लोकांनी त्यांचा विकासपुरुष म्हणून गौरव केला अन त्यांनी लोकांची नसबंदी केली…!!!

चौधरी बन्सीलाल. हरयाणातील भिवानी येथे जन्मलेला हा माणूस आधुनिक हरयाणाचा निर्माता मानला जातो. हरयाणाची देशातील आजची जी काही बरी-वाईट परिस्थिती आहे, त्याची पायाभरणी याच माणसाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली होती. एक कुशल प्रशासक म्हणून हरयाणाच्या राजकीय पटलावर चौधरी बन्सीलाल यांचं नांव घेतलं जातं असे.

१९६८ साली चौधरी बन्सीलाल हरयाणाच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि हरयाणाने कात टाकायला सुरुवात केली. ‘वीज-पाणी-रस्ते’ ही त्रिसूत्री घेऊन त्यांनी काम काम करायला सुरुवात केली आणि हरयाणाला अल्पावधीतच राज्यातील सर्व खेड्यात वीजपुरवठा करणारं देशातील पहिलं राज्य बनवलं. सिंचनाच्या क्षेत्रात मोठं काम केलं आणि राज्यातील बहुतांश खेड्यांना मोठ्या शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांचं जाळ राज्यभर विणलं . १९६८ ते १९७५ या काळात ते हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते. त्यानंतर देखील २ वेळा ते हरयाणाचे मुख्यमंत्री झाले.

cb
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल

हरयाणाचे विकासाभिमुख मुख्यमंत्री आणि कुशल प्रशासक म्हणून बन्सीलाल ओळखले जातात. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक नकारात्मक ओळख देखील आहे. संजय गांधी यांची मर्जी संपादन करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणारा माणूस ही देखील त्यांची एक ओळख होती. तो काळच असा होता की संजय गांधींच्या जवळ जाण्यासाठी काँग्रेस नेते हुजरेगीरीच्या कुठल्याही पातळीवर जाऊ शकत होते. अर्थात याला अनेक सन्मानीय अपवाद देखील होते.

बन्सीलाल हे संजय गांधी यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जात असत. पण संजय गांधींच्या जवळच्या वर्तुळात काही ते असेच सामील झाले नव्हते. तिथे स्थान मिळविण्यासाठी त्यांनी अनेक पापड बेलले होते. हरयाणाचे मुख्यमंत्री असताना संजय गांधी यांना मारुती गाडीच्या निर्मितीसाठी त्यांनी कितीतरी एकर जमीन अशीच देऊन टाकली होती. सगळे कायदे-कानून त्यावेळी त्यांनी फाट्यावर मारले होते आणि इंदिरा गांधींच्या लाडक्या मुलाची मर्जी संपादन केली होती.

१९७५ साली इंदिरा गांधींनी ज्यावेळी देशात आणीबाणी लादली त्यावेळी सत्तेची सारी सूत्रे संजय गांधी यांच्या हातात आली होती. संजय गांधी यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी ५ सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली होती. प्रौढ शिक्षण, हुंडाबंदी, जातीप्रथेच उच्चाटन, हुंडाबंदी आणि कुटुंब नियोजन हा तो ५ कलमी कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील कुटुंब नियोजनचं लक्ष साध्य करण्यासाठी लोकांची बळजबरीने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येत होती. आपल्याच राज्यात कशा मोठ्या प्रमाणात नसबंदीच्या शस्त्रक्रिया झाल्या याचे आकडे देऊन काँग्रेस नेते संजय गांधींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असत. बन्सीलाल यांनी तर त्यात आघाडी मिळवली होती.

त्या काळात हरयाणातील गावागावात जाऊन पोलीस लोकांच्या घरात घुसून त्यांना नसबंदीसाठी पकडून नेत असत. तरुणापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत कुणाच्याही वयाचा विचार न करता सरधोपटपणे या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बन्सीलाल यांच्याच सांगण्यावरून पोलीस हे करत असत, असा त्यांच्यावर आरोप झाला. या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. १९७७ साली ज्यावेळी आणीबाणी उठविण्यात आली त्यानंतर हरयाणात निवडणुका झाल्या. लोकांमध्ये रोष होताच. लोकांच्या या रोषाचा सामना देशातील इतर राज्यांप्रमाणेच हरयाणात देखील काँग्रेसला आणि बन्सीलाल यांना करावा लागला. बन्सीलाल यांचा मोठा पराभव झाला. या निवडणुकांमध्ये लोकांनी ठरवून बन्सीलाल यांचा पराभव केला. ‘इंडिया टुडे’नुसार त्या काळात निवडणुकीत एक गीत वापरण्यात आलं होतं, त्या गीताचे बोल होते-

हमने भजन भगाया रे, ओ बन्सीलाल

देंगे तुझको भी निकाल सून, ओ बन्सीलाल

भुले नही लोग इमर्जन्सी मे, क्या क्या काम किये बन्सी ने

तुने सबपे छुरा चालाया रे, ओ बन्सीलाल

किये बुद्ढे भी हलाल तुने, ओ बन्सीलाल

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.