या कारणामुळे इलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्याबरोबर पराग अग्रवालना कंपनीतून काढून टाकलं
इलॉन मस्कने ट्विटर वरील स्वतःचा बायो बदलला होता. त्यामुळे गेल्या २ दिवसांपासून ट्विटर इलॉन मस्कच्या हातात जाईल अशी जोरदार चर्चा सुरु होती.
परंतु इलॉन मस्कने आज सकाळी एक ट्विट केलं.
‘the bird is freed’ म्हणजेच पाखरु मुक्त झालं
मस्कच्या या ट्विट पाठोपाठ मस्कने ट्विटर खरेदी केल्याची बातमी सुद्धा आली.
मात्र या बातमीसोबत लोकांना आणखी एक धक्का बसला, कारण मस्कने ट्विटर खरेदी केल्याबरोबर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालना पदावरून आणि कंपनीतून काढून टाकलं होतं. एवढचं नाही तर अग्रवालसोबतच सीएफओ नेड सेगल आणि लीगल अफेअर्स आणि पॉलिसी हेड विजया गड्डे यांना सुद्धा काढून टाकण्यात आलंय.
इलॉन मस्कच्या या निर्णयामुळे पराग अग्रवाल आणि मस्क या दोघांमध्ये असलेला वाद चर्चेत आलाय.
हा वाद म्हणजे दोघांमध्ये वैयक्तिक वाद नाही, तसंच तो फार जुना सुद्धा नाही. अवघ्या ६ महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल २०२२ पासून दोघांमध्ये वाद सुरु झालाय, पण या थोड्या काळातच दोघांनी एकमेकांवर जाहीर चिखलफेक केली होती त्यामुळे हा वाद विकोपाला गेला. म्हणून ट्विटर खरेदी केल्याबरोबर मस्कने पराग अग्रवालना सीईओ पदावरून काढून टाकलंय.
झालं असं की, भारतीय वंशाच्या इतर मोठ्या मोठ्या सीईओची परंपरा पुढे नेत पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ झाले.
पराग अग्रवालने डिसेंबर २०२१ मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली. परंतु लवकरच ट्विटरच्या मालकीमध्ये बदल व्हायला लागले. ३१ जानेवारीपासून इलॉन मस्कने ट्विटरचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. हळूहळू २६ मार्च २०२२ ला मस्कने ट्विटरचे ५ टक्के शेअर्स खरेदी केले आणि ट्विटरमध्ये सगळ्यात मोठा शेअर होल्डर बनला.
यादरम्यान २६ मार्च २०२२ ला इलॉन मस्कने “ट्विटरला पर्याय म्हणून दुसरं नवीन ट्विटर तयार करण्याचा विचार करत आहे.”, असं ट्विट केलं होतं.
या ट्विटच्या काही दिवसानंतरच ४ एप्रिल २०२२ ला मस्कने ट्विटरचे आणखी ४.२ टक्के शेअर्स खरेदी केले.
अधिकचे ४.२ टक्के शेअर्स खरेदी केल्यानंतर इलॉन मस्ककडे ट्विटरचे ७३.५ मिलियन शेअर्स आले होते. या शेअर्सची एकूण किंमत ३ अब्ज डॉलर होती. कंपनीचे सगळ्यात मोठे शेअर होल्डर असल्यामुळे मस्कने स्वतःकडे १४.९ पेक्षा जास्त शेअर्स नाहीत असा हवाला देऊन बोर्डात एक जागा मागितली होती.
तेव्हा पराग अग्रवाल यांनी याबद्दल ट्विट केलं होतं, ज्यात परागनी म्हटलं होतं की,
“इलॉन मस्कला ट्विटरच्या बोर्डात अपॉईंट करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मस्कमुळे आमच्या बोर्डाला चांगली प्रतिष्ठा मिळेल.”
पराग अग्रवालनी मस्कबद्दल आनंद व्यक्त केला होता, मात्र १० एप्रिलला मस्कने एक ट्विट केलं,
“काय ट्विटर मरत आहे?”
मस्कने हे ट्विट करण्यामागे ट्विटरच्या टॉप १० वापरकर्त्यांचं उदाहरण दिलं होतं. टॉप फॉलोवर असलेले जगातले ट्विटर युजर फार कमी ट्विट करतात असं मस्कने म्हटलं होतं. त्यात जस्टिन बिबरने गेल्या वर्षभरात फक्त एकच ट्विट केलंय असंही मस्कने सांगितलं होतं.
