प्रत्येक बारक्या पोराला वाटायचं, विकेट काढल्यावर सेलिब्रेशन करावं तर ब्रेट ली सारखंच

क्रिकेट खेळायला मैदानच लागतं असं काय नाय. चाळ, गल्ली, पार्किंग, घर अगदी कुठंपण क्रिकेटचा डाव सुरू होत असतोय. धड खेळता येणारी पोरं, बॅट, बॉल आणि स्टम्प हे एवढं मटरेल असलं तरी बास झालं. स्टम्प पण क्रिकेटसारखेच पाहिजे असले लाड नाहीत. टायरं, काठ्या, तीन दगडं, भिंतीवर विटकरीनं ओढलेल्या रेषा असं काहीपण चालून जातं.

बॅटिंग करायची असंल, तर सिक्स मारायचे नायतर आऊट व्हायचं. आणि बॉलिंग करायची असंल तर बॉल गपकन फिरवायचा, नायतर लय जोरात टाकायचा ब्रेट ली सारखा.

ते फास्ट अँड फ्युरियसमध्ये दाखवतात तसल्या गाड्या, बोल्ट भाऊ पळायचा तसली रेस, स्पीडचं येड यापेक्षा जास्त कशामुळं लागलं असंल तर ब्रेट लीच्या बॉलिंगमुळं.

गडी खेळायचा ऑस्ट्रेलियाकडनं. ऑस्ट्रेलियाची बॅटिंगच अशी होती की, यांनी २५० च्या खाली रन केले तर फाऊल धरायचा. त्यात मॅकग्रा, गिलेस्पी, वॉर्न आणि जोडीला ब्रेट ली ही बॉलिंग म्हणजे डोक्याला शॉट होता. मॅकग्रा लय जोरात टाकायचा नाही, पण त्याचा टप्पा आणि स्विंग मात्र बाप होता. गिलेस्पीच्या केसांसारखे त्याचे स्पेल पण लांबलचक असायचे. वॉर्न पायाच्या मागून बॉल काढणार की पुढून याचं टेन्शन असायचं. ब्रेट लीकडं मात्र बेक्कार स्पीड. बॅट खाली आणण्याआधीच स्टम्प उडालेले असायचे.

हॉलिवूड हिरोसारखा रंग आणि चेहरा, सोनेरी केसांचा मधोमध कोंबडा पाडलेला आणि चेहऱ्यावर आपणच किंग आहोत असं हसू. ब्रेट लीची ॲक्शन एकदम लयदार होती. काहीसा वाकून रनअप स्टार्ट व्हायचा, कोपरात वाकलेले दोन्ही हात तालात हलायचे मग अंपायरच्या शेजारी आल्यावर दणक्यात उडी. मग हातातून तोफगोळा सुटावा तसा बॉल सुटायचा.

त्याच्या स्पीडमुळं बॅटर्सची तारांबळ उडायचीच, पण नंतर बॅटिंगला येणारा कार्यकर्ताही जरा भीतभीतच यायचा याचं कारण म्हणजे त्याचं सेलिब्रेशन.

वरचा व्हिडीओच बघा. बॉल टाकलाय १६०.१ किलोमीटर प्रतितास वेगानं. त्यामुळं बॉल आला कधी, स्टम्प उडले कधी हे स्लो मोशनमध्येच जरा नीट दिसतं. आणि विकेटपेक्षा लक्षात राहतं ते सेलिब्रेशन. आपल्या हातांनी जमीन खोदल्यासारखी ॲक्शन असणाऱ्या त्या सेलिब्रेशनचं नाव होतं, बिग चेनसॉ सेलिब्रेशन.

या सेलिब्रेशन मागचं कारण काय होतं?

ब्रेट ली लहानपणापासून आपल्या वडलांना चेनसॉ मशीननं लाकूड कापताना बघत आला. ते त्याच्या डोक्यात चांगलंच कोरलं गेलं आणि विकेट पडल्यानंतर लाकडावर चेनसॉ फिरवावा तसं सेलिब्रेशन तो करू लागला.

सेलिब्रेशनची गोष्ट फक्त चेनसॉवरच थांबायची नाही. विकेट काढल्यावर उडी मारून दोन्ही पाय एकमेकांना धडकवायचे. कधी दोन्ही हात हवेत उंचवायचे, तर कधी गुडघा टेकवून ओरडायचं. तुम्हाला शपथेवर सांगतो भिडू लोक, फास्ट बॉलिंग आवडणाऱ्या प्रत्येक बारक्या पोरानं यातलं एकतरी सेलिब्रेशन हजार टक्के कॉपी केलं असणार.

ब्रेट ली म्हणलं की आणखी तीन गोष्टी आठवतात,

पहिली गोष्ट म्हणजे, २०११ च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या कपाळाला बॉल लागला. रक्त वैगरे येताना पाहून असं वाटलं की आता या मैदानावर थांबणार नाही. पण पट्टी बांधून का होईना गडी मैदानात उतरलाच.

दुसरी गोष्ट म्हणजे, उन्मुक्त चंदचा बोल्ड. २०१३ च्या आयपीएलचा पहिलाच बॉल. नवखा उन्मुक्त बॅटिंगला होता, ब्रेट लीनं त्याचा असला बेक्कार बोल्ड काढला की, तिथनं परत आत्मविश्वास मिळवणं उन्मुक्तला कठीण गेलं.

तिसरी गोष्ट म्हणजे, आक्रमकता. कितीही कसलेला बॅटर स्ट्राईकवर असेल तर ब्रेट ली त्याच्या डोळ्यांच्या समोरून बाऊन्सर काढणार. वर बॉल किपरकडं गेला की बॅटरच्या थेट डोळ्यांत बघणार. त्याचं स्लेजिंग म्हणजे फक्त नजर असायची, शब्दांचं काम बॉलिंगचा स्पीड करून जायचा.

मैदानाबाहेर त्यानं कमेंट्री केली, बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये काम करणार असल्याची घोषणाही झाली, आता उद्या तो बॉलिवूडमध्ये काम करायला लागला काय किंवा सरपंच झाला काय. लक्षात राहणार तो स्पीड आणि चेनसॉ सेलिब्रेशनच.

त्याचा वेग मॅच करणं कधी जमलं नाय, पण सेलिब्रेशन मात्र आजपण जमत असतंय, तेही डिट्टो!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.