली कँटीन म्हणजे कर्नाटक फूड सेंटर. दिल्लीच्या आरके पुरममध्ये असलेल्या कर्नाटक संघ भवनात साऊथ इंडियन पदार्थांची चवच वेगळी आहे. इथे सांबर आणि चटणीसोबत सर्व केला जाणारा म्हैसूर डोसा सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. 

डोशासोबत मेदूवडा, खस्ता वडे, दक्षिण दावणगिरी डोसा, इडली, उपमा, उत्तपम आणि सगळ्यात बेस्ट फिल्टर कापी फेमस आहेत. याच्या जोडीला कर्नाटकातील बिस्सी बेळे भात आणि कर्नाटकातील स्थानिक पदार्थ अगदी त्याच चवीत इथे मिळतात.

६) आसाम भवन 

महाराष्ट्रातील सत्तानाट्यात दोन वेळ आसाममधील झाडी, डोंगर आणि हॉटेल चर्चेत आलंय, पण या झाडी डोंगराच्या पलीकडे आसामच्या लोकल पदार्थाची चव बघायची असेल तर दिल्लीचं आसाम भवन गाठा. सरदार पटेल मार्गावरील या भवनात आसामच्या व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या डिश सर्व केल्या जातात. 

यात गोड्या पाण्यातील कोळशावर शिजवलेले मासे सगळ्यात प्रसिद्ध आहेत. सरसोच्या तेलात बनवलेले बटाटे आणि कांदा व कोशिंबिरीसोबत खाल्ली जाणारी डाळ आणि भात हे तर इथले रोजचे पदार्थ आहेत. दोघा जणांचं बजेट ६००-७०० रुपयात फिट बसतं.

७) गोवा निवास 

गोवा म्हटलं आणि खाण्याची इच्छा झाली नाही असं होईल का. गोव्याच्या बीचपासून कोसो दूर असलेल्या या गोवा निवासात गोव्यातील सर्व पदार्थांची इच्छा पूर्ण केली जाते. गोव्यापासून दूर असलेलं हे हॉटेल चविसोबतच पॉकेटला सुद्धा जास्त कात्री लावत नाही. त्यामुळे इथल्या पदार्थाची मनसोक्त चव घेऊ शकता. 

इथे गोव्याच्या सगळ्या प्रसिद्ध फिश आणि प्रॉन्सच्या डिश इथे तुम्हाला मिळून जातील. यात पेरी पेरी प्रॉन, झिंगा करी, प्रॉन बचलाओ हे तर मिळतातच. सोबतच चिकन जॅक्युटी आणि पोर्क विंदालू यांसाखे चिकन मटण आणि रानडुकराच्या मांसाच्या डिश सुद्धा मिळतात. बस ही चव घेण्यासाठी दिल्लीच्या चाणक्यपुरीत बीर टीकेंद्रजीत मार्गावर असलेल्या गोवा भवनात जा.

८) तामिळनाडू हाऊस

दक्षिण भारतीय जेवण करायचं असेल आणि तामिळनाडूचे पदार्थ खाल्ले नाहीत तर फाऊल मानलं जातं. दक्षिण भारतीय आणि स्पेशल चेट्टीनाड पदार्थांची चव घ्यायची असेल तर दिल्लीच्या तामिळनाडू हाऊसला सोडून दुसरी जागा मिळणार नाही. 

इथल्या स्पेशल थाळीमध्ये कारकुझांम्बू, गरिबियल, रस्सम, सांबर आणि कुट्टू मिळतो. यासोबतच गळा तर्र करण्यासाठी पेयम सुद्धा दिलं जातं. नॉनव्हेज मध्ये चिकन चेट्टीनाड, चिकन बिर्याणी, चिकन ६५ आणि पॅरोटा या डिश प्रसिद्ध आहेत. मग विचार करू नका, दिल्लीच्या चाणक्यपुरीतील चाणक्य थिएटरच्या समोर असलेल्या तामिळनाडू हाऊसमध्ये जाऊन या. 

९) समृद्धी केरळ हाऊस 

केरळची खाद्य परंपरा ही दक्षिण भारतात सगळ्यात समृद्ध खाद्य परंपरा मानली जाते. सगळ्यात स्वस्त आणि मस्त साऊथ इंडियन जेवणकरण्यासाठी केरळ हाऊसऐवजी दुसरी जागा नाही. इथे स्वस्त पदार्थ मिळत असल्यामुळे फार गर्दी असते, पण थोडी वाट बघा आणि टेबल पकडा.

डोशा पासून इडली ते वडा असे सगळे साऊथ इंडियन पदार्थ इथे मिळतात, पण सगळे केरळच्या ऑथेंटिक पद्धतीने बनवले जातात त्यामुळे इथली चवच वेगळी असते. इथे व्हेज पदार्थांबरोबर मीट फ्राय, चिकन फ्राय, फिश फ्राय, बिर्याणी, केरळचे वेगवगेळ्या माशांचे कालवण आणि फ्राय केलेले मासे खाण्यासारखे असतात.

मात्र फिश फ्राय, चिकन करी आणि पराठे हे फक्त आणि फक्त संध्याकाळीच मिळतात. मग वाट बघू नका संध्याकाळी जनपथावर ३ जंतर मंतर रोडवर असलेल्या केरळ हाऊसमध्ये जा आणि मनसोक्त खा.

१०) जम्मू काश्मीर हाऊस 

अस्सल नॉनव्हेज लव्हर्ससाठी सगळ्यात दर्दी जागा म्हणजे जम्मू काश्मीर हाऊस. चाणक्यपुरीतील कौटिल्य मार्गावर असलेल्या या हाऊसमध्ये काश्मिरातील एकपेक्षा एक नॉनव्हेज पदार्थ सर्व्ह केले जातात. यात नादूर यखनी पुलाव, चमचमीत रोगनगोश आणि वाजवानचे पदार्थ प्रसिद्ध आहेत. वाजवान पदार्थ म्हणजे काश्मिरात स्पेशल दावतीला बनवले जाणारे पदार्थ होत.

यात शेळी आणि मेंढीच्या मांसापासून ५० पेक्षा जास्त प्रकारचे पदार्थ बनवले जातात. यात मटनामध्ये वेगवगेळ्या प्रकारच्या मसाल्यांचा आणि रेसिपींचा वापर करून स्पेशल तांब्याच्या गोलाकार भांड्यांमध्ये हे पदार्थ बनवले जातात. वाजवान बनवणारे आणि वाजवानचे पदार्थ हे दोन्ही काश्मीरच्या खाद्य संस्कृतीत महत्वाचे आहेत. म्हणून इथे जाऊन नॉनव्हेज टेस्ट करायला विसरू नका.

दिल्लीतील सर्व राज्यांच्या भवनांमध्ये त्या त्या राज्यांचे ऑथेंटिक पदार्थ मिळतात. पण या १० भवनाच्या कॅंटीनमध्ये एकापेक्षा एक अफलातून चवीचे पदार्थ मिळतात. त्यामुळे दिल्लीचा प्लॅन बनवत असाल तर या १० कँटीनला भेट द्यायला विसरू नका. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.