फक्त चार वर्ष खेळलेला भारताचा स्पिनर, माल्कम मार्शल आणि व्हिव रिचर्ड्सचा बेस्ट फ्रेंड होता

भारतीय क्रिकेटसाठी २०२१ हे वर्ष खास गेलं. सोशल मीडियावर आलेले टीममधले राडे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी२० वर्ल्डकपमधले पराभव सोडले, तर भारतानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात, इंग्लंडला इंग्लंडमध्ये आणि आफ्रिकेला आफ्रिकेत हरवून भारतानं धडाका केला. आता या विजयाचं सगळ्यात जास्त श्रेय कुणाला जातं, तर फास्ट बॉलर्सला. भारताचा पेस अटॅक एवढा डेंजर आहे, की आपण ऑस्ट्रेलियाच्या नाकातही दम करुन आलोय.

पण हे काय नेहमीचं चित्र नाही. कित्येक वर्ष भारतीय टीमची मान, पाय, कणा सगळं काही स्पिनर्सच होते. आता इंडियाच्या भारी स्पिनर्सची यादी काढायची झाली, तर ती लय मोठी होईल. बिशनसिंग बेदीपासून, कुंबळे, कार्तिक, भज्जी, आश्विन, चहल आणि यादी सुरू आहेच. पण या सगळ्यात आणखी एक खेळाडू होता… जो फार वर्ष खेळला नाही, पण खेळला तेव्हा भावानं नाद केला.

तो म्हणजे… लक्ष्मण शिवरामक्रिष्णन उर्फ शिवा.

भारताची प्रसिद्ध स्पिन चौकडी आता थकली होती. साहजिकच संघात नव्या दमाचे स्पिनर्स येणार हे नक्की होतं. तेव्हा काय आयपीएल नव्हती, त्यामुळं भारतीय संघात येण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे रणजी ट्रॉफी. वयाच्या १६ व्या वर्षी शिवानं दिल्लीविरुद्ध तमिळनाडू संघाकडून पदार्पण केलं. पहिल्याच मॅचमध्ये त्यानं २८ रन्सच्या बदल्यात सात विकेट्स घेतल्या. तेव्हाच सगळ्यांना कळून चुकलं होतं की चेन्नईचं हे पोरगं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धिंगाणा घालणार.

पुढच्याच वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात त्याची निवड झाली, पण खेळायचा चान्स मिळाला तो वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात. पुढं इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला, मुंबईमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये त्यानं एकूण १२ विकेट्स काढल्या. त्या सिरीजमध्ये २३ विकेट्स घेत गडी मॅन ऑफ द सिरीजही झाला.

टेस्टमधल्या कामगिरीमुळं त्याची भारताच्या वनडे संघात निवड झाली. ८३ चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर १९८५ मध्ये भारतापुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, ते म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट. भारत फायनलमध्ये गेला आणि समोर होता पाकिस्तानचा संघ. शिवानं जावेद मियाँदाद, सलीम मलिक आणि किपर अनिल दलपट अशा तीन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या आणि पाकिस्तानला १७६ रन्सवर रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

तेव्हा त्याचं वय होतं फक्त १९ वर्ष.

एवढ्या लहान वयात महत्त्वाच्या मॅचेसमध्ये असली नाद कामगिरी केल्यामुळं भारताचा सुपरस्टार म्हणून शिवाकडे बघितलं जाऊ लागलं. पण तिथून पुढं सगळी सूत्र चेंज झाली. शिवा संघाबाहेर गेला. त्याच्या क्रिकेटपेक्षा जास्त चर्चा, त्याच्या कथित प्रेम प्रकरणांची, दारू पिण्याची आणि ड्रग्ज घेण्याची होऊ लागली.

संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी त्याला झगडावं लागलं. ८७ च्या वर्ल्डकप दरम्यान त्याला संधी मिळाली खरी, पण त्याला आपली चमक दाखवता आली नाही. १७-१८ व्या वर्षी इंग्लंडचा बाजार उठवणारं पोरगं वयाच्या २१ व्या वर्षी कारकिर्दीतली अखेरची टेस्ट मॅच खेळलं.

त्यानंतर, शिवा दिसला तो थेट कमेंट्री बॉक्समध्येच. तिथं पण भावानं नाद केला. आपलं इंग्लिश सुधारावं म्हणून तो घरातही फक्त इंग्लिशच बोलू लागला. आजही आयपीएल किंवा भारताच्या मॅचेस दरम्यान हर्षा भोगलेच्या जोडीला शिवा दिसतो आणि कमेंट्री ऐकण्यातही मजा वाटते.

क्रिकेटमध्ये मैत्रीच्या जोडगोळ्या फेमस आहेत, मग भले देश वेगळे का असेना. शिवाची मैत्री होती ती कॅरेबियन प्लेअर्ससोबत. माल्कम मार्शलला तर शिवा पोरासारखा होता.

 पण याच मार्शलची शिवानं एकदा खोड काढली होती, तेही आपल्या पहिल्याच इंटरनॅशनल सामन्यात. भाऊ माल्कम मार्शलला म्हणाला, ‘यु आर नो ग्रेट फास्ट बॉलर.’ चिडलेल्या मार्शलनं सलग पाच बाऊन्सर्स टाकून शिवाची विकेट काढली.

वेस्ट इंडिजच्या टीममधला आणखी एक प्लेअर त्याचा जानी दोस्त होता. तो म्हणजे सगळ्या जगातल्या बॉलर्सला धडकी भरवणारा व्हिव रिचर्ड्स. भारत अरुण सांगतो, की इंग्लंडमध्ये गेल्यावर व्हिव रिचर्ड्स भेटला… की पहिला प्रश्न असायचा, ‘अरे लक्ष्मण कुठेय?’

व्हिवसारख्या बादशहा प्लेअरचं लाडकं होण्याचा मान सहजासहजी मिळत नाय. पण शिवानं तो मिळवला होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये डाऊनफॉल आला नसता, तर आज त्याच्याच तमिळनाडूमधला अश्विन शिवाचे रेकॉर्ड्स मोडायची स्वप्न पाहत असता हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.