सचिनची शिकवणी घेणारा ‘मास्तर’ गेला !

 

इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवणं ही किती मोठी गोष्ट आहे, हे आपल्याला भारतीय संघाच्या सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावरून लक्षात यावं. पण ही किमया अजित वाडेकरांनी घडवून आणली होती. त्यामुळेच आपल्याला अजित वाडेकर हे परदेशी भूमीवर भारतीय संघाला विजयाची सवय लावणारे कर्णधार म्हणूनच लक्षात राहतात.

खेळाडू म्हणून तर अजित वाडेकर महान होतेच पण याव्यतिरिक्त कोच प्रशिक्षक म्हणून देखील अजित वाडेकरांनी ९० च्या दशकात भारतीय संघाला घडवलं. शिस्तप्रिय प्रशिक्षक अशी त्यांची प्रतिमा होती. सचिन तेंडूलकरच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात सचिनला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. सचिनला ओपनिंगला पाठविण्याचा निर्णय त्यांचाच होता, ज्यानंतर सचिनने कधीच मागे वळून बघितलं नाही.

ajit wadekar

१९९४ सालचा एक किस्सा आहे.

२० फेब्रुवारी १९९४.

जालंधरमधील बर्लटन पार्क स्टेडीयम. भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान सामना सुरु होता. श्रीलंकेचा कर्णधार अर्जुना रणतुंगा याने टॉस  जिंकून भारताला बॅटिंग करायला सांगितलं होतं. अजय जडेजा आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी चांगली सुरुवात दिली होती परंतु त्यानंतर प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी आउट झाल्यानंतर भारतीय संघ परत अडचणीत आला होता.

सचिन तेंडूलकर बॅटिंगसाठी आला. तो लयीत दिसत होता. त्याने फिफ्टी मारली आणि संघाचा डाव सावरला. पण रनरेट वाढवण्याच्या नादात एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो रनआउट झाला. वाडेकर त्यावेळी संघाचे प्रशिक्षक होते.

शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेले वाडेकर गुरुजी स्वभावाने अतिशय शांत होते. त्यांच्या एकूण कारकिर्दीत ते कधी कुणावर चिडल्याचे अथवा रागावल्याचे आपल्याला आठवत नाही असं सुनील गावस्कर यांनी वाडेकर यांच्याविषयी म्हणून ठेवलंय.

यावेळी मात्र पॅव्हेलिअनमध्ये परतलेल्या सचिनवर वाडेकर चिडले होते. सचिनचं रनआउट होणं त्यांना अजिबात आवडलेलं नव्हतं. त्यांनी सचिनकडे एक रागाचा कटाक्ष टाकला आणि त्यानंतर ते निघून गेले. यातून सचिन काय समजायचा ते समजून गेला.

सचिनच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की एवढ्या दीर्घ कारकिर्दीत आपल्या समकालीन खेळाडूंच्या तुलनेत सचिन खूपच कमी वेळा रनआउट झालेला आहे. त्याचं कारण बहुधा याच प्रसंगात दडलेलं असावं.

ajit wadekar 3

या रनआउटने नक्की असं काय झालं होतं की शांत स्वभावाचे वाडेकर चिडले होते..? या प्रश्नाचं उत्तर भूतकाळातल्या एका घटनेत सापडतं. १९७१ सालच्या इंग्लंड दौऱ्यातील ओवल कसोटीत भारतीय संघाने वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडमध्ये आपला पहिला-वाहिला कसोटी सामना जिंकला होता.

भारताच्या या विजयात दिलीप सरदेसाई आणि वाडेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. मात्र या सामन्यात दोघांमधील समन्वयाच्या अभावामुळे वाडेकर रनआउट झाले होते. या रनआउटमध्ये नेमकी कुणाची चूक होती हा किस्सा बराच चर्चिला गेला होता. त्यामुळे कुठल्याही फलंदाजाने ‘रनआउट’ होणं वाडेकारांना अजिबात आवडायचा नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.