झालेला तो अपमान माणिकरावांनी तितक्याच सहजतेने स्वीकारला व त्याला माफ केलं…

खादीचा पायजमा, सदरा, कोट आणि डोक्यावर गांधी टोपी… जे वाजपेयींनी शक्य झालं तेच गावितांना शक्य झालं. वाजपेयी दहा वेळा लोकसभेला निवडून आले होते, पण त्यांच्या विजयात खंड पडला होता.

पण माणिकराव गावित सलग नऊ वेळा एकाच पक्षातून निवडून गेले. वाजपेयी जनसंघ, भाजप अशा पक्षातून निवडून आले पण गावित हे फक्त कॉंग्रेस (आय) या पक्षातून हाताच्या चिन्हावर निवडून येत गेले. ते सलग निवडून आले. 

आज सकाळी माजी केंद्रिय मंत्री, जेष्ठ नेते माणिकराव गावित यांच निधन झालं…

माणिकराव गावित नेमके कसे होते, तर एखाद्याने गाडीला हात केला तर सहज गाडी थांबवायचे. लोकांसोबत बोलायचे. त्यामुळेच तर ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास लोकसभेपर्यन्त गेला. लोकांनी त्यांना सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून दिलं. त्यांच्याकडे असणाऱ्या मंत्रिपदाच्या काळाचा एक साधा प्रसंग व मंत्रीपद गेल्यानंतरचा तिथेच घडलेला प्रसंग माणिकराव कसे होते हे सांगण्यासाठी पुरेसा आहे.. 

झालेलं अस की मनमोहन सिंग यांच्या दूसऱ्या टर्ममध्ये माणिकराव गावित यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. केंद्रिय मंत्री झाल्यानंतर प्रोटोकॉल आले. जाईल तिथं मंत्र्यांची बडदास्त ठेवली जावू लागली.  

याच काळात राज्याचे शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनी यवतमाळ येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं. या प्रदर्शनाच्या उद्धाटनासाठी त्यांनी माणिकराव गावित यांना बोलवायचं ठरवलं. माणिकराव देखील अगदी वेळ काढून प्रदर्शनाच्या उद्धाटनासाठी आले. ते मुक्कामासाठी यवतमाळच्या विश्रामगृहात थांबले. केंद्रिय मंत्री असल्याने मोठ्ठी बडदास्त होती. काही काळानंतर मात्र त्यांच मंत्रिपद गेलं..

आत्ता माणिकराव फक्त खासदार राहिले होते.. 

त्यानंतर सुनिल आणि नितीन सरदार यांनी यवतमाळमध्ये दूसरा एक कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी त्यांनी माणिकरावांना बोलवलं.. 

माणिकराव पुन्हा यवतमाळच्याच विश्रामगृहात थांबले. यावेळी मात्र ते मंत्री नव्हते. साहजिक सरकारी पाहुणचाराचा फरक त्यांच्या लक्षात आला. पण त्याहून वाईट गोष्ट होती विश्रामगृहावर त्यांना देण्यात येत असलेली ट्रिटमेंट.. 

झालेलं अस की माणिकराव ज्या विश्रामगृहाच्या खोली नंबर 2 मध्ये थांबले होते तिथे ना एक साबण होता ना टॉवेल… 

माणिकरावांनी कर्मचाऱ्यांकडे साबण आणि टॉवेलची मागणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं..

पण कितीही झालं तरी माणिकराव गावित खासदार होते. एका क्षणात फोन फिरवून प्रशासनाला ते धाब्यावर धरू शकत होते. पण त्यांनी तस केलं नाही. तितक्याचं नम्रतेने ते कर्मचाऱ्याला म्हणाले, 

अरे बाबा.. मान्य आहे आत्ता मी मंत्री नाही पण खासदार तरी आहे ना.. एका खासदाराला तुम्ही टॉवेल आणि साबण देवू शकत नाही का.. 

विश्रामगृहात घडलेला हा प्रसंग तत्कालीन जिल्हाधिकारी संजय देशमुख यांच्या कानावर गेला. त्यांनी तात्काळ वसंता नावाच्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं.. 

पण हा प्रसंग इथेच संपला नाही.. 

माणिकराव पुन्हा नंदुरबारला आल्यानंतर त्यांना कुठूनतरी माहिती मिळाली की जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. माणिकरावांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्या कर्मचाऱ्याला निलंबित करू नये अशी विनंती केली.. 

चूका होत असतात पण त्या माफ करायच्या असतात अस माणिकरावांनी सांगितलं होतं… 

आपल्या पदाचा गर्व न बाळकता, आपल्या हातात असणाऱ्या अधिकारांचा गैरवापर न करता साध्या कर्मचाऱ्यांने केलेल्या अपमान देखील सहज स्विकारणारे माणिकराव गावित होते.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.