पहिल्यांदाच पारंपरिक विरोधक थोरात- विखे समोरासमोर लढणार….

राज्यात पुन्हा एकदा विधानपरिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर आणि औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभाग शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर पासून नवीन मतदार नोंदणी सुरू होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल.

या सगळ्यात यंदा सर्वाधिक चर्चा होणार आहे ती नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची. 

या निवडणुकीच्या निम्मिताने आजी- माजी महसूल मंत्री समोरासमोर येणार असल्याची शक्यता. थोरात आणि विखे घराणी एकमेकांची प्रतिस्पर्धी असली तरीही थेट लढत कधी झाली नव्हती. पहिल्यांदाच अशा प्रकारे सामोरे जातील असे सांगितलं जात आहे. 

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सोपी नसते. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी कुठल्याही पक्षाकडून अजूनही उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नाही. तरीही काँग्रेस कडून परत एकदा माजी मंत्री  बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

२००९ पासून सलग तीन वेळा डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत. यंदा मात्र त्यांना ही निवडणूक सोपी नसणार आहे. त्याच कारण म्हणजे नाशिक पदवीधर मतदार संघातून डॉ. राजेंद्र विखे पाटील निवडणूक भाजपकडून लढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. 

हे सगळं जाणून घेण्यापूर्वी राजेंद्र विखे कोण आहेत ते पाहुयात

अहमदनगर जिल्ह्यात विखे कुटुंबीयांचं मोठं प्रस्थ आहे. सहकार आणि संस्थांच्या माध्यमातून विखे कुटुंबाने नगरच्या राजकारणात खोलवर पाळेमुळे रोवली आहे. बाळासाहेब विखे पाटील यांना राधाकृष्ण विखे, अशोक विखे आणि राजेंद्र विखे असे तीन मुलं. यातील राधाकृष्ण विखे पाटील हे सुरुवाती पासून राजकारणात आहेत तर अशोक विखे आणि राजेंद्र विखे हे शैक्षणिक संस्था सांभाळतात. 

सध्या डॉ राजेंद्र विखे पाटील हे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर राजेंद्र विखे पाटील हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजकारणात गेली २० ते २५ वर्षांपासून सक्रिय आहे. 

डॉ. राजेंद्र विखे हे दोन वेळा संस्था चालकाचे प्रतिनिधी म्हणून सिनेटला निवडून आले आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिल, अकॅडमिक काउन्सिल, सल्लागार अशा पदांवर काम केलं आहे. तसेच या २५ वर्षाच्या कार्यकीर्दीत त्यांनी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत त्यांनी पदवीधर आणि शिक्षकांचं पॅनेल निवडून आणले आहे.

राजेंद्र विखे यांची जमेची बाजू म्हणजे 

राजेंद्र विखे हे सक्रिय राजकारणात नसले तरीही विद्यापीठाच्या राजकारणात २५ वर्षांपासून आहेत. त्यांनी सिनेटच्या माध्यमातून संस्थाचालकांचे प्रतिनिधित्व केले आहे. ते शिक्षण क्षेत्राशी गेली अनेक वर्ष निगडित आहेत. त्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क मजबूत आहे. 

नगर जिल्ह्यात विखे कुटुंबियांचे राजकीय वजन राहिले आहे. राजेंद्र विखे यांचे भाऊ राधाकृष्ण विखे हे शिंदे सरकार मध्ये महसूल मंत्री तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राधाकृष्ण विखे पाटील सातवेळा आमदार, सातवेळा मंत्री अशी त्यांची मोठी राजकीय कारकीर्द राहिली आहे. याच बरोबर राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे हे नगरचे खासदार आहेत. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत याचा फायदा राजेंद्र विखे यांना होऊ शकतो.   

राजेंद्र विखे यांचा सामना सलग ३ वेळा निवडणून येणाऱ्या डॉ. सुधीर तांबे यांच्याशी होणार आहे 

डॉ सुधीर तांबे यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे एवढीच ओळख नाही. संगमनेर येथे तीस वर्षांपूर्वी त्यांनी मूकबधिर व देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाची स्थापना करून आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला.

२००९ मध्ये प्रताप सोनवणे लोकसभेत गेल्यानंतर रिक्त झालेल्या नाशिकच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. अवघ्या ११ महिन्यांच्या कार्यकाळ त्यांना मिळाला होता. २०१० आणि २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी सहज विजय मिळविला होता. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी विविध आंदोलने केली. विशेषतः टोमॅटो उत्पादकांच्या प्रश्नी त्यांचे आंदोलन गाजले होते. नगर, नाशिक, जळगाव अशा ५ जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तसेच अजून एक महत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीचा फायदा सुधीर तांबे यांना होऊ शकतो.

या निवडणुकीची सार्वधिक चर्चा होण्याचे कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील पारंपरिक विरोधक हे एकमेकांसमोर उभे राहणार आहे  

विखे आणि थोरात वाद हा काही नगर जिल्हा तसेच राज्याला नवा नाही. एकाच पक्षात राहून कुरघोडी करणारे म्हणून त्यांना ओळखलं जात.  एकमेकांविरोधात उमेदवार देणे, अपक्षाला बळ देण्याचे काम दोन्हीकडून वेळोवेळी केलं गेलं. कुरघोडीचं राजकारण करण्यात हे दोन्ही घराणी कधीच कमी पडली नाही. मात्र यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात समोर राहणार आहेत.   

