सायमंड्स असा माणूस होता, की त्याच्यासारखं आयुष्य कुणीच जगू शकत नाही

माझी शाळेच्या क्रिकेट टीममध्ये निवड झालेली, तेव्हाची गोष्ट आहे. सिलेक्शन झालं, तेव्हा मी घरी हट्ट करुन ती ओठाला लावायची पांढरी क्रीम घेतलेली. कारण मला वाटायचं, ती क्रीम लाऊन आपण फिल्डिंगला उभे राहिलो की सायमंड्ससारखे दिसणार आणि निम्मी जनता आपल्या घाबरणार.

अँड्र्यू सायमंड्स माझा आदर्श नव्हता, मला त्याचा राग यायचा कारण तो भारी होता आणि मीच काय कुणीच त्याच्यासारखं बनू शकत नव्हतं. सायमंड्स गेल्याची बातमी आली तेव्हा सगळं बालपण डोळ्यांसमोरुन गेलं.

टीम ऑस्ट्रेलिया, पॉन्टिंगच्या नेतृत्वात ही टीम कमी आणि गुंडांची कंपनी जास्त वाटायची.

हेडन, गिलख्रिस्ट, पॉन्टिंग, मार्टिन, लँगर, क्लार्क असल्या शार्पशूटर्सची टॉप ऑर्डर. यातले दोन जण जरी खेळले की समोरच्या टीमची लायकी निघायची. कधीतरी यातल्या कुणाचाच दिवस नसायचा, आपण ऑस्ट्रेलियाला हरताना बघायला मिळेल अशा आशेनं टीव्हीसमोर बसायचो, मग मैदानात एक दैत यायचा.

याला बघून मनात पहिली भावना भीतीची यायची, राग वैगेरे सगळं नंतर. सुतळी सारखे बांधलेले केस. ओठांना चोपडलेली पांढरी क्रीम आणि समोरच्यावर दडपण टाकेल अशी तब्ब्येत. सायमंड्स खरंच दैत दिसायचा.

भीती वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे बॅटिंग. एकतर ऑस्ट्रेलियन प्लेअर त्यामुळं आपल्या फास्ट बॉलिंगचा आरामात कचरा व्हायचा. मग वाटायचं स्पिन नसतोय झेपत याला, पण स्पिनर्सला एकतर पुढं येऊन मारायचा, नायतर खडेखडे लांब ठेऊन द्यायचा.

बरं समोरच्या टीमला इतका हाणलाय, तर आनंद साजरा करेल असंही नाही. बॉलरच्या डोळ्यात असं बघायचा की त्याला स्वतःची लाज वाटावी. आता बास म्हणावं, तर बॉलिंगही टाकायचा आणि पार सगळ्या मूडचा बाजार उठवायचा.

झालं.. सगळी भडास काढून झाली. ही भडास तो भारी असल्यामुळं नाहीये, तर त्याची असूया वाटायची म्हणून आहे. इतके वर्ष झाली भारत क्रिकेट खेळतो, आपण जगाला सचिन दिला, द्रविड दिला, धोनी आणि कोहलीही. आपण पैसे आणि गुणवत्तेत सगळ्यांचे बाप बनलो, पण आपल्याकडे कधीच कुणी सायमंड्स बनू शकलं नाही. मग ते मैदानात असो किंवा मैदानाबाहेर.

सायमंड्स कसा होता?

तर त्याचा जन्म झाला इंग्लंडमध्ये. ओरिजिनल आई वडील स्वीडिश-डॅनिश आणि ऍफ्रो-कॅरेबियन. म्हणजे सायमंड्सकडं दोन पर्याय होते, एकतर इंग्लंडकडून खेळ, नायतर विंडीजकडून. पण त्याहीआधी मोठा स्ट्रगल होता जगण्याचा. असं म्हणतात, सायमंड्सचे खरे आईवडील तो लहान असतानाच वारले, मग त्याला केन आणि बार्बरा सायमंड्स या दाम्पत्यानं दत्तक घेतलं.

एका इंटरव्यूमध्ये सायमंड्सनं सांगितलेलं, ‘की माझी आई सांगते, तेव्हाच्या प्रोसेसनुसार मला क्लिनिकमधून आठवड्यासाठी दत्तक घेतलेलं. ट्रायल घ्यावी म्हणून. घरी आल्यावर मी खूप त्रास दिला, तरी आई-वडिलांनी क्लिनिकमध्ये सांगितलं की हा परफेक्ट आहे आणि मग मी त्यांचा मुलगा झालो.’

सायमंड्स काही महिन्यांचा असताना, त्याचं कुटुंब ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झालं. त्यामुळं सायमंड्सच्या रक्तात ऑस्ट्रेलियाची बंडखोर हवा भरली ती कायमचीच.

त्याच्या वडिलांना क्रिकेटचा लई शौक होता, ते लहानग्या अँड्र्यूसोबत रोज क्रिकेट खेळायचे. त्याला मॅचेसला घेऊन जायचे. याचं करिअर घडावं म्हणून त्यांनी ना आपल्या करिअरची पर्वा केली, ना किती अंतर गाडी चालवावी लागेल याची.

कौंटी क्रिकेटमधल्या पहिल्याच इनिंगमध्ये सायमंड्सनं २० छकडे मारले होते, इंग्लंड बोर्डानं लगेच ऑफर टाकली, आमच्याकडून खेळ. पण सायमंड्सचं गणित पक्कं होतं, खेळेन तर ऑस्ट्रेलियाकडूनच. डोक्यावर घालेन तर, बॅगी ग्रीनच.

सायमंड्स ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेट खेळला. पहिल्या टेस्टमध्ये शून्यावर आऊट झाला, पण त्यानं लाऊन धरलंच. एकदा ऑस्ट्रेलियन टीम मॅच जिंकली, सायमंड्स भारी खेळला होता. ड्रेसिंग रूममध्ये सगळे जण बिअर पित होते, तेव्हा सायमंड्सनं पॉन्टिंगकडून परवानगी घेत आपल्या वडिलांना ड्रेसिंग रुममध्ये बोलावलं.

एका इंटरव्ह्यूत तो सांगतो, ‘मी माझ्या आयुष्यात कुणालाच इतक्या स्पीडनं दोन बिअर पिताना पाहिलं नव्हतं. इतके माझे वडील खुश होते.’

मोठं घर, मोठी गाडी ही आईबापाची स्वप्न कुणीही पूर्ण करतं, पण आपल्या बापासोबत असा एखादा क्षण तेही ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रुममध्ये  शेअर करणं, सायमंड्सलाच जमलं.

खरंतर लिहिण्यासारखं बरंच आहे, म्हणजे त्याची २००३ च्या वर्ल्डकपमधली पाकिस्तान विरुद्धची इनिंग, २००७ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला दिलेला तडाखा, पण त्या लिहिण्यापेक्षा बघण्याच्या गोष्टी आहेत.

आणखी एक गोष्ट ठरवून बघा, ती म्हणजे सायमंड्सची फिल्डिंग. बुरुजावर शिलेदार उभा करावा तसा सायमंड्स फिल्डिंगला उभा राहायचा. त्यात पॉईंटला थांबला की बॅट्समन सोडा नॉनस्ट्राईकरचं अवसान गळायचं. याच्या तावडीतून फोर जाणं अवघड होतं, तिथं सिंगल चोरायचा विचार कोण करणार?

त्यात हा बॉलिंगमध्ये सीता और गीता होता, कारण याला स्पिन पण टाकता यायचा आणि मिडीयम पेसही. समोरच्या बॅट्समनला काय खेळता येत नाहीये? पिच कशाला साथ देईल? हे बघून भाऊचा पॅटर्न चेंज व्हायचा. 

ही एवढी गुणवत्ता ठासून भरली होती, तरी सायमंड्स लक्षात राहिला मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळं, राड्यांमुळं. हरभजनच्या ‘मंकी गेट’ प्रकरणात, चूक कुणाची होती हा विषय सोडून देऊ. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियावर इतका दबाव पडला की ज्याला सहानुभूती मिळायला पाहिजे, तोच सायमंड्स व्हिलन झाला.

क्रिकेटर्सचं आयुष्य साचेबद्ध असतं, म्हणजे उठा टीम मिटिंगला जा, प्रॅक्टिस करा,  फिटनेस करा, मॅच खेळा आणि शिस्त पाळा. या लफड्यात ते माणूस म्हणून किती जगतात हा मुद्दा बाजूला राहतो.

सायमंड्स मात्र माणूस म्हणून पुरेपूर जगला. टीम कारवाई करेल याची भीती बाळगली नाही आणि मिटिंग सोडून मासेमारीला गेला. पब्लिकमध्ये दारू पिणार नाही अशा कॉन्ट्रॅक्टवर सही करुनही बारमध्ये प्यायला बसला. मधूनच रग्बी लीगमध्ये खेळायची तयारी करू लागला, एक नाय हजार गोष्टी केल्या. त्या कुणाबद्दल राग होता, म्हणून नाही तर स्वतःला वाटल्या म्हणून.

९ ते ५, सोमवार ते शनिवार या चौकटी तोडून जगावं असं कित्येक जणांना वाटत होतं. पण आपण पुढचा विचार करत राहतो. सायमंड्स साला जगून मोकळा झाला.

ज्या भारतात त्याला शिव्या पडल्या, तिथल्या लोकांशी, खेळाडूंशी त्याची मैत्री होती. ज्या केसांमुळं त्याला ओळख मिळालेली, ते त्यानं चॅरिटीला दान केले. २६ टेस्ट, १९८ वनडे, ६ हजार रन्स, १५० विकेट्स, २ वर्ल्डकप, मॅचविनिंग इनिंग्स, थ्रो ही सगळी आकडेवारी झाली ओ. सायमंड्सचं मोजमाप त्याच्या जगण्यात होतं.

बरोबर वर्षभरापूर्वी सायमंड्स गेला… भीती संपली, असूया संपली… आठवणी आणि स्कोअरकार्ड उरलेत फक्त.

  • भिडू चिन्मय साळवी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.