फोर्ड Vs फेरारी : तीन वर्षाच्या मेहनतीनंतर फोर्डने अपमानाचा बदला फेरारीकडून घेतलाच…..

‘सिंघम’ मधला जयकांत शिक्रे आपल्याला सांगून गेला होता की,

“कुछ भी करने का लेकिन जयकांत शिक्रे इगो नही हर्ट करने का”

हा डायलॉग चेष्टेत घेऊन आपण त्यावर हसलो पण जगात माणसाचा इगो दुखावल्यामुळे मोठे राडे झालेले आहेत. 

‘फोर्ड’ कंपनीचा मालक हेन्री फोर्ड II आणि ‘फेरारी’ चा मालक एन्झो फेरारी यांच्यात सुमारे १०-१२ वर्षे सुरु असेलला वाद, रेसकोर्स वर सुरु असलेली जीवघेणी स्पर्धा या सगळ्याची सुरवात इगो दुखावण्या वरूनच झाली होती.

हेन्री फोर्ड फक्त अमेरिकेतलाच नाही तर एकेकाळी जगातला मोठा उद्योगपती होता, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नावारूपाला आलेली त्याची फोर्ड मोटर कंपनी सर्वात यशस्वी कार कंपनी होती. फॅमिली साठी कन्फर्टेबल आणि तितकीच दणकट अशी फोर्ड ची गाडी आपल्याकडे असावी हे अमेरीकन लोकांचं स्वप्न फोर्ड पूर्ण करत होती.

१९६० च दशक आलं आणि परिस्थिती बदलत गेली. दुसऱ्या महायुद्धाचा फटका त्यानंतर आलेली जागतिक मंदी यातून अमेरिका सावरत होती, लोकांच्या हातात पैसा खेळायला लागला होता. माणसाकडे पैसा आला कि त्याच्या अपेक्षा पण वाढतात, याच वाढत्या अपेक्षा पूर्ण करायला आता फोर्ड कमी पडत होत.

अमेरिकन पालकांची आवडती फोर्ड कार त्यांच्या मुलांना पसंद पडेना, गाडीत कन्फर्ट पेक्षा हि मुले गाडीच्या स्पीड आणि लूक ला प्राधान्य देऊ लागली.

आपल्याकडे फॅमिली कार असावी यापेक्षा स्वतःची रेसकार घेणं आता स्वप्न बनलं.

याचा परिणाम फोर्ड कंपनीच्या विक्रीवर व्हायला लागला,१९६२ साली फोर्डने आपल्या विक्रीतली सर्वात मोठी मंदी अनुभवली. यावेळी फोर्ड कंपनीचा मालक होता हेन्री फोर्ड चा नातू हेन्री फोर्ड II. फोर्ड कंपनीची विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दल सहकाऱ्यांच्या सोबत चर्चा सुरु झाल्या आणि या चर्चेतूनच ठरलं की,

आता आपण स्पोर्ट्स कार बनवायच्या.

फोर्ड ने आजपर्यंत कधीच स्पोर्ट्स कार बनवली नव्हती, त्यासाठी लागणारे इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञान सध्या तरी त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. स्वतःची स्पोर्ट्स कार बनवण्यापेक्षा अशा गाड्या बनवणारी कंपनीचं विकत घेण्याचा निर्णय फोर्डने घेतला.

इटलीची फेरारी कंपनी त्याकाळी रेस कार बनवणारी प्रसिद्ध कंपनी होती,याचा मालक होता एन्झो फेरारी. फोर्डने फेरारी कंपनी विकत घेण्याचं ठरवलं आणि दोन्ही कंपनीत तशा चर्चा सुरु झाल्या.

१९६३ मध्ये बऱ्याच चर्चा आणि निगोशिएशन नंतर फोर्ड आणि फेरारी मधली डील नक्की झाली. नेमका आकडा माहित नसला तरी त्याकाळी फेरारी खरेदी करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करण्याची तयारी फोर्डने दाखवली होती. फेरारी च्या खरेदीनंतर स्पोर्ट्स कार विक्रीत जम बसवून पुन्हा एकदा फोर्ड कंपनी रुळावर आणू असं स्वप्न  हेन्री फोर्ड II बघत होता,

पण डील पूर्ण होण्याच्या आधीच अगदी शेवटच्या क्षणाला एन्झो फेरारीने कंपनी विकायला नकार दिला.

फोर्ड आणि फेरारी या व्यवहारात ज्या टर्म्स अँड कंडिशन ठरल्या होत्या त्यानुसार फेरारी कंपनीच्या रेस कार टीमची मालकी सुद्धा फोर्ड कडे जाणार होती जे एन्झो फेरारी ला मान्य झालं नाही त्यामुळेच त्याने हि डील अगदी शेवटच्या क्षणी मोडली.

