धोनीनं चेन्नईची कॅप्टन्सी सोडण्याची कारणं वाचून, त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढतोय….

पुढच्या दोन दिवसात आयपीएल सुरू होईल. सकाळीच तिकीटाची काय सेटिंग होतीये का? हे विचारायला तीन जणांचे फोन येऊन गेले. मग असंच इकडच्या तिकडच्या गप्पा हाणताना, एक जण म्हणला… कोहली कॅप्टन नाय, श्रेयस अय्यर कोलकात्याकडे गेला, एवढ्या वर्षात सगळ्या टीमचे कॅप्टन बदलले… धोनी तेवढा कायम राहिलाय.

हे बोलणं संपून काही तासच झाले आणि बातमी आली, की धोनीनं चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टन्सी सोडली. स्टम्प्सच्या मागं उभं राहून सगळी दुनिया बदलणारा धोनी आता कॅप्टन म्हणून दिसणार नाही.

गेल्यावर्षीची आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व आता भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा करेल. पण धोनीनं अशी अचानक कॅप्टन्सी सोडण्यामागची कारणं जाणून घेऊ.

तुम्हाला आठवतं, धोनीनं भारताच्या कसोटी संघाची कॅप्टन्सी कशी सोडली? ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका सुरू असतानाच धोनीनं कॅप्टन्सीचा बॅटन विराट कोहलीकडे सोपवला होता. वनडे क्रिकेटमध्येही त्यानं अशीच अचानक कॅप्टन्सी सोडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीला कधीच कुणी कॅप्टन्सीवरुन काढलं नाही, किंवा हा गेला पाहिजे राव असं कधी वाटलंही नाही.

ज्या प्रकारे धोनीनं इंस्टाग्रामवर पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तसाच काहीसा धक्का तो आयपीएलमध्येही देईल असं कित्येक जणांना वाटत होतं. मात्र सध्या फक्त कॅप्टन्सीवरच निभावलंय.

इथंही त्याला कुणीच सोड म्हणलं नाही आणि कुणालाच तो जावा असं वाटत नव्हतं… पण धोनीनं अनपेक्षितपणे कॅप्टन्सी सोडण्याची परंपरा कायम ठेवली.

वय झालं राव…

सध्या धोनीला खेळताना, धावताना पाहिल्यावर एक गोष्ट जाणवायची, की धोनीचं वय झालं राव. हाच वय फॅक्टर कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयात महत्त्वाचा आहे. धोनीचं सध्याचं वय आहे ४१. साहजिकच कितीही नाही म्हणलं, तरी धोनी आता थकलाय. त्याच्या किपींगमधली चपळता, कॅप्टन्सीमधली तल्लखता अजिबात कमी झाली नसली, तरी बॅटिंगमधली दहशत थोडी कमी झालीये. त्यामुळं खांद्यावर कॅप्टन्सीचं ओझं नसल्यावर धोनी बॅटिंगवर जास्त फोकस करु शकतो.

सीएसकेचं पुढचं व्हर्जन

कुठल्याही टीमचं नेतृत्व बदलताना ट्रान्झिशन पिरेड फार महत्त्वाचा असतो. म्हणजे नव्या कॅप्टनला टीम हाताळायला सोपं जातं, त्याच्या मदतीला जुना कॅप्टनही असतो. आता धोनीचा हा निर्णय आपल्यासाठी अचानक भयानक असला, तरी चेन्नई, धोनी आणि जडेजा यांचा याबाबतचा विचार आधीपासूनच सुरू होता. गेल्यावर्षीच्या आयपीएल दरम्यानच जडेजाला याबद्दल सांगण्यात आलं होतं. आपल्यानंतर चेन्नईचं नेतृत्व करण्यासाठी धोनीनंच जडेजाचं नाव सुचवलं होतं.

चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या माहितीनुसार, “धोनीला लीडरशिपमधला बदल सहज व्हावा असं वाटत होतं. त्याच्या डोक्यात कॅप्टन्सी सोडायचा विचार सुरू होताच. त्यानं फक्त योग्य वेळेला टीमचा बॅटन जडेजाकडे सोपवलाय.”

धोनीनं शांतीत क्रांती करत चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याचं चेन्नई सुपर किंग्स सोबत असलेलं आर्थिक आणि भावनिक नातं. 

सीएसकेची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्स कंपनीचा धोनी वाईस प्रेसिडेंट आहे. त्यातच २००८ पासून तो सीएसकेचा कॅप्टन आहे आणि सीएसकेची मार्केटमधली ओळखही. त्यामुळं अचानक गायब न होता, आधी कॅप्टन्सी सोपवून, टीमच्या भविष्याच्या बांधणीच्या दृष्टीनं विचार करून धोनीनं हा निर्णय घेतलाय एवढं नक्की.

२०२० च्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा असं झालं, की चेन्नई सुपर किंग्स आयपीएल खेळली पण प्लेऑफ्समध्ये स्थान मिळवू शकली नाही. इरेला पेटलेल्या धोनीसेनेनं २०२१ मध्ये मात्र थेट ट्रॉफीच उंचावली. २०१८ मध्ये डॅडीज आर्मी म्हणून हिणवल्यानंतर सीएसकेनं ट्रॉफी मारली होती, २०२१ मध्ये त्याचीच पुनरावृत्ती झाली.

सीएसकेचं प्रचंड कौतुक झालं आणि त्याच गुडनोटवर कॅप्टन्सी सोडण्याचा मास्टरस्ट्रोक धोनीनं खेळलाय.

आता प्रश्न पडतो, की जडेजाच का?

भिडू सध्या जडेजा कसल्या बाप फॉर्ममध्ये आहे. त्याचा फिटनेस, त्याचा गेम अगदी प्राईममध्ये आहे. त्यामुळं अशावेळी कॅप्टन्सीचा बॅटन सरकवण्यासाठी जडेजा नक्कीच परफेक्ट पर्याय ठरतो. संघाची बांधणी करताना चेन्नईनं बऱ्याच जुन्या खेळाडूंना संघात कायम ठेवलंय, त्यामुळं जडेजावर फारसा ताण नसेलच, त्यात साथीला धोनी आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये हवा करणारा जड्डू आता चौथ्या डिपार्टमेंटमध्ये काय करतो हे पाहावं लागेल.

सगळ्या गोष्टी बोलून झाल्या, पण भिडू एक गोष्ट लक्षात आली का?

आता पुन्हा कधीच धोनी टॉससाठी येणार नाही, टीम हडलमध्ये कडकवालं भाषण देणार नाही, त्याचा तो शांततेतला रुबाब, कितीही प्रेशर असलं तरी डोक्यावरचा बर्फ… यातलं काहीच दिसणार नाही. आपल्यातल्या कित्येकांना जसं क्रिकेट कळायला लागलं, तसा धोनी टीम इंडियाचा किंवा मग चेन्नईचा कॅप्टन आहेच. आता तो कॅप्टन नसल्याची सवय करुन घ्यावी लागेल. ही त्याची शेवटची आयपीएल असेल का? हे माहीत नाही.

पण समजा चेन्नईनं यावर्षी ट्रॉफी जिंकलीच, तरी ती घ्यायला धोनी जाणार नाही. टीम फोटोमध्ये तो आपला एका कोपऱ्यात, कुठल्यातरी यंगस्टरच्या खांद्यावर हात ठेऊन उभा असेल आणि कधीतरी त्या फोटोमधूनही असाच अचानक गायब होईल…

चेहऱ्यावर हसू आणि डोक्यावर बर्फ ठेऊन…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.