इतिहासात पाहायला गेलं तर,

याबाबत बोल भिडूशी बोलतांना ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांनी सांगितले की,  

विखे हे प्रवरा नगरचे तर अण्णा शिंदे बाजूच्या श्रीरामपूरचे होते. या दोन्ही नेत्यात उमेदवारी मिळवण्यापासून संघर्ष होता. बाळासाहेब विखे हे चव्हाण गटाचे तर अण्णासाहेब शिंदे हे शरद पवार यांच्या गटाचे होते. महत्वाचे म्हणजे कोपरगाव लोकसभा मतदार संघातून अण्णासाहेब म्हणून निवडून येत. त्यानंतर याच मतदार संघातून बाळासाहेब विखे निवडून आले होते. असं सांगण्यात येत येतं की, बाळासाहेब विखेंना तिकीट मिळू नये म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी प्रयत्न केले होते.

बाळासाहेब विखेंना शह देण्यासाठी शरद पवार यांनी अण्णासाहेब शिंदे यांना राज्यसभेवर पाठवलं. बाळासाहेब विखेंच्या कार्य क्षेत्रात अण्णासाहेब शिंदे यांची शेती होती. मात्र विखेंनी अण्णा शिंदे यांचा ऊस कधीच प्रवरा कारखान्यात घेतला नाही. त्यामुळे संघर्ष वाढत गेला.

प्रवरा भागात अण्णा साहेब शिंदे यांनी श्रीरामपूर जिल्हा दूध संघ स्थापन केला. त्यावेळी राज्यात कोल्हापूर आणि श्रीराम जिल्हा दूधसंघने नावाजलेले होते. विखेंना ही राजकीय स्पर्धा वाटत होती. यामुळे विखें अण्णा शिंदेंना विरोध करत होते. अण्णासाहेब शिंदे पवारांच्या समाजवादी काँग्रेस मध्ये तर विखे शंकरराव चव्हाण यांच्या सोबत राहिले. 

आज पर्यंतच्या इतिहासात प्रवरा नगरचा कारखाना एकदाच विखे गटाला गमवावा लागला होता. तो सुद्धा शिंदे गटामुळे. त्यामुळे या दोन्ही गटात कधीच जमलं नाही. 

तर दुसरकीकडे बाळासाहेब थोरात आणि विखे यांचे न पटण्याचे कारण म्हणजे माजी आमदार बी. जी. खताळ.  १९६२ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बी. जी. खताळ निवडून येत होते. खताळ यांना विखे गटाचे यांचे समर्थन होते. त्यामुळे खताळ यांचा नगरच्या राजकारणात विखेंना नेहमी पाठिंबा  असायचे. थोरात आणि खताळ यांचे स्थानिक पातळीवर कधीच पटले नाही. त्यातच विखे कुटुंबीय त्यांना पाठिंबा देत असल्याने पुढे कधीच थोरात आणि विखेंमध्ये पटलं नाही. अण्णा साहेब थोरात यांची बहीण भाऊसाहेब थोरात यांना दिली होती.

शिंदे आणि थोरात हे दोन्ही नेते आप आपल्या मतदार संघात पॉवरफुल नेते त्यामुळे जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व राहील यासाठी हे दोन्ही नेते प्रत्नशील असायचे. आपला गट निर्माण करण्यात वाद वाढत गेला. त्यामुळे थोरात आणि विखे कुटुंबाचं कधीच पटलं नाही. 

कुरघोडीचं राजकारण कशा प्रकारे चालत होत हे पाहायचं असेल तर श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचं घेता येईल. १९९२-९३ मध्ये शिरामपूर दुघ संघात दररोज १ लाख ९१ हजार लिटर दूध संकलित केलं जात होत. तसेच या दूध संघातून भोपळला दररोज १० हजार लिटर दूध पाठवलं जात होत. मात्र विखे आणि शिंदे गटाच्या वादात हा दूध संघ बंद होता असेही भागा वरखडे यांनी सांगितले. 

थोरात आणि विखे कुटुंबीय हे सुरुवाती पासून पारंपरीक विरोध राहिले आहेत. त्यांच्यातील कोल्ड वार कधीच थांबला नाही. एकमेकांविरोधात कुरघोडी चालूच असायची. मात्र त्यांची थेट लढत कधीच झाली नव्हती. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने ती पाहायला मिळू शकते. 

विखेंच्या भाजप प्रवेशानंतर कुरघोडीच्या राजकारणात अधिक भर पडली. त्यामुळे या निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार हे महत्वाचं असणार आहे.  दोन्ही घराण्याची प्रतिष्ठा पणाला लावली जाणार आहे.  नगर जिल्ह्यात विखे पाटलांना भाजपकडून बळ देण्यात येत आहे. त्यात राजेंद्र विखे यांना नाशिक पदवीधर मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.