मस्कसारखा ट्विटरच्या मोठ्या शेअर होल्डरने असं ट्विट केल्यामुळे सीईओ पराग अग्रवाल आणि इलॉन मस्क यांच्यात ट्विटरवर खडाजंगीला सुरुवात झाली.
११ एप्रिल २०२२ रोजी पराग अग्रवाल यांनी ट्विट केलं. ज्यात अग्रवाल यांनी सांगितलं की,
“मस्क ट्विटर बोर्डाचे सदस्य होणार नाहीत.”
यानंतर १३ एप्रिलला इलॉन मस्कने संपूर्ण ट्विटर खरेदी करण्यासाठी कंपनीला ४४ अब्ज डॉलरची ऑफर दिली. मस्कच्या ऑफरनंतर ट्विटरची मालकी वाचवण्यासाठी ट्विटर बोर्डाने पॉइझन पिलची घोषणा केली. तर मस्कचा या ऑफरमुळे पराग अग्रवाल सुद्धा मागे राहिले नाहीत. त्यांनी ट्विटरचं स्वातंत्र्य संपेल अशी भीती व्यक्त केली आणि मस्कवर टीका करणारे ट्विट केले.
पण मस्कने ट्विटर खरेदी करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले.
त्यात मे २०२२ मध्ये ट्विटरवर असलेल्या स्पॅम अकाउंट्सची माहिती देण्यासाठी ट्विटरकडे मागणी केली.
त्यावर पराग अग्रवालनी १६ मे २०२२ ला ट्विटरवर असलेल्या स्पॅम अकाऊंटच्या बाबतीत एक अक्खा थ्रेड ट्विट केला होता. पराग अग्रवालनी त्या १५ ट्विटच्या थ्रेडमध्ये ट्विटरकडून वेळच्या वेळी स्पॅम अकाउंट क्लिअर केले जातात अशी माहिती दिली होती. यासोबतच ट्विटरला टेकओव्हर करताना मस्कने ट्विटरचे शेअर्स प्रभावित केले आहेत, असे आरोप २६ मे रोजी ट्विटरने केले होते.
त्यानंतर पुन्हा एकदा पराग अग्रवालनी ५ जूनला ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात लिहिलं होतं की,
“खाली जागा, कोणतीही माहिती उपलब्ध नाही.”
पण इलॉन मस्कने मात्र ट्विटरकडून खरी आणि पूर्ण माहिती देण्यात आली नाही असा आरोप केला आणि ९ जुलैला ट्विटरच्या खरेदीचा करार रद्द केली.
मस्कने करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरने याविरोधात अमेरिकेच्या कोर्टात याचिका दाखल केली.
ट्विटरच्या याचिकेवर निकाल देतांना कोर्टाने इलॉन मस्कने २८ ऑक्टोबरच्या आता ट्विटरला खरेदी करण्याचा करार पूर्ण करावा असे आदेश दिले. म्हणून मस्कने २७ ऑक्टोबरलाच ४४ अब्ज डॉलरमध्ये ट्विटरच्या खरेदीचे करार पूर्ण केले आणि ट्विटर ताब्यात घेतलं.
परंतु ट्विटर खरेदी करण्याच्या काळात पराग अग्रवाल आणि इलॉन मस्क या दोघांनी एकमेकांवर टीका केली होती. त्यामुळे जेव्हा केव्हा मस्क ट्विटर खरेदी करतील तेव्हा पराग अग्रवालना ट्विटरमधून काढलं जाईल अशी शंका एप्रिल महिन्यापासूनच व्यक्त केली जात होती. हीच शंका आज पूर्ण झाली आणि अखेर स्वतःवर टीका करणाऱ्या पराग अग्रवालना मस्कने कंपनीमधून बाहेर काढलं.
हे ही वाच भिडू
- अशी एक ‘स्ट्रॅटेजी’ ज्यामुळे सर्वात श्रीमंत इलॉन मस्कला ट्विटर खरेदी करता येत नाहीए..
- इलॉन मस्क गेट्सपेक्षा श्रीमंत कुणाच्या जीवावर झाला?
- इलॉन मस्कच्या ट्विट मधल्या घोळामुळे या कंपनीचे शेअर्स ११ हजार टक्क्यांनी वाढले.