एन्झो एवढ्यावरच थांबला नाही तर फोर्डच्या अधिकाऱ्यांना म्हणाला की,

‘खराब फॅक्टरी मध्ये,खराब गाड्या बनवणाऱ्या एका खराब कंपनीला मी माझी कंपनी विकणार नाही’.

आणि इथेच  हेन्री फोर्ड II चा इगो दुखावला गेला. एन्झो ने फोर्ड ला नकार दिला आणि लगेचच आपली कंपनी इटलीच्याच ‘फियाट’ ला विकून टाकली. असं म्हणतात की, एन्झो ला आपली कंपनी कधीच फोर्ड ला विकायची नव्हती, मार्केट मध्ये आपली नेगोशिएशन किंमत वाढवण्यासाठी त्याने फक्त फोर्डशी चर्चा केल्या आणि आपली किंमत वाढवून कंपनी फियाट ला विकून टाकली.

Screenshot 2020 08 31 at 11.01.21 AM

असं असेल तर एन्झो त्याच्या प्लॅनिंग मध्ये यशस्वीच झाला असच म्हणायला लागेल, खरं खोटं आता देवाला माहित. हेन्री फोर्ड II आपला झालेला अपमान विसरला नाही, एन्झो फेरारीला ज्या आपल्या रेस कार्स वरती जास्त अभिमान होता त्याच कार्स ना हरवून आपल्या अपमानाचा बदला घेण्याचं त्यानं ठरवलं.

फ्रान्स मधील ‘ल मान’ हि त्याकाळातील सर्वात प्रतिष्ठित कार रेस होती,सलग २४ तास हि स्पर्धा चालत असे.

पण ‘ल मान’ मध्ये फेरारीला हरवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. याआधी सलग तीनवेळा फेरारी कंपनीने हि स्पर्धा जिंकली होती. एवढी मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी गाडी सुद्धा तितकीच स्पेशल असं महत्वाचं होत, या गाडीत दोन गोष्टी असणं महत्वाचं होत एकतर स्पीड मध्ये चालणाऱ्या गाडीचे ब्रेक मजबूत पाहिजेत गाडी ट्रॅक वरून घसरली नाही पाहिजे आणि गाडी सलग २४ तास या प्रचंड स्पीड ने विना अडथळा पळत राहिली पाहिजे.

अशी गाडी तयार करण्याचं चॅलेंज फोर्ड ने अंगावर घेतलं, एक गाडी बनवण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करण्याची तयारी देखील केली.

‘ल मान’ साठी फोर्डने जी गाडी बनवायची ठरवलं तीच नाव होत GT 40,जी पुढे जाऊन अमेरिकेची सर्वात यशस्वी मसल कार बनली. फोर्ड्स ऍडव्हान्स्ड व्हेईकल ग्रुपने ही गाडी बनवायला सुरुवात केली, इंजिन मजबूत करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले पण अपेक्षेप्रमाणे यश आलं नाही. सुरुवातीच्या GT 40 बनवण्यात आल्या त्या गाडया खूप अन्स्टेबल होत्या, स्पीड मध्ये ब्रेक फेल होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त होत.

याचा परिणाम म्हणजे १९६४ आणि १९६५ सलग दोन वर्षे ‘ल मान’ स्पर्धेत भाग घेऊन फोर्ड ला अपयश आलं. १९६४ साली तर फोर्डच्या गाडीला हि स्पर्धा पूर्ण सुद्धा करता आली नाही तर दुसऱ्या बाजूला १९६४, ६५ या स्पर्धा फेरारीने जिंकून सलग ५ वेळा ‘ल मान’ जिंकण्याचा विक्रम केला होता.

पण फोर्डने आपली हिंमत हरली नाही, हि स्पर्धा जिंकेल अशी गाडी बनवण्याचं काम एका अनुभवी माणसाला देण्याचं फोर्डने ठरवलं ज्याचं नाव होत,

कॅरल शेलबी.

स्वतः कार डिझायनर असणारा कॅरल शेलबी हा एकमेव अमेरिकन ड्रॉयव्हर होता ज्याने ही प्रतिष्ठित ‘ल मान’ स्पर्धा जिंकली होती. फोर्डतर्फे आता स्पर्धा जिंकण्याची सगळी जबाबदारी शेलबीकडे देण्यात आली.

शेलबी यासाठी आपल्या मदतीला त्याचा दोस्त, कार इंजिनिअरिंग स्पेशालिस्ट, रेस कार टेस्टिंग ड्रायव्हर केन माईल्स ला बोलवून घेतलं.

