या कारणामुळे मोदी सुद्धा बद्रीनाथला जाण्यापूर्वी केदारनाथचं दर्शन घेतात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेऊन, व्हायब्रंट व्हिलेजमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या माना गावाला भेट दिलीय. नरेंद्र मोदी यांनी २०१७ ते २०२२ दरम्यान केदारनाथ मंदिराला ६ वेळा भेट दिली आहे.

दिवाळीच्या अगोदर मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराला भेट देतात. पण त्यांच्या या भेटीमध्ये चौथं धाम असलेल्या बद्रीनाथापेक्षा केदारनाथाचीच जास्त चर्चा होत असते.

हिंदू धर्मात चार धाम महत्वाचे समजले जातात. यात पुर्वेला पुरी जगन्नाथ, पश्चिमेला द्वारिकाधीश, उत्तरेला बद्रीनाथ आणि दक्षिणेला रामेश्वरम धाम आहे.

दरवर्षी लाखो हिंदू धर्मीय वैष्णव आणि शैव मंदिरं असलेल्या ४ धामांची यात्रा करतात.

यात जगन्नाथ, द्वारकाधीश आणि रामेश्वरम मंदिरात थेट दर्शन घेऊन यात्रा पूर्ण होते. मात्र बद्रीनाथाचं थेट दर्शन केल्याने यात्रा पूर्ण होत नाही. कारण बद्रीनाथापुर्वी केदारनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय ती यात्रा अपूर्णच असते असं मानलं जातं. याच परंपरेमुळे नरेंद्र मोदी बद्रीनाथला जाण्यापूर्वी केदारनाथला जातात आणि कायम केदारनाथ मंदिरच चर्चेत येतं.

पण बद्रीनाथापुर्वी केदारनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय ती यात्रा पूर्ण होत नाही असं का मानलं जातं.

तर बद्रीनाथ जरी चार धामांपैकी एक धाम असलं तरी बद्रीनाथापेक्षा केदारनाथाला जास्त जागृत देवस्थान मानलं जातं. केदारनाथ मंदिराच्या बाबतीत अशी मान्यता आहे की, इथे महादेव थेट भक्तांशी भेटतात त्यामुळे केदारनाथाचं दर्शन केल्याशिवाय बद्रीनाथाच्या दर्शनाचं पूर्ण फळ मिळत नाही असं सांगितलं जातं.

केदारनाथ मंदिर इतकं महत्वपूर्ण असण्यामागे या मंदिराबाबतच्या काही आख्यायिका सांगितल्या जातात.

आख्यायिकेनुसार, महाभारताच्या युद्धात पांडवांनी स्वतःच्या भावांची आणि गुरूंची हत्या केलीय होती. ते जरी युद्ध असले तरी भावांची आणि गुरूंची हत्या करण्याचं पाप पांडवांच्या हातातून घडलं होतं. त्या पापातून मुक्त होण्यासाठी पांडवांनी महादेवाची पूजा करून त्यांचं दर्शन घेण्याचं ठरवलं.

पांडव महादेवाच्या दर्शनासाठी केदारनाथाला पोहोचले. मात्र महादेव पांडवांवर काही कारणांमुळे नाराज होतात त्यामुळे त्यांनी पांडवांना दर्शन न देण्याचं ठरवलं होतं. जेव्हा पांडव केदारनाथला पोहोचले तेव्हा महादेवांनी स्वतःचं रूप बदलून बैलाचं रूप धारण केलं. परंतु पांडवांची महादेवावर अगाध श्रद्धा होती त्यामुळे त्यांनी कोणत्याही पद्धतीने महादेवाचं दर्शन घेण्याचं ठरवलं असतं.

महादेवाला ओळखण्यासाठी भीमाने एक युक्ती केली. भीमाने स्वतःचं शरीर मोठं केलं आणि स्वतःचे दोन पाय दोन्ही बाजूंच्या पर्वतांवर ठेवले. त्यानंतर भीमाच्या दोन्ही पायांच्या खालून सर्व बैल दुसरीकडे निघून गेले आणि महादेव एकटे उरले. 

पांडवांनी महादेवाला ओळखलं होतं. मग पांडवांपासून दूर जाण्यासाठी महादेव त्याच जागी अंतर्धान पावायला लागले. महादेव अंतर्धान आहे हे बघून भीमाने महादेवाच्या नंदी स्वरूपाचं वशिंड पकडलं. भीमाने रोखून धरल्यामुळे त्या जागी केवळ नंदीच्या खोंडाचा भाग उरला. याच वशिंडाचं  शिवलिंग झालं. 

