नागपूर विधानपरिषद बिनविरोध होऊ न देणारे छोटू भोयर कोण आहेत ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्मभूमीतल्या छोटू भोयर या माजी संघ स्वयंसेवकांच नाव सध्या चर्चेत आहे.

विषय आहे विधानपरिषदेचा

तर राज्यातल्या सहापैकी चार विधानपरिषदा नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघात होणार्‍या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे छोटू भोयर असा हायव्होल्टेज सामना बघायला मिळणार आहे.

हे भोयर विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर हल्ली हल्लीच काँग्रेसवासी झाले असले तरी त्यांची राजकिय कारकीर्द भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंपेक्षा मोठीय असं नागपुरातले लोक सांगतात. म्हणून एक नजर त्यांच्या कारकिर्दीवर…

तर छोटू भोयर हे संघाच्या मुशीतले कार्यकर्ते. नागपूरच्या रेशीम बागचा आणि त्यांचा अगदिच जवळचा संबंध. नितीन गडकरींचे अगदीच खास अशी छोटू भोयर यांची ओळख.

भोयर यांच्या आई ताराबाई या १९९२ साली रेशीमबाग येथून नगरसेवक होत्या. त्यांचे वडील प्रभाकरराव हे सुरुवातीपासून संघात होते. संघावर बंदी व आणिबाणीच्या काळात ते कारागृहात होते.

ते संघाचे प्रचारक राहिले असून त्यांनी निजामाच्या राज्यात प्रचारक म्हणून काम केले. भोयर यांच्या आई ताराबाई भोयर यांनीही सुरुवातीपासून संघाशी संलग्न संस्थात काम केलय. भाजपच्या स्थापनेपूर्वी जनसंघात ताराबाई यांनी काम केले होते. भाजपची निर्मिती झाल्यानंतर संघाचे कार्यालय असलेल्या रेशीमबाग भागातून ताराबाई भोयर या नगरसेवीका राहिल्या.

छोटू भोयर यांनी १९८६ पासून भाजपा युवा मोर्च्याचे सदस्य झाले. त्यानंतर १९८८ मध्ये अध्यक्ष झाले. त्यानंतर महामंत्री झाले. १९९७ मध्ये ते नागपूर महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. छोटू भोयर हे गेल्या ३४ वर्षांपासून भाजपमध्ये आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रेशीमबाग कार्यालय असलेल्या भागातून ते नगरसेवक झाले हे विशेष. २००१ मध्ये ते उपमहापौर झाले. २००३ ते २००७ या काळात भाजपचे जिल्हा सचिव म्हणून पक्षाचे काम पाहिले. २००९ पासून २०१३ पर्यंत सरचिटणीस राहिले आहे. २०१२ मध्ये पुन्हा नगरसेवक झाले.

२०१२ ते २०१७ कालखंडात ते एनआयटीचे ट्रस्टी राहिले आहे. २०१७ मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून चौथ्यांदा निवडणून आले. आता त्यांची कमान तर चढती होती पण भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटलं. २०१९ मध्ये दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी दावा केला होता. पण निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यापासून त्यांच्यात असंतोष खदखदत होता.

पुढं विधान परिषदेच बिगुल वाजलं. पण तेव्हाही उमेदवारी मिळाली नाही. म्हणून मग भोयर यांनी काँग्रेसची वाट धरली. मग त्यांनी स्वतःच्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ते म्हंटले,

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान होत नाही. भाजपच्या निवडणूक राजकारणात नेहमीच डावलण्यात आले. संघाचा स्वयंसेवक असलो, तरी कोणत्याही पक्षाचे विचार चुकीचे नसतात. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान करणे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचे काम आहे. भाजपमधून राजकारण सुरू केले तरी आता अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहीन. महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. शंभरी पार करून सर्व मिळून काँग्रेसची सत्ता आणू.

आता छोटू भोयर हे इतके मोठे नेते असल्याचं म्हंटल जातंय, ते गडकरींच्या जवळचे असल्याचं म्हंटल जातंय, ते संघाचे ही कट्टर कार्यकर्ते असल्याचं म्हंटल जातंय, मग हा रडीचा डाव का ?

याबद्दल आम्ही नागपुरातल्या एका वरिष्ठ राजकिय पत्रकारांशी संपर्क साधला असता ते म्हंटले,

मुळात राज्यभरात ज्या पद्धतीने ही निवडणूक रंगवून सांगितली जातं आहे, तसा काही विषयच नागपूर मध्ये नाही. छोटू भोयर हे बावनकुळेंच्या तुलनेत तेवढे तुल्यबळ उमेदवार नाहीत. सध्याच्या विधानपरिषदेचा विचार करता भाजपकडे अंदाजे अधिकच्या ६० जागांची गोळाबेरीज आहे.

भोयर नितीन गडकरींच्या जवळचे आहेत मग त्यांना उमेदवारी का नाही या प्रश्नवर ते म्हंटले,

भोयर त्यांच्या जवळचे होते मात्र काही घडामोडी बघता भोयरचं गडकरींवर नाराज असल्याचं चित्र आहे. २०१२ ते २०१७ कालखंडात भोयर हे एनआयटीचे ट्रस्टी राहिले आहेत. खरं तर पदाचा कालावधी असतो पाच वर्षांचा. पण गडकरींनी भोयर यांना राजीनामा द्यायला लावला. २०१९ मध्ये जेव्हा भोयर यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली तेव्हा सुद्धा गडकरींनीच त्यांना ती नाकारली. त्यामुळे हे नाराजीसत्र होत. त्याउलट बावनकुळे गडकरींच्या जवळचे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही.

निवडणूक अगदीच हायव्होल्टेज असेल का ? याप्रश्नी ते म्हणाले,

बाहेर जसं हायव्होल्टेज चित्र उभं केलं जातंय तसं चित्र आम्हा नागपूरकरांना अजून तरी दिसलेलं नाही.

त्यामुळे आता आपल्याकडे निकालाची वाट पाहणं इतकंच आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.