आणि इथूनच सुरु झाला फोर्डच्या पहिल्या रेस जिंकणाऱ्या कार चा प्रवास

शेलबी आणि माईल्स दोघेही स्वतः डिझायनर होते पण ड्रायव्हर सुद्धा होते त्यामुळे गाडीत नेमके काय बदल केले पाहिजेत याचा अंदाज त्यांना होता. नवीन गाडी बनवण्या ऐवजी आहे त्याच GT 40 मध्ये बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

गाडी चालवायला सोपी जावी आणि रेस ट्रॅक वरती गाडी स्टेबल राहावी यासाठी एरोडायनॅमिक्स नुसार गाडीच्या शेप मध्ये बदल केले गेले. कोणतीही गाडी स्पीडमध्ये चालवताना गाडीवरून पास होणारी हवा कोणत्या प्रकारे पास होते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असतं. हे ठरवण्यासाठी शेलबी आणि माईल्स ने अत्यंत युनिक पद्धतीने GT 40 ची टेस्ट केली.

त्यांनी गाडीला बाहेरून सगळीकडे लोकरी धागे चिटकवले आणि रेस ट्रॅक वरती स्पीड ने गाडी चालावून त्या दोऱ्यांच्या निरीक्षणाने वाऱ्याची दिशा लक्षात घेतली आणि त्यानुसार गाडीच्या आकारात बदल केले ज्याचा फायदा फोर्ड ला रेस जिंकण्यासाठी झाला.

या गाडीचे ब्रेक 24तास टिकणारे असले पाहिजेत हे सुद्धा मोठं चॅलेंज होत यावर देखील अतिशय निराळा उपाय काढण्यात आला. फोर्ड कंपनीतला इंजिनियर फिल रेमिंग्टन याने अतिशय जलदगतीने बदलता येतील असे ब्रेक पॅड तयार केले, ज्यावेळी गाडीचा ड्रॉयव्हर बदलला जायचा त्याचवेळी काही सेकंदातच ब्रेक पॅड सुद्धा बदलता येण  शक्य झालं ज्यामुळे २४ तास ब्रेक टिकतील का नाही याची चिंता मिटली.

आता एकच सर्वात महत्वाचा बदल गाडीत करायचा बाकी होता तो म्हणजे इंजिन च पॉवर शिफ्टिंग. सलग २४ तास चालणाऱ्या या रेस मध्ये इंजिन योग्य वेळी जास्त पॉवर दिली पाहिजे यासाठी बदल करणे महत्वाचं होत. यासाठी माईल्स आणि शेलबी ने डायनॅमोमीटर वापरण्याचा निर्णय घेतला. डायनॅमोमीटर इंजिन ची पॉवर, स्पीड मोजणार डिव्हाईस आहे, ज्याच्या मदतीने इंजिन कोणत्या कंडिशन मध्ये आहे हे डायव्हर ला वेळोवेळी कळण्यास मदत झाली.

ही रेस जिंकण्यासाठी कुठे कुठे इंजिनला ला जास्त शक्ती लागते याचा अभ्यास करण्यात आला. पूर्ण रेसिंग ट्रॅक च व्हिडीओ शूटिंग करून ठराविक पॉईंट ठरवण्यात आले जिथे इंजिन ची संपूर्ण पॉवर वापरणं गरजेचं आहे तसेच स्पर्धा संपवताना फिनिश पॉईंट गाठण्यासाठी लागणारी पॉवर शिल्लक ठेवण्याचं गणित सुद्धा ड्रॉयव्हर ला गाडीत बसल्याच करता येईल.

इतका सगळा अभ्यास,प्रयोग आणि मेहनत करून माईल्स-शेलबी जोडीने फायनल प्रॉडक्ट बनवला ज्याला नाव दिल GT 40 MK,ज्या गाडीने हेन्री फोर्ड II चे फेरारीला हरवण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

Screenshot 2020 08 30 at 10.58.36 PM

१९६६ च्या ‘ल मान’ स्पर्धेत फोर्डने आपल्या तीन गाड्या उतरवून भाग घेतला यातली एक गाडी स्वतः केन माईल्स चालवत होता. १९६६ ची स्पर्धा फोर्ड ने फक्त जिंकलीच नाही तर पहिले तिन्ही नंबर फोर्डलाच मिळाले.

आपल्या रेस कार्स बद्दल प्रचंड अभिमान आणि गर्व असणाऱ्या एन्झो फेरारीच्या गाड्या त्यावर्षी स्पर्धा पूर्ण सुद्धा करू शकल्या नाहीत. तीन वर्षाच्या मेहनतीनंतर शेवटी फोर्डने आपल्या अपमानाचा बदला फेरारी कडून घेतलाच,ज्याचं मोठं श्रेय माईल्स-शेलबी या जोडीला जात.   

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.