फोर्ड, फियाट भारत सोडून गेल्या, पण जम कसा बसवायचा हे KIA कडून शिकायला हवं

मागच्या काही वर्षांमध्ये अनेक बड्या ऑटो कंपन्यांनी भारतातील आपला व्यवसाय बंद केला आहे. यात फोर्ड, शेवर्लेट, फियाट, हार्ले डेव्हिडसन सारख्या कंपन्यांच्या समावेश आहे. यासाठी या कंपन्यांनी अनेक कारणे दिली आहेत. पण या सगळ्या कंपन्यानंतर भारतात आलेल्या किया या कंपनीने मात्र भारतीय बाजारात आपले स्थान पक्के केले आहे.

भारताच्या ऑटो इंडस्ट्रीत जम बसवणे तसं सोपं नाही. मार्केट मध्ये टाटा, मारुती सुझुकी सारख्या कंपन्यांशी स्पर्धा आहे. किया मोटर्सला भारतात येऊन फक्त ३ वर्ष झाले आहेत. कमी वेळेत या कंपनीने भारतीय बाजारात चांगला जम बसवल्याचे पाहायला मिळत आहे.

दक्षिण कोरियाची कंपनी असणाऱ्या कियाने ऑगस्ट २०१९ मध्ये सेलटॉस ही मिड रेंज एसयूव्ही भारतीय बाजारात आणली. ही एसयूव्ही भारतात ग्राहकांना आवडली. कंपनीच्या यशात या एसयूव्हीचा मोठा वाटा आहे. तीन वर्षात ३ लाख सेलटॉस विकल्या गेल्या आहेत. मध्ये कोरोनामुळे अनेक दिवस शोरूम बंद होते. तरीही किया कंपनीने ही कमाल करून दाखवली आहे. 

किया कंपनीची स्थापना १९४४ मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाली. पहिल्यांदा कंपनी सायकलसाठी लागणारे सुटे भाग तयार करत होती. त्यानंतर किया कंपनीने १९५१ मध्ये सायकल बनवायला सुरुवात केली.   त्यानंतर किया कंपनी वाहन निर्मितीत आली. 

 सर्वसामान्य भारतीयांची घरानंतर सर्वात मोठी खरेदी म्हणजे कार असते. त्यामुळे कार घेताना ते फार काळजीने घेत असतात. 

कुठल्या कारणामुळे ‘किया’ भारतीय बाजारपेठेत जम बसवला.  

कियाने भारतीय ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीत चांगली दिसणारी, डिस्प्ले, कॅमेरा, एअरबॅग सारख्या टेक्निकल गोष्टी असणारी सेलटॉस एसयुवी बाजारात आणली. एंट्री लेव्हलच्या सोनेटपासून फ्लॅगशिप कार्निव्हलपर्यंत सगळ्या कार मध्ये चांगले इंटेरियर दिले. 

परवडणाऱ्या किमतीत कार घेण्याकडे भारतीय लोकांचा कल असतो. त्यातही आता कार खरेदी करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. किया कंपनीने इंटरनेट कार, ३६० डिग्री कॅमेरे, कारचे रंग असं सगळं तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन तयार केलं आहे. त्यामुळे भारतीय ग्राहक कियाकडे वळत आहेत. 

परवडणारी किंमत 

कियाच्या सगळ्या कार जरी टेक्निकली अपडेट असल्या तरीही किंमत कमी ठेवण्यात आल्याचे वाहन उद्योगातील तज्ञ सांगतात. याच उदाहरण म्हणून पाहायला गेलं तर कियाने नुकतीच ७ सीटर Carens लॉन्च केली. या एमपीव्हीची एक्स शोरुम किंमत ९ लाख रुपये आहे. 

तसेच मागच्या महिन्यात ह्युंदाई कंपनीची ७ सीटर alcazer लॉन्च झाली. तिची एक्स शोरूम किंमत १६  लाख रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. या एका उदाहरणावरून लक्षात येईल की किया कंपनीने सर्वसामान्य लोकांना परवडणारी किंमत ठेवली आहे. त्यामुळे कार खरेदी करताना अनेक जण कियाचा विचार करतात.    