पांडवांची भक्ती बघून महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी पांडवांची पूजा मान्य करून त्यांना बंधू आणि गुरु हत्येच्या पापातून मुक्त केलं. तेव्हापासून या मंदिरात महादेवाचा प्रत्यक्ष वास असतो आणि माणसाने केलेल्या चुकांमधून महादेव त्यांना मुक्त करतात असं मानलं जातं. 

या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते….

ती अशी की २,२०० वर्षांपूर्वी आदी कालपी नावाच्या गावात आदी शंकराचार्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील महादेवाचे मोठे उपासक होते त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलाचं नाव शंकर असं ठेवलं. शंकर ३ वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या ८ व्या वर्षीच शंकरने धार्मिक तत्वज्ञानावर पांडित्य प्राप्त केलं.

पांडित्य प्राप्त केल्यानंतर शंकरने वयाच्या ८ व्या वर्षी सन्यास घेतला आणि स्वतःचं आयुष्य महादेवाच्या सेवेत समर्पित केलं. यासाठी त्यांनी पश्चिमेला शारदा मठ, दक्षिणेला शृंगेरी मठ, पूर्वेला गोवर्धन मठ आणि उत्तरेला बद्री मठाची स्थापना केली. पण जेव्हा त्यांना कळलं की मठाच्या निर्मितीचं आपलं जीवितकार्य संपलं आहे. तेव्हा त्यांनी ही पृथ्वी सोडण्याचा निर्णय घेतला.

यासाठी ते बद्रीनाथवरून केदारनाथला आले. त्यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी महादेवाकडे देह त्यागण्याची आज्ञा मागितली. महादेवाच्या आज्ञेनंतर शंकराचार्य मंदिराच्या बाहेर आले, त्यांनी स्वतःच्या शिष्यांना मागे वाळण्यास सांगितलं आणि त्याच जागी अंतर्धान झाले. शंकराचार्यांच्या सदेह कैलासी जाण्यामुळे केदारनाथला बद्रीनाथापेक्षा जास्त पवित्र मानलं जातं.

या दोन आख्यायिकांमुळेच बद्रीनाथ मंदिराचं दर्शन घेण्यापूर्वी केदारनाथाचं दर्शन घेण्याची परंपरा पाळली जाते. 

आख्यायिकांसोबत दारनाथ मंदिराशी नरेंद्र मोदी यांचं केदारनाथ मंदिराशी

एक विशेष नातं आहे. 

मोदींनी जेव्हा घरदार सोडून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते केदारनाथला आले होते.  नरेंद्र मोदी जेव्हा २०१७ मध्ये पहिल्यांदा केदारनाथला आले होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या केदारनाथमधल्या आठवणी सांगितल्या होत्या. 

ते म्हणाले होते की, 

“इथल्या गरुडचट्टीबरोबर माझं विशेष नातं आहे. आजही तेथील काही लोकं मला ओळखत असतील. मी या गरुडचट्टीमध्ये १.५ महिने साधना केली होती.” 

याच्या आधारावर सांगण्यात येत की, नरेंद्र मोदी यांनी १९८० च्या दशकात जेव्हा घर सोडून संन्यासी होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ते केदारनाथला आले होते. आतल्या गरुडचट्टी मध्ये त्यांनी साधना केली होती. साधनेदरम्यान ते दररोज केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी येत होते.

याच साधनेदरम्यान एका साधूने त्यांना सन्यास न घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी मोदींना संन्यासाऐवजी संसारात परत जाऊन समाजसेवा करण्याचा उपदेश केला होता म्हणून नरेंद्र मोदींनी सन्यास घेतला नाही असं सांगितलं जातं.

यामुळे नरेंद्र मोदी अनेकदा केदारनाथला जाऊन उपासना आणि साधना करत असतात. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वी त्यांनी केदारनाथमधील रुद्र गुहेत साधना केली होती.  

बद्रीनाथपेक्षा केदारनाथचं धार्मिक आणि पौराणिक महत्व जास्त असल्यामुळे लाखो भाविक बद्रीनाथापूर्वी केद्रनाथाच्न दर्शन करतात. तर लाखो भाविक केवळ केदारनाथाच्याच दर्शनाला जातात. नरेंद्र मोदीं सुद्धा याच परंपरेच पालन करतात आणि बद्रीनाथापुर्वी केदारनाथाच दर्शन घेतात. सोबतच नरेंद्र मोदी यांचा केदारनाथशी विशेष संबंध असल्यामुळे सुद्धा ते वारंवार केदारनाथचं दर्शन घेतात.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.