कांगारूंच्या वर्ल्डकप विजयामागं एका भारतीय भिडूचा मोठा रोलय

जेव्हा टी२० वर्ल्डकपची घोषणा झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाला कोणती गिणतीतही धरलं नव्हतं. कारण साहजिक होतं शेठ, वर्ल्डकपच्या आधी मागच्या पाच टी२० सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियानं पराभवाचं तोंड पाहिलं होतं. त्यात एक मॅक्सवेल गडी सोडला, तर ना स्मिथ फॉर्ममध्ये, ना वॉर्नर. त्यामुळं आधीच ‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये असलेली ऑस्ट्रेलिया सेमीफायनलपर्यंत गेली तरी खूप होतं. पण कांगारू भिडूंनी डायरेक्ट कप मारून दाखवला.

जमाने बदलत गेले तरी, ऑस्ट्रेलियाची बॉलिंग म्हणजे स्पीड आणि बाऊन्स हे समीकरण आपल्या डोक्यात फिट्ट बसलंय. आता युएईमधल्या रटाळ पिचवर पेस बॉलिंगचं लय कौतुक नसतंय. इकडं बोलबाला असतो तो स्पिनर्सचा.

शेन वॉर्न आणि नॅथन लायन सोडले, तर कांगारू काय स्पिनर्ससाठी ओळखली जाणारी टीम नाये. मात्र वेळेनुसार बदलत गेलं नाय, तर ग्रुप स्टेजमध्ये हरून परत यावं लागतं. भारतीय चाहते तरी जरा दिलदार आहेत, कांगारू सेमीफायनलच्या आधी बाहेर गेले असते, तर त्यांच्या देशात लय राडा झाला असता.

आता जिंकायचंय म्हणल्यावर प्लॅनिंग कसं मजबूत पाहिजे. आत प्लॅनिंग करण्यात कांगारूंचा हात कुणी धरू शकतंय व्हय शेठ? त्यांनी लॉंग टाईम अगो एक इन्व्हेस्टमेंट केली. नाय नाय शेअर, बिटकॉईन असली इन्व्हेस्टमेंट नाय. तर त्यांनी आपल्या टीममध्ये एक माणूस घेतला. जो स्पिन फ्रेंडली पिचेसवर कांगारू बॉलर्सना मदतीचा हात देऊ शकतो.

हा माणूस कोण तर, माजी भारतीय क्रिकेटर श्रीधरन श्रीराम.

साधारण २०१७ पासून श्रीराम ऑस्ट्रेलियन टीमचा स्पिन बॉलिंग कन्सल्टंट म्हणून काम करतोय. भारताविरुद्ध भारतात झालेली सिरीज, ॲशेस सिरीज, उपखंडात झालेल्या मॅचेस आणि मुख्य म्हणजे टी२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्सनं खतरनाक परफॉर्मन्स दिला, याचं मोठं श्रेय श्रीरामला जातं.

आता श्रीरामविषयी थोडं सांगतो-

मूळचा तमिळनाडूचा असलेला श्रीराम भारताकडून आठ वनडे मॅचेस खेळलाय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र पठ्ठ्यानं नाद केलाय. म्हणजे बघा १३३ मॅचेस, ९५३९ रन्स, ३२ शतकं आणि ८५ विकेट्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ५२.९९ चं वजनदार ॲव्हरेज.

श्रीराम पहिल्यांदा प्रकाशझोतात आला, तो भारताच्या अंडर-१९ संघाच्या साऊथ आफ्रिका टूर दरम्यान. १९९२-९३ साली झालेल्या या टूरमध्ये त्यानं २९ विकेट खोलल्या आणि त्याच्या नावाच्या हेडलाईन माध्यमांमध्ये झळकल्या. त्यानं १९९९-२००० च्या डोमेस्टिक सिझनमध्ये पाच शतकं मारली आणि एकूण रन्स केले १०७५. श्रीरामनं आणखी दोनदा हजार रन्स मारले, विकेट्सही काढल्या.

त्या १०७५ रन्सचं फळ त्याला मिळालं आणि २००० साली साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीरामनं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. मोठ्या स्टेजवर काय त्याची जादू चालली नाय. सहा मॅचेसमध्ये फेल गेल्यावर तो बाहेर बसला, मग पार २००४ मध्ये तो परत संघात आला आणि बांगलादेशला ५७ रन्स हाणले. पण ती त्याची भारताकडूनची शेवटची इंटरनॅशनल मॅच ठरली.

त्यानंतर हा भिडू झी ग्रुपच्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये दिसला. या लीगचा बाजार उठल्यावर त्याला सुदैवानं आयपीएलमध्ये एंट्री मिळाली. पण तिकडंही गणित बसलं नाही, मग भिडू थेट स्कॉटलंडकडून खेळला.

क्रिकेटमध्ये एक गणित असतंय. भारी खेळणारा प्लेअर, भारी कोच बनेल असं नाही आणि भारी कोच असणारा, भारी प्लेअर असलंच असं नाही. श्रीराम इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारी खेळला नसंल पण कोचिंग मात्र एक नंबर केलं.

आतापर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्स, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ए आणि ऑस्ट्रेलियाची मुख्य टीम अशा टीम्सना त्यानं स्पिन बॉलिंगचं तंत्र शिकवलंय. उपखंडातल्या पिचवर जिंकायचं असलं, तर खुंखार स्पिनर्स असल्याशिवाय पानही हलत नसतंय. जगातल्या बाकीच्या टीमकडे खुंखार स्पिनर्स असतात, पण कुठल्या पिचवर कशी बॉलिंग टाकायची हेच माहित नसेल, तर विकेट्सचं गणित बसवणार कसं?

इथंच श्रीरामची भूमिका महत्त्वाची ठरते. आता याच वर्ल्डकपचं सांगायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाकडून सगळ्यात जास्त विकेट काढल्यात ॲडम झम्पानं, म्हणजेच स्पिनरनं.

त्यामुळं बाकी कुठल्या भारतीय प्लेअरचे लागो न लागो श्रीरामचे हात मात्र वर्ल्डकप ट्रॉफीला लागले, यातच यावर्षी समाधान मानायचं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.