पहिल्यांदा महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली आणि जिंकली..!!!

राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर एकूण ३ पोटनिवडणूका लागल्या. त्यापैकी १ निवडणूक भाजपने तर १ निवडणूक कॉंग्रसने जिंकली होती. पण या दोन्ही निवडणूकीत “महाविकास” आघाडीचा समन्वय नव्हता. दोन्ही निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा एकमेकांच्या विरोधात जिरवाजिरवीचाच कार्यक्रम झाला.

पण याला उपवाद ठरली ती कोल्हापूर उत्तरची निवडणूक

कोल्हापूर उत्तरमध्ये पहिल्यांदा “महाविकास” आघाडीने एकत्रित लढत दिली आणि विजय मिळवला. झालेल्या या निवडणूकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांना ९६,२२६ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजीत कदम ७७,४२६ मते मिळाली. जयश्री जाधव यांचा एकूण १८,९०१ मतांनी विजय झाला..

पहिल्या दोन पोटनिवडणूकांमध्ये काय झालं होतं..

याआधी पंढरपूर आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथं पोटनिवडणुका झाल्या होत्या. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचं बोललं गेलं होतं.

सुरवात झाली होती पंढरपुरातनं

राष्ट्रवादीच्या वाट्याला ही जागा गेल्यानं शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी केली होती. तसेच गुलाबराव पाटील वगळता शिवसेनेचा एकही मोठा नेता या निवडणुकीत उतरला नव्हता. या निवडणुकीत महाविकासआघाडीकडून उभा असलेल्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान अवताडे यांनी पराभव केला होता.

देगलूरमध्ये पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न

रावसाहेब अंतापूरकर यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने महविकासाआघाडीचे उमेदवार म्ह्णून जितेश अंतापूरकर याना मैदानात उतरवलं होतं. इथपण पुन्हा सेनेकडून बंडखोरी झाली आणि शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी भाजपात प्रवेश करत अंतापूरकरांच्या विरोधात निवडणुकीत उतरले होते. शिवसेनेचा कोणताही मोठा नेता या निवडणुकीत दिसला नाही. अशोक चव्हाण यांनी मग सगळी ताकद लावत काँग्रेससाठी पर्यायाने महाविकास आघाडीसाठी ही जागा जिंकली.

आतापर्यंत पोटनिवडणुकीत १-१ असा स्कोर झाला पण कॉंग्रेसची जी एक जागा आली त्यासाठी राष्ट्रवादीने विशेष प्रयत्न केले नव्हते की कॉंग्रसने… 

मात्र कोल्हापूरची पोटनिवडणूक वेगळी ठरली. १९९० पासून २००४ आणि २०१९ चा अपवाद वगळता या जागेवर कायम शिवसेना निवडून आल्याचा इतिहास आहे. उत्तेरतून दोन टर्म आमदार राहिलेले शिवसेनेचे राजेश क्षीरसागर या वेळी पुन्हा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते.

या जागेसाठी असणारा आग्रह त्यांनी उघडपणे माध्यमांसमोर बोलून दाखवल्यानंतर आत्ता कोल्हापूरात देखील तसेच पंढरपुर व देगलुर प्रमाणेच चित्र पहायला मिळणार अशी शक्यता होती. 

मात्र नाराजीच्या दोन दिवसातच राजेश क्षिरसागर यांना मातोश्रीवरून बोलावणं आलं आणि राजेश क्षिरसागर यांच बंड क्षमलं. राजेश क्षिरसागर यांनी आपलं बंड फक्त थांबवलच नाही तर त्यांनी सक्रियपणे प्रचारात भाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना योग्य तो मॅसेज मिळावा व सेनेचे कार्यकर्ते देखील कॉंग्रेसच्या प्रचारात सक्रिय झाले.

दूसरीकडे कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेनेचे वरुण देसाई, उदय सामंत काँग्रेसचे प्रणिती शिंदे, सचिन सावंत, धीरज देशमुख, अमित देशमुख राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी प्रचारासाठी सभा घेतल्या. 

महाविकास आघाडीचा सर्वप्रथम प्रयोग कोल्हापूरात झाला

महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातच पहिल्यांदा झाला असं म्हणायला हरकत नाहीये. २०१९ मध्ये मुन्ना महाडिक यांना विरोध करत काँग्रेसच्या बंटी पाटलांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना पाठिंबा देत निवडून आणलं होतं.

राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांनी पण शिवसेनेच्या विजयाला हातभार लावल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. याही निवडणुकीत बंटी पाटील गट आणि महाडिक गट आमने-सामने होते. 

हे सगळे फॅक्टर लक्षात घेऊन बघितलं तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये निवडणुकीत प्रचारात पहिल्यांदाच ताळमेळ असल्याचे चित्र होते. 

महाविकास आघाडीचा हा नवीन कोल्हापूर पॅटर्न त्यामुळं राज्यात इतर ठिकाणी रिपीट होतो का हे पाहण्यासारखा असणार आहे. विशेषतः मुंबई, पुणे या शहरातल्या महानगरपालिकांसाठी हा पॅटर्न उपयोगात येऊ शकतोय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.