१९९८ पासून या कंपनीचा मालकी हक्क ही ह्युंदाई कंपनीकडे आहे. किया ही ह्युंदाईची सिस्टर कंपनी म्हणून ओळखली जाते. दोन्ही कंपन्या एकत्र केल्या तर जगातील तिसरी ऑटो कंपनी म्हणून ओळखली जाते. ह्युंदाई कंपनी गेली २० वर्ष भारताच्या ऑटो सेक्टर मध्ये आहे. त्यामुळे टार्गेट कुठल्या वर्गाला करायचं हे त्यांना फिक्स माहित होतं. कंपनीने भारतात आल्या आल्या तेच केलं. कमी किंमतीत टेक्निकली अपडेटेड गाड्या. 

डीलरशिपचे तगडे नेटवर्क 

कार बनवण्याबरोबर किया कंपनीकडे  भारतातील सर्वात मोठे आणि आधुनिक डीलरशिप नेटवर्क असल्याचे सांगितलं जातं. २०२० आणि २०२१ मध्ये सलग दोन वर्षे FADA ने आयोजित केलेल्या ‘डीलर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे’मध्येही कंपनी अव्वल ठरली आहे. गाडी विकत घेण्याची पूर्ण सिस्टीम डिजिटल आहे. 

तुम्ही नोंदणी केल्यानंतर कार दाखवण्यासाठी कंपनीचे कर्मचारी घरी, ऑफिसला येतात. तसेच गाडी सर्व्हिसिंग करायची असल्यास तुमच्या राहत्या ठिकाणावरून गाडी नेली जाते. त्याला ऍडव्हान्स पीकअप अँड ड्रॉप असे नाव दिले आहे. देशातील १६० शहरात २६५ टच पॉंईंट असून त्या माध्यमातून किया आपली सेवा देते. पुढच्या काही दिवसात टच पॉईंटची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.  

सुरक्षितता

मागच्या काही वर्षात देशभरात अक्सिडेंटचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गाडी घेताना सुरक्षिततेबद्दल विचार केला जातो. हायवे सेफ्टीसाठी विमा संस्था (IIHS) ने त्याच्या 2022 TOP SAFETY PICK (TSP) आणि TOP SAFETY PICK+ (TSP+) पुरस्कारांच्या यादीत सेलटॉस, सॉनेटचा नंबर आला. 

लोकांचं इंटरनेटशिवाय पान सुद्धा हलत नाही. अनेकांना प्रवासातही आपली कनेक्टिव्हिटी खंडित होऊ नये असे वाटते. २४ तास कियाची कार इंटरनेटशी कनेक्ट असते. ऍपल कारप्ले, वायरलेस चार्जिंग, सनरूफ, व्हॉईस कमांड, हिल असेंट असिस्ट, हेड्स-अप डिस्प्ले डझनभर गोष्टी कियानं दिल्या आहेत. 

 दक्षिण कोरिया बरोबर किया कंपनीने भारत आणि अमेरिकेत सुद्धा चांगला जम बसवला आहे.  

या कंपनीचं अजून एक विशेषण म्हणजे एकदा गाड्या विकल्यानंतर पुन्हा माघारी बोलावण्याचे प्रमाण खूप कमी आहे. माघारी बोलविण्यात पोर्श, मर्सिडीज बेंजनंतर कियाचा नंबर लागतो. यामुळे किया कंपनी गुणवत्तेच्या बाबतीत किती लक्ष देते हे यावरून लक्षात येते. 

अजून एक गोष्ट म्हणजे, किया फक्त कार, एसयुव्हीच बनवत नाही, तर दक्षिण कोरियाच्या संरक्षण दलासाठी वाहने सुद्धा तयार करते.

 हे ही वाच भिडू 

 

          

Leave A Reply

Your email address will not be published.