गांधीवादी मुळशी पॅटर्न : “सेनापती बापट विरुद्ध टाटा”.

काही काळापूर्वी अख्या महाराष्ट्रात मुळशी पॅटर्नची चर्चा होती. या सिनेमामध्ये शहराच्या विकासासाठी गावखेड्यांचे दिले जाणारे बळी हा या सिनेमाचा विषय. हाच शहराचा विकास आणि शेतीची संस्कृती हा संघर्ष साधारण शंभर वर्षापूर्वीही मुळशीमध्ये उभा राहिला होता. जगातलं पहिलं धरणग्रस्तांच आंदोलन मुळशी मध्येच उभं राहिलं होत.

मात्र या मुळशी पॅटर्नचा इतिहास मात्र वेगळा होता.

वर्ष होत १९२०.

ब्रिटीशांच राज्य होत. मुंबई तेव्हाही भारताची आर्थिक राजधानी होती. मुंबईच्या विजेची भूक भागावी म्हणून मुळशीमध्ये मुळा नदीवर धरणाचा घाट घातला जात होता. याच कंत्राट टाटा कंपनीला मिळाल होतं. साधारण ५०० चौरस मैल क्षेत्राची जमीन पाण्याखाली जाणार होती. बुडणाऱ्या जमिनीत ५६ गावे, तिथली शेती याचा समावेश होता. जीवावर उठलेलं धरण थांबवण्यासाठी मुळशीकर एकत्र आले.

विनायकराव भुस्कुटे हे धरणग्र्स्तांचे नेते होते. गांधीजीची आंदोलनासाठी पाठींबा घ्यायला ते मुंबईला आले होते. हे फक्त एका कंपनीच्या विरुद्ध आंदोलन नसून हे अख्या ब्रिटीश सिस्टीमविरुद्ध आंदोलन आहे याची जाणीव गांधीजींना होती. त्यांनी आंदोलनकर्त्यांना अहिंसात्मक सत्याग्रहाचा सल्ला दिला. गांधीजीच्या पाठींब्यामुळे शेतकर्यांना हुरूप आला.

मुंबईमध्ये विनायकरावांची गाठ तात्या बापट यांच्याशी झाली.

तात्या बापट म्हणजे पांडूरंग महादेव बापट. एकेकाळी सावरकरांचे शिष्य. इंग्लंडला इंजिनियरिंग शिकायला म्हणून गेले आणि तिथून बॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकून आले. असे हे स्फोटक क्रांतिकारक तात्या बापट मावळच्या शेतकऱ्यासाठी गांधीवादी अहिंसात्मक सत्याग्रह करायला तयार झाले.

१६ एप्रिल १९२१ रामनवमीच्या दिवशी आंदोलनास सुरवात झाली. जगातलं पहिलं धरणाविरुद्ध आंदोलन सुरु झालं होत. फक्त शेतकरीच नव्हे तर चुलीपुढे राबणाऱ्या बायकासुद्धा या आंदोलनात सामील झाल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण महिला रस्त्यावर आंदोलनासाठी उतरल्या होत्या. पोलिसांनी दडपशाहीने हा सत्याग्रह चिरडण्याचा प्रयत्न केला.

अनेकांना मारहाण झाली. स्त्री आंदोलकांवर अत्याचार करण्यात आले. धाडसत्र सुरु झाले. पण सत्याग्रही बधले नाहीत.

बापटांनी ही अहिंसेची मर्यादा पाळली. गांधीजीच्याच मार्गाने आंदोलन चालू राहिले. तात्यानां अटक झाली. पहिल्यांदा चार महिन्यानी सुटका झाली. तिथून बाहेर आल्यावर ते परत मुळशीला गेले. गावोगावी हिंडून शेतकर्यांना घेऊन परत संघर्ष चालू केला. परत त्यांना अटक झाली. असे तीन वेळा घडले. बापटांनी माघार घेतली नाही. त्यांची एक घोषणा प्रसिद्ध होती.

“यह मुलशी रण मुल है महाराष्ट्र निद्रा भंग का

यह मुलशी रण मूल मानो भावी भारत के जंग का “

मुळशी सत्याग्रह तीन वर्षे चालले. रूढार्थाने हे आंदोलन यशस्वी झाले नाही पण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला या मुळशी सत्याग्रहाने दिशा दिली. जगभरातल्या धरनग्र्स्तांना लढण्याची वाट या आंदोलनाने दाखवली.

मुळशीकरांनी तात्या बापटांच्या चिकाटीला सलाम केला आणि त्यांना पदवी दिली

“सेनापती बापट”. 

पुढं आयुष्यभर सेनापती बापट गांधीवादीच राहिले. त्यांनी केलेला मुळशी सत्याग्रह जगभरात गाजला. चलेजाव पासून ते झाडू वाल्यांच्या सत्याग्रह या सगळ्याच नेतृत्व त्यांनी केलं. स्वातंत्र्यलढ्यानंतरही हैद्राबाद मुक्तीसंग्राम, गोवामुक्ती आंदोलन यात त्यांनी सहभाग घेतला. २८ नोव्हेंबर १९६७रोजी त्यांच निधन झालं.

ज्या टाटा प्लांटच्या विरोधात बापटांनी मुळशीमध्ये आंदोलन केलं त्याच टाटा कंपनीने त्यांचे स्मारक म्हणून सेनापती बापट स्तंभ उभारला आहे.

एकेकाळी बॉम्ब बनवणाऱ्या क्रांतिकारकाला गांधीवादी सत्याग्रहाचा सेनापती करणारा हा खरा मुळशी पॅटर्न.

असमतोल विकासाच्या खाली भरडला गेलेला तरुण गुन्हेगारी, गँगवाॅर मध्ये गुरफटला आहे.  त्याला सेनापती बापटांच्या, मावळच्या शेतकऱ्यांच्या बलिदानाच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठीचा हा प्रयत